माझे शेल्फ
अनुप
‘अनू’ची कहाणी... ‘आशिकी’ या सिनेमातून ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या अनू अगरवाल रातोरात स्टार बनल्या. त्यांचा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली... पण त्यांनी वेगळाच रस्ता शोधला. त्या योगाभ्यासाकडे वळल्या आण त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले. हा सर्व प्रवास त्यांनी ‘Unusual’ इंग्रजी पुस्तकात उलगडला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला असून तो ‘अनू’प या नावाने प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकातून आपल्याला अनू अगरवाल यांचे वेगळेच रूप दिसते. उच्च शिक्षित अनूंना समाजकार्याचाही अनुभव आहे. चित्रपटांतील भूमिकांबरोबर ‘सुपरमॉडल’ म्हणूनही त्या प्रसिद्धीच्या झोतात होत्या, त्यानंतर त्या योगाभ्यासाकडे वळल्या, योगाश्रमात राहू लागल्या. त्यानंतर त्यांचा भीषण कार अपघात झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या व कोमात गेल्या. त्यातून बऱ्या होऊन त्या पुन्हा त्यांच्या कामात सक्रिय झाल्या आहेत. या सर्व प्रवासातील तगमग, मन:शांतीचा शोध याबद्दलचे प्रामाणिक व पारदर्शी कथन या पुस्तकात आहे. स्वत:कडे त्रयस्थपणे बघण्याचा त्यांचा अनुभवही आपल्याला वेगळ्या प्रकारच्या वाचानाचा आनंद देतो. सुप्रिया वकील यांनी या पुस्तकात अगदी ओघवता अनुवाद केला आहे. आयुष्य उत्सव आहे व सर्वत्र फक्त प्रेमच आहे असे मानणाऱ्या अनूंचा हा प्रवास वाचकाला वेगळ्याच जगाची सफर घडवतो.