माझे शेल्फ
आनंदतरंग
आनंदी आयुष्याची वाट दर्शवणारे आनंदतरंग ----- आपले आयुष्य आनंदी व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते. पण आनंद मिळवण्याचा हमखास असा काही फॉर्म्युला वगैरे आजवर अस्तित्वात आलेला नाही. याचे कारण म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. अर्थात, प्रत्येकाचा आनंद वेगेगळ्या गोष्टीत दडलेला असतो. त्यामुळे फारच थोड्यांना खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडलेली असते. ही गुरुकिल्ली कशी शोधायची आणि स्वत:चे जीवन अधिकाधिक आनंदी कसे करायचे त्याची वाट ग्रेचेन रुबिन या अमेरिकन लेखिकेचे द हॅपिनेस प्रोजेक्ट हे अनोखे पुस्तक दाखवते. इंग्रजीत तुफान लोकप्रिय झालेल्या आणि दहा लाखांहून अधिक प्रतींचा आकडा पार केलेल्या या पुस्तकाचा अश्विनी तापीकर-कंठी यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे आनंदतरंग या नावाने अलीकडेच प्रकाशित झाला आहे. इतर सेल्फ हेल्प बुक्सप्रमाणे केवळ आनंदाची तत्त्वे, मार्गदर्शनपर उपदेश असे स्वरूप या पुस्तकाचे नाही, तर आनंदी होण्यासाठी लेखिकेने हाती घेतलेल्या प्रत्यक्ष प्रकल्पाचा तो सविस्तर अहवाल आहे. लेखिकेने आपला हॅपिनेस प्रोजेक्ट राबवतानाचे केलेले स्वानुभव कथन प्रत्येक वाचकाला कुठल्या ना कुठल्या बिंदूवर कनेक्ट करते. त्यामुळे पुस्तकाची निर्मितीची प्रक्रिया समजावून घेणेही महत्त्वाचे ठरते. लौकिकार्थाने पाहिल्यास लेखिकेचे म्हणजेच ग्रेचेन रुबिन या अमेरिकन महिलेचे आयुष्य अगदी सुस्थिर आणि परिपूर्ण होते. पण आपल्याकडे काहीतरी कमी आहे, आपल्याला आणखी काहीतरी हवे आहे, आणखी मिळवायचे आहे अशी अनामिक हुरहूर तिच्या मनाला कायम लागून राहिलेली असे. स्वभावात आलेला चिडचिडेपणा, लहान-मोठ्या कारणांवरून होणारी कुरकुर यामुळे ती अस्वस्थ असायची. एकदा अशीच बसमधून प्रवास करत असताना काचेवरून ओघळणारा पाण्याचा थेंब पाहून तिला आपलेही आयुष्य असेच ओघळत चालल्याची जाणीव झाली आणि त्याच क्षणी अधिक आनंदी होण्यासाठी आपण काहीतरी करायला हवे हा विचार तिच्या मनात आला. त्यानुसार तिने आपला हॅपिनेस प्रोजेक्ट आखला आणि महत्प्रयासाने वर्षभर त्याची अंमलबजावणीही केली. हे सगळे टप्पे पुस्तकात शास्त्रोक्त पद्धतीने मांडतानाच तिने त्यात आपले स्वानुभव उत्तमरीत्या गुंफल्याने वाचकाला खऱ्या अर्थाने आनंदतरंगांची अनुभूती येते. अर्थात, लेखिकेच्या प्रकल्पातील काही बाबी अमेरिकन संस्कृती, जीवनपद्धतीशी निगडित असल्याचे जाणवते. मात्र, प्रत्येकाचा हॅपिनेस प्रोजेक्ट वेगळा असेल आणि तो ज्याचा त्याने ठरवायचा आहे हे लेखिकेने सुरुवातीला बजावून सांगितले आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण मांडणी आणि मनोरंजक धाटणीचे हे पुस्तक प्रत्येक वाचकाला आयुष्य आनंदी बनवण्यासाठी आपापला हॅपिनेस प्रोजेक्ट सुरू करायला उद्युक्त करणारे आहे.