माझे शेल्फ
आमार मेयेबेला
यथासांग व प्रभावी अनुवाद... आपल्या लेखनामुळे बांगला देशातच नव्हे तर इतरत्रही खळबळ उडविणाऱ्या तसलिमा नसरिन यांचे हे पुस्तक. बालपण ते वयात येण्यापर्यंतच्या काळातल्या बऱ्या-वाईट आठवणी म्हणजेच आमार मेयेबेला. आपल्या बालपणातील आठवणीमध्ये आपले घर, घराती माणसे, आई वडील, भाऊ-बहिणी तसेच जवळचे नातेवाईक यांच्या विषयीचे चांगले-वाईट अनुभव लेखिकेने मांडले आहेत. देखणे, शिक्षणाला महत्त्व देणारे डॉक्टर असलेले तरीही अहंकारी विषयासक्त आणि आपल्या मुलांना शिकवून मोठे करण्याचे स्वप्न बाळगणारे वडील, कुरूप, साधी, शिक्षणाबद्दल नावड दर्शवणारी, धर्मवेडी आणि नवऱ्याबद्दल सतत संशय बाळगणारी आई, प्रेमळ मोठा भाऊ, बंडखोर धाकटा भाऊ व लहान बहीण यांचे सांगोपांग वर्णन लेखिकेने केले आहे. तसलिमाच्या तेरा, चौदा वर्षापर्यंतच्या काळात तिच्या स्वातंत्र्यावर तिच्या मनाविरुद्ध वागण्याची केलेली सक्ती, बंधने, त्यामुळे येणारे अस्वस्थपणे, वैफल्यग्रस्त, धर्मवेड्या आईने तिच्यावर केलेली धार्मिक सक्ती, वडिलांकडून शिकण्यासाठी होणारे प्रयत्न, न ऐकल्यास आई वडिलांकडून मिळणारा मार यामुळे तिचे बालपण भयग्रस्त आणि असुरक्षित झाले. धर्म, परंपरा याविषयी पडणारे प्रश्न पण त्याची न मिळणारी उत्तरे, विचारल्यास मार व धमकी यामुळेही तिच्या बालमनावर परिणाम होत होता. याशिवाय जवळच्या नातेवाईक व्यक्तीकडून तिच्यावर झालेला शारीरिक, लैंगिक छळ तो सांगू बोलू न शकल्याने झालेली मानसिकता कुचंबणा याचे लेखिकेने केलेले स्पष्ट व धीट निवेदन यात चित्रित झाले आहे. या पुस्तकातील सर्व पात्रे व घटना सत्य असल्याने व जे जसे आहे तसे, विनासंकोच लिहिल्याने आजच्या बंडखोर, वादग्रस्त, वादळी व्यक्तिमत्त्वाच्या लेखिकेचे मूळ या आठवणीत सापडते. तसलिमाचे असुरक्षित, अस्थिर, बालपणच तिच्या या पुस्तकामुळे आपल्यापुढे उलगडत जाते व तिच्या ओघवती स्पष्ट, सरळ भाषेमुळे आपणही तो काळ तिच्याबरोबर अनुभवतो. मृणालिनी गडकरी यांनी बंगाली भाषेतील अनुवाद मराठीत अगदी यथातथ्य व प्रभावी भाषेत केला आहे.