माझे शेल्फ
अमेरिकेतील पापनगरी : एक वारी
लास वेगास हे अमेरिकेतील शहर जुगाराचे शहर म्हणून जगभर मशहूर आहे. नेवाडा या वालुकामय राज्यात पीक पाण्याची वानवा. तेथील लोकांना रोजगाराचे कुठलेच साधन नाही. त्यांना निर्वाहाचे काहीतरी साधन हवे. म्हणून नेवाडा राज्याने जुगाराला कायद्याने मान्यता दिली आणि कसिनो काढण्यास आपल्या नागरिकांना परवानगी दिली. त्या काळात अमेरिकेतील अन्य सर्व राज्यात कायद्याच्या दृष्टीने जुगार हा दंडनीस अपराध होता. जुगाराला राजरोस मुभा मिळाल्याने अमेरिकेच्या इतर राज्यांमधून लास वेगासला पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. त्यांच्या निवासाची उत्तम सोय करण्यासाठी एकापेक्षा एक भव्य हॉटेल्समध्ये नाना प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थही माफक दरात मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर पर्यटकांच्या रंजनासाठी आकर्षक करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्याची कल्पनाही अंमलात आणली गेली. जगभरचे नामवंत कलावंत, नृत्यकार, नकलाकार, जादूगार, अभिनेते तेथील फ्लोअर शोज्, स्ट्रिपटीझ रेव्ह्यू वगैरे कार्यक्रमात भाग घेऊ लागले. एकाच वेळी शंभर (दोनशे) नर्तकांचा सहभाग असणारे भव्य नेत्रदीपक शो हे लास वेगासमधल्या प्रत्येक हॉटेलचे खास आकर्षण ठरले. त्यामध्ये नाना प्रकारचे ट्रिक सीन्स, बदलते रंगमंच, चमत्कृतीपूर्ण सजावटी वगैरेंचे प्रयोग होऊ लागले आणि या सर्व गोष्टींची माफक दरात लयलूट होत असताना आलेल्या पर्यटकांना अधिकच थ्रील वाटावे म्हणून एकेका हॉटेलात शेकडो स्लॉट मशीन्स बसवण्यात आली. एकाच प्रकारची तीन फळे एकाच रांगेत आली की जॅकपॉट म्हणून एक डॉलरचे पंचवीस-पन्नास डॉलर मिळू लागले. अशा जॅकपॉटमुळे पर्यटकांच्या खिशातून नोटावर नोटा निघू लागल्या आणि तासन्तास त्या मशीनच्या समोर बसण्यात पर्यटकांना धन्यता वाटू लागली. त्याचबरोबर पोकरसारखे पत्त्यांचे खेळ, केनो, रौलेट डझनवारी प्रकारचे खेळही सुरू झाले आणिलास वेगासच्या समृद्धीत भर घालू लागले. अमेरिकेतील इतर संस्थानात लग्न करणे आणि घटस्फोट घेणे यासाठी महिनाभर आधी नोटीस द्यावी लागते. लास वेगासच्या प्रशासनाने ही जाचक तरतूद रद्दबातल करून हव्या त्या क्षणी, हव्या त्या ठिकाणी लग्न करण्याची आणि घटस्फोट घेण्याची मुभा दिली. त्यामुळे अनेक चॅपेल्स व चर्चेस तेथे निघाली आणि तेथील चचंप्रमुखांनाही अमाप कमाईचे मार्ग राजरोस खुले झाले. या झटपट श्रीमंतीला पुढे अनेक फाटे पुâलत राहिले. या शहरात रात्रंदिवस विद्युतदीपांचा झगमगाट उजळत राहिली. रात्रीहा दिवसापेक्षा जास्त लखलखाट... या शहराला झोप नाही. कुठलाही कॅसिनो चोवीस तास चालू... तशात हूवर डॅममुळे येथील पाण्याचा प्रश्न सुटला. हे धरण हाही स्थापत्यशास्त्रातला चमत्काराच मानला जातो. अनावर बेधुंद कोलोराडो नदीला धरणाचा वेसन घालून पाण्याचा हा प्रश्न सोडवून लास वेगासला वाळवंटातील अद्भूत मायानगरीच बनवले गेले! जगण्यातले थ्रील... जुगारातले थ्रील... मुक्त स्त्रीपुरुष प्रणयाचे रंगढंग...अल्पावधीत लक्षावधी डॉलर्स कमविण्याचे आमिष... लास वेगासला एकीकडे काही लोक पृथ्वीवरचे नंदनवन बनवत होते, तर दुसरीकडे सिनसिटी/पापनगरी म्हणून काही प्युरिटन तिला नाके मुरडत होते... तरीही लास वेगासची लोकसंख्या वाढत होती... आज लास वेगासची वस्ती तीस-पस्तीस लाखांच्या घरात आहे. अमेरिकेतील इतर शहरांच्या तुलनेने बरीच जास्त... येथील दहापैकी आठ हॉटेल्स ही जगातील सर्वांत मोठ्या दहा हॉटेल्सच्या यादीत गणली जातात, एकेका हॉटेलमध्ये चार-सहा हजार खोल्या आहेत, आणि हजारो स्लॉट मशीन्स, पंधरावीस रेस्टॉरंटस्, नाट्यगृहे, दुकाने... न्यूयॉर्क , पॅरिस, इंग्लंड, इजिप्त, व्हेनिस (इटली) शहरांच्या वा देशांच्या प्रतीकात्मक प्रतिकृती येथे तयार करण्यात आल्या आहेत. या शहराला तुम्ही वाळवंटातले नंदनवन म्हणा, अद्भूत मायानगरी म्हणा की पापनगरी म्हणा, तिची भूल सर्वांना पडते. जन्माला यावे आणि काशीला जाऊन जन्माचे सार्थक करावे. त्याचप्रमाणे लास वेगासला जावे आणि त्या मायानगरीचे दर्शन घेऊन मनुष्य जन्माची संधी पुन्हा लाभावी असा संकल्प सोडावा, अशी या नगरीची जादू आहे. विलक्षण जादूनगरीवर मराठीत आजवर फुटकळ प्रवासवर्णनात्मक लेख अधूनमधून वाचायला मिळत होते. परंतु स्वतंत्र पुस्तक मात्र निघाले नव्हते. ती उणीव आता डॉ. अनंत लाभसेटवार यांनी ‘अमेरिकेतील पापनगरी : एक वारी’ हे पुस्तक लिहून भरून काढली आहे. डॉ. अनंत लाभसेटवार हे गेली तीस-पस्तीस वर्षे अमेरिकेत राहतात. पेशाने संशोधक पण पुढे एक बँकही त्यांनी अमेरिकेत खरेदी केली आणि शॉपिंग मॉल्सचेही सौदे त्यांनी केले. एक हजार एकरात शेती केली, आकाशवाणी केंद्र चालवले. त्याबद्दल त्यांनी मोकळेपणाने आपल्या ‘अमेरिकेतील धावपळ’ या आत्मकथनात बरेच काही सांगितले आहे.