माझे शेल्फ
आघात
बाह्य शक्ती आणि उद्योगविश्व यांच्यातील संघर्षाचं संयत चित्रण कामगार-मालक संघर्ष आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणारे अनेक प्रश्न हा विषय मराठी साहित्यात फार कमी चर्चिला गेला आहे. ज्या साहित्यकृतींमध्ये हा प्रश्न हाताळला गेला त्यामध्ये व्यवस्थापन आणि कागार यांच्यातील संघर्ष हे मुख्य सूत्र होतं. (एखाद-दुसरा अपवाद असूही शकतो.); परंतु सूर्यकांत जाधव यांनी कामगार-मालक असा संघर्ष न रंगवता बाह्य शक्तींची उद्योग विश्वातील ढवळाढवळ आणि त्यातून कामगार-व्यवस्थापन आणि कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा यांच्या संबंधात निर्माण होणारा तणाव, त्यातून निर्माण होणारे प्रश्न याचं तपशीलवार चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. मुंबईतील बापा केमिकलच्या विस्तारीकरणाला डिश या सरकारी संस्थेचे तरुण संचालक राजे यांचा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून विरोध असतो; पण राजे अत्यंत संयमाने ते प्रकरण हाताळत असतात. बापा केमिकलचे मालक रसिकभाई पटेल यांची मुलगी अमिता आणि राजे या प्रकरणात जवळ येतात आणि लग्न करायचं ठरवतात. बापा केमिकलच्या वापरात नसलेल्या गोदामात फॉसजीन या विषारी गॅसची नळकांडी आहेत, असे डिश संस्थेचे फॅक्टरी इन्स्पेक्टर सरपोतदार यांना आढळते. अर्थातच ते ही बाब राजेंच्या निदर्शनाला आणून देतात. राजे आणि कर्नल प्रकाश हे प्रकरण शांतपणे हाताळायचं ठरवतात.दरम्यान, राजकीय पुढारी असलेले मॅक्स इंजिनिअरिंग कंपनीचे मालक शिरगोपीकर आणि युनियन लीडर जंगी यांनी बापा केमिकलच्या विरोधात कोर्टात केस दाखल केलेली असते, ती केस मागे घेण्याचा निर्णय शिरगोपीकर घेतात आणि जंगी भडकतो. बाहेरच्या कामगारांना आणि युनियनला हाताशी धरून बापाच्या व्यवस्थापनाला पायाशी आणायचा जंगीचा डाव असतो; पर्यावरणाच्या मुद्द्यावरून कारखान्याच्या मालकांना अडचणीत आणायचं आणि वाटेल तेवढे पैसे उकळायचे, हा जंगीचा उद्योग असतो. आताही बापा केमिकलच्या कामगारांना तो कामावर जाण्यापासून रोखू पाहतो आणि रसिकभाई पटेलांना नेस्तनाबूत करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेला असतो; पण ऐन वेळेला शिरगोपीकरांची माणसे जंगी आणि त्याच्या माणसांवर हल्ला चढवतात आणि जंगीचं आंदोलन चिरडलं जातं. फॉसजीनची नळकांडी हस्तगत करण्यासाठी जेहादी बापाच्या गोडाऊनमध्ये शिरतात आणि एक संघर्षनाट्य पेटतं. त्या संघर्षनाट्याला राजे कसं तोंड देतात आणि कर्नल प्रकाश राजेंच्या मदतीला कसे धावून येतात, याच्या साद्यंत तपशीलासाठी ‘आघात’ ही कादंबरी वाचली पाहिजे. अशा रीतीने कारखाने, कामगार, कारखान्यांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा या घटकांचं आणि जेहादींसारख्या बाह्य शक्तींमुळे या घटकांमध्ये निर्माण होणाऱ्या तणावाचं वास्तव चित्रण ‘आघात’ या कादंबरीतून केलं आहे. कोणत्याही एका घटकाची बाजू न घेता, आहे ती वस्तुस्थिती समोर आणणे, हे पथ्य लेखकाने पाळल्यामुळे कादंबरी भडक होत नाही. तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टरला केवळ कामगारांचे प्रश्न सोडवायचे नसतात, तर अन्यही कामे करावी लागतात, याचंही दिग्दर्शन या कादंबरीतून होतं. फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या कामातील बारकावे या कादंबरीमुळे समजतात. राजे, कर्नल प्रकाश यांच्या व्यक्तिरेखा संयतपणे चित्रित केल्यामुळे जगात काही माणसं तरी समतोल आहेत, असा सकारात्मक संदेश या कादंबरीतून मिळतो. शिरगोपीकर या राजकारणी व्यक्तीची व्यक्तिरेखाही नेहमीप्रमाणे काळ्या रंगात न रंगवता त्या व्यक्तिरेखेचीही उजळ बाजू अधोरेखित केली आहे. त्यामुळे ‘आघात’ ही एका संघर्षपूर्ण विषयावरची संयतपणे मांडणी केलेली कादंबरी आहे, असं म्हणायला हरकत नसावी. सुरुवातीला ही कादंबरी कामगार-व्यवस्थापन यांच्यातील संघर्षाची आहे, असं वाटत असताना जेहादींच्या प्रवेशामुळे ती गुप्तहेर कथेच्या वळणाने जाते. कामगार-व्यवस्थापन या पैलूंबरोबरच बाह्यशक्ती हा पैलू त्यात सामील झाल्यामुळे कारखान्यांना बाह्य शक्तींपासून उपद्रव होऊ शकतो, ही बाजूही समोर येते. ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. ती वाचनीय आहे.