मुखपृष्ठ
अज्ञाताचे विज्ञान

माझे शेल्फ

अज्ञाताचे विज्ञान

इंग्रजी शीर्षक
Adnyatache Vidnyan
सारांश

या विश्वात कितीतरी अशा गूढ गोष्टी आहेत की जेथे मती गुंग होते... आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग घडतात की आपली बुद्धी चक्रावून जाते, असे अनेक अनुभव लोक सांगतात की त्यांचे तर्कशक्तीच्या बळावर आकलन - स्पष्टीकरण करणे जड जाते. ज्या गोष्टींचे स्पष्टीकरण व कर्यकारणभाव सहजपणे उलगडत नाही, अशा गोष्टी संदिग्ध आणि गूढ ठरतात, त्यांची गूढरचना ही माणसाला पिढ्यान्पिढ्या भूल घालत राहिली आहे. आपल्या भविष्यात काय दडलेले आहे, आपल्या पूर्वजन्मी आपण कोण होतो, पक्ष्यांची भाषा आपल्याला कळू शकते का, मृत्यूनंतर माणसाचे काय होते, आत्मा हा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून काही कामे करून घेऊ शकतो का, भूत वगैरे प्रकार खरोखरच आहेत का, दूर अंतरावर असणाऱ्या दोन व्यक्तींच्या मनात एकाच वेळी एकच विचार होणे असा प्रकार संभवतो का, भावी अनर्थाची पूर्वसूचना मिळते का, काही विशिष्ट स्थळी गेल्यावर व विशिष्ट व्यक्तींच्या सहवासात गेल्यावर मनःशांतीचा अनुभव येतो हे खरे आहे का, चंद्र व ग्रह यांचा मानवी मनावर व जीवनावर प्रभाव पडतो का, ग्रहशांती-यज्ञयाग करून काही फायदा होतो का, केवळ स्पर्शाने रोग बरा करण्याची क्षमता कोणात असते का, पंचेंद्रियांनी होऊ शकत नाही असे काही ज्ञान आहे का, आणि तसे ते असल्यास त्याच्या आकलनासाठी अधिक ज्ञानेंद्रिये असणे संभाव्य आहे का, लहान वयातच संगीत, गणित वगैरे क्षेत्रांत विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या मुलामुलींच्या व पूर्वजन्माच्या स्मृती सांगणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा अन्वयार्थ कसा लावायचा इ. इ्... हे आणि असे अनेक प्रश्न हे जगभरच्या शास्त्रज्ञांनाही सारखे सतावत राहिलेले आहेत. गूढ व रहस्यपूर्ण असा त्यांच्यावर शिक्का मारून ते स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांचा उलगडा करण्यासाठी ते प्रयोग करीत आहेत. अज्ञानाचा बोध व्हावा, त्याची उकल व्हावी म्हणून त्यांची खटपट चालू आहे. अशा या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न डॉ. सुरेशचंद्र कुलकर्णी यांनी ‘अज्ञानाचे विज्ञान’ या पुस्तकातील चोवीस लेखांद्वारे केला आहे. मानवी सृष्टीतल्या अज्ञात, गूढ अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकणारे हे लेख आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पाश्चात्त्य पुस्तकांचा उपयोग केला आहे. अडीच वर्षे खपून बारा-तेरा हजार पृष्ठांचे वाचन करून, टिपणे काढून, भरपूर श्रम घेऊन योग्य ते संदर्भ जमवून या लेखांची मांडणी केली आहे. पाश्चात्त्य देशात एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्ती व संस्था सतत प्रयत्नशील असतात आणि आपल्या संशोधनाचे निष्कर्ष वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात. काही संशोधक हे निष्कर्ष काढताना नको तेवढी चलाखी दाखवून, दिशाभूलही करतात. परंतु एकूण या संशोधनामुळे अनेक बाबींवर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश पडत जातो हे खरेच आहे. डॉ. नाडकर्णी यांनी पुढील विषय या पुस्तकात घेतले आहेत. वैश्विक चक्र व त्याचे परिणाम, चंद्राचा मानवी जीवनावर व स्वभावावर होणारा परिणाम, ग्रह आणि व्यवसाय, ग्रहावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न, आत्मा, उपद्व्यापी कंपनलहरी, मानसिक सामर्थ्य, प्रत्येक व्यक्तीभोवती असणारे तेजोवलय कोष, विद्युत चुंबकीय क्षेत्र, अॅक्युपंक्चर व शियात्सू इ. उपचार पद्धती, मनलहरी, इच्छाशक्ती, धातूचे सोन्यात रूपांतर करणारा परीस, आदिम समाजातील औषधोपचार पद्धती, हस्तरेखाशास्त्र, संमोहनशास्त्र, बाह्यमन व अंतर्मन, मंत्रविद्या व चेटूक, स्वप्ने व अबोध मन, दूर संवेदना, अंतःप्रेरणेने मिळणारे संकेत, काळावर मात करण्याचे प्रचत्न, भूतयोनीचे गौडबंगाल, मृत्यूनंतरचे अस्तित्व, मानवाचे भवितव्य. ह्या लेखांतून अनेक शास्त्रज्ञ, अनेक प्रयोग, अनेक नव्या संकल्पना समोर येतात. आपल्या विचारांना त्यामुळे चालना मिळते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
130
भाषा
मराठी
किंमत
130.00
ISBN
9788177662474
समुदायाने जोडले
बंद