माझे शेल्फ
आकाश झेलताना
मंजुश्री गोखले हे नाव एकल्याबरोबरच त्यांच्या विविध स्त्री-पुरुष संतांवरच्या कादंबऱ्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. अतिशय रसाळ आणि ओघवती शैली यामुळे त्यांच्या या कादंबऱ्या वाचकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची नुकतीच ‘आकाश झेलताना’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. मात्र ही कादंबरी संतावरची नाही, ती शुभदा या सर्वसामान्य कुटुंबातील, पण एका समर्थ नायिकेची कथा आहे. घराची घडी बसविणाऱ्या स्त्रीची कर्तृत्वगाथा... आज स्त्रीच्या शिक्षणाला, महत्त्वाकांक्षांना आभाळ लाभलं आहे. भरपूर पैसा ती कमावत आहे. पण कुटुंब या संस्थेविषयी ती किती जागरूक आहे, हा कळीचा मुद्दा ठरावा अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरमंजुश्री गोखले यांनी एक गरीब घरातली. फारशी न शिकलेली बेताचं रूप असलेली नायिका (शुभदा) वाचकांच्या भेटीला आणली आहे. त्यांच्या ‘आकाश झेलताना’ या कादंबरीतून, शुभदाचं कुटुंबाविषयीचं प्रेम आणि तिचं कर्तृत्व या कादंबरीतून उलगडत जातं. शुभंदा एक सामान्य, गरीब घरातली, एका पायाचं किंचित अधू असलेली मुलगी, वय तिशीच्या आसपास, कोणतीच बाजू समर्थ नसल्यानं लग्न ठरत नसलेली. तिला कोकणातील एका बिजवराचे स्थळ येते. तिथून तिला होकार येतो आणि ती लग्न करते. तिचा नवरा डॉ. विद्याधर याचे मोठे कुटुंब. आई-वडील एक विधवा आत्या, दोन भाऊ, दोन बहिणी, पहिल्या विवाहाची दोन मुले, सगळे घर विस्कटलेले. एक भाऊ चित्रपटाच्या वेडाने मुंबईला पळून जातो. एका बारबालेच्या प्रेमात पडतो. गुंडापासून पळून तिला घेऊन घरी येतो. दुसरा भाऊ गावातल्या एका मुस्लीम मुलीच्या प्रेमात. शुभदा त्या दोन्ही भावांचे आयुष्य सुधारते. एक बहीण २७ वर्षांची. देखणी म्हणून प्रथम सगळी स्थळं नाकारून आणि आता लग्न होत नाही म्हणून कडवट बनलेली. धाकटी बहीण एका बांधकाम मजुराकडून फसवली जाणार असते. शुभदा तिला वाचवते. दोघींचं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देते. हे करत असताना पर्यटकांसाठी भक्त निवासाची सोय करते. व्यवसाय वाढवते. तीन भक्त निवास बांधते. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पर्यटक व्यवस्थापनाचा पुरस्कार मिळवते. सगळं घर सावरते. हे संकटांचं, अडचणीचं आकाश बुद्धीच्या जोरावर, आपल्या समर्थ खांद्यावर झेलते. कर्तव्यदक्ष पत्नी, वत्सल आई, प्रेमळ वहिनी अशी शुभदाची लोभस रूपं या कादंबरीतून समोर येतात. थर अशी ही शुभदाच्या कर्तृत्वाची गाथा आहे. ही कादंबरी वाचकांना योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर, जोत्स्ना देवधर इ. कौटुंबिक आणि नायिकाप्रधान कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखिकांच्या काळात नेऊन सोडते. मांगल्य, शुचिता आणि सदाचार या आज दुर्मिळ झालेल्या गुणांचं दर्शन ही कादंबरी घडवते. कर्तृत्वाला प्रेमाची, समर्पणाची जोड असेल, तर त्या कर्तृत्वाला अर्थ लाभतो तसेच कर्तृत्वाला अपंगत्व किंवा सुमार रूप कुंपण घालू शकत नाही. असा संदेश देणारी ही कादंबरी आहे. मंजुश्री गोखले यांच्या ‘तुक्याची आवली’, ‘जोहार मायबाप जोहार’, ‘ओंकाराची रेख जना’, ‘ज्ञानसूर्याची सावली’, ‘हेचि दान देगा’ अशा संतचरित्रपर कादंबऱ्यांना पुरस्कार लाभले आहेत. तसेच वाचकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या ओघवत्या भाषेतील या कादंबरीलाही वाचकांचा असाच प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो.