माझे शेल्फ
आणि विक्रमादित्य हरला!
स्वाती चांदोरकर लिखित ‘आणि विक्रमादित्य हरला’ पुस्तकात राजा विक्रमादित्य व वेताळ या गोष्टीच्या माध्यमातून आज समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना हात घातला आहे. आजच्या प्रश्नांना हात घातला आहे. आजच्या प्रश्नांचे स्वरूप अधिक विक्राळ व भयप्रद आहे. मानवजात ्या प्रश्नांना, समस्यांना सामोरी जाताना हतप्रभ होताना दिसते. ‘विक्रमादित्य व वेताळ’ यांच्या पुस्तकरूपातील गोष्टी (लोकांनी) सर्वांनीच बालपणी वाचल्या असतील वेताळाच्या प्रश्नांना उत्तरे देता देता विक्रमादित्याने हार मानली नव्हती. आज मात्र वेताळाच्या प्रश्नांना उत्तरे देता देता विक्रमादित्य अखेर हरतो. माणसाला भेडसावणारे प्रश्न तसेच अनुत्तरित आहेत. माणसाच्या वर्तनावर, निर्ढावलेपणावर, दुष्टपणावर, बदलत्या नीतिमूल्यांवर नेमकेपणाने निर्देश करणारे व त्याने हताशा अनुभवणारे हे प्रश्न आहेत. ‘फक्त नरकच’या पहिल्या कथेचा नायक एक सुशिक्षित सधन व्यक्ती. ड्रायव्हिंग करता करता मोबाईलवर बोलत असताना एका बाईकला धडक देतो. भीतीमुळे गाडी न थांबवता सुसाटपणे निघून जातो. पण त्याचे मन त्याला खात असते. दुर्दैवाने त्या बाईकवर त्याचाच मुलगा व त्याचा मित्र असतो. दोघेही मृत्यू पावतात. हे सत्य कळल्यावर त्याची व पत्नीची अवस्था दयनीय होते. वेताळाच्या प्रश्नाला उत्तर देताना विक्रमादित्य म्हणतो, आज स्वार्थी वृत्ती वाढली आहे. प्रत्येकजण फक्त स्वत:चा विचार करतो. ‘नजरेतील सौंदर्य’ या कथेत स्त्रीची हरप्रकारे विटंबना करण्याच्या वृत्तीवर, समाजाच्या अवमूल्यनावर प्रकाश टाकला आहे. माणसाच्या मनाचा ठाव अजूनही पूर्णपणे लागलेला नाही. त्याच्या मनातील विचार, विकार अनाकलनीय असतात. ‘शी इज अब्सोल्युटली नॉर्मल’ या कथेत हेच समोर येतं . आपल्यासारखीच दुसरी व्यक्तीही दु:खी आहे हे बघण्यात माणसाला कुठेतरी समाधान वाटत असते ‘सांत्वन’ या कथेत विवाहबाह्य संबंधावर भाष्य आहे. पत्नीला पतीचे हे संबंध माहीत असूनही ती त्याचा उच्चारही करत नाही. त्याच्या मृत्यूनंतर ‘तिला’ भेटायला जाते. ‘तिच्या’ समाजातील स्थानची जाणीव करून देते. पत्नी सांगते. ‘‘मलाही मदतीचा हात देणारे भेटले, पण माझा तोल व डौल डळमळला नाही. पण माझ्या लेखी माझा पती कधीच परिघाबाहेर गेला आहे.’’ ‘औटघटकेचं राज्य’ कथा आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या बालकांवर, मुलांवर होणाऱ्या अनिष्ट परिणामांकडे पालकांचं लक्ष वेधते. पालक आपल्या अपेक्षांचं अवास्तव ओझं मुलांवर लादतात. पैसा मोजून यश विकत घेतात हे सत्य समोर आल्यावर कोवळ्या मनावर आघात होतो. ‘जे घडणे असते ते तेथे मी घडते’ कथेत शोषक व शोषितांच्या कथा व व्यथा आहेत. आज मोबाईल, इंटरनेट, पेâसबुक वगैरे आधुनिक तंत्रज्ञानामुळे कित्येक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. त्यांची उपयुक्तता ही वादातीत आहे; पण त्यामुळे माणसामाणसातील सुसंवाद जिव्हाळा कमी होत चालला आहे ही त्याची दुसरी व दुखरी बाजू ‘एक अबोल हुंकार’ कथेत व्यक्त झाली आहे. आज माणसाची जीवनशैली बदलून गेली आहे. कोणतीही गोष्ट कष्टाने, मेहनतीने मिळवण्यापेक्षा सुलभतेने मिळवणे, त्यातील थ्रिल अनुभवणे महत्त्वाचे वाटते हे ‘थ्रिल’ कथेत येते. एक यशस्वी उद्योजक, प्रसिद्धी, पैसा, यश, सुविद्य, सुस्वरूप पत्नी अशा सर्व सुखांत मग्न असलेल्या ‘त्याला’ अनेक वर्षानंतर एक विदारक सत्य समोर येते. त्याच्या पत्नीचे त्याच्याच एका मित्रावर (एकेकाळी) असणारे प्रेम. हे समजल्यावर त्याचा भ्रमनिरास होतो व तो आतून मोडून पडतो. ‘काडी’सारखा. ‘मानवांची मानगूट’ ही एक दुर्दैवी प्रेमकहाणी. प्रेयसीवर उत्कट प्रेम करणाऱ्या प्रियकराचा भीषण अपघात होतो. त्याला कारण ठरले प्रेयसीचे मस्करीचे बोलणे. त्याबद्दल स्वत:ला माफ करू न शकलेली प्रेयसी आत्महत्येचा प्रयत्न करते, पण त्यातून ती वाचते. दुर्दैवाने प्रियकराचा अंत होतो आणि मग आयुष्यभर मनात जळत राहण्यावाचून पर्याय उरत नाही. वेताळाच्या या गोष्टीनंतर विक्रमादित्य म्हणतो, ‘‘मी हरलो आहे. तरुणांची मानसिकता मी ओळखू शकत नाही. मला या सत्यकथा ऐकवत नाहीत. माझी जिद्द संपली आहे.’’ माणसांचे आजचे समस्याग्रस्त जीवन, भयानक परिस्थिती, त्याची हताशता यावर प्रखर प्रकाश टाकते. आजच्या माणसापुढे उभ्या असलेल्या प्रश्नांच्या अक्राळविक्राळ प्रश्नांना उत्तरे नाहीत, असे लेखिकेला सुचवायचे असावे.