माझे शेल्फ
अँड द माउंटन्स एकोड
अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं... आपण बहुतांश पौर्वात्य आपली घट्ट विणलेली कुटुंबसंस्था आणि शिस्तबद्ध पितृसत्ताक व्यवस्था याविषयी अभिमान बाळगतो. पण हे मजबूत वाटणारे धागे मळापासून गदागदा हलवले, उचकटून फेकून दिले तरीही उरतं माणसा-माणसांमधलं निखळ प्रेम, ममता आणि माणूसकी. हीच मूल्यं शेवटी महत्त्वाची असतात, हे ‘अॅण्ड द माऊंटन्स एकोड’ या कादंबरीत सांगितलंय. ‘द काईट रनर’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक खालिद हुसनी यांची ही तिसरी कादंबरी. दोन भावंडांची हृदय हेलावणारी कथा.ही कादंबरी म्हणजे अफगाणी खेड्यातल्या, आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावणाऱ्या घट्ट भावबंधाची कथा आहे. आशयघन आणि विस्तृतअवकाश असलेली, शहाणपण आणि माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेली ही कादंबरी माणूस म्हणून आपली व्याख्या करणाऱ्या मानव्याच्या खऱ्या अर्थाची लेखकाला असलेली गहिरी जाण अधोरेखित करते. एका छोट्याशा अफगाणी खेड्यात ही कथा सुरू होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला हा तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षांच्या अब्दुल्लाचं लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडतं त्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते. अनेक पिढ्यांमध्ये घडणारी ही कथा केवळ आईवडिलांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलची राहत नाही, तर भाऊ-बहीण, चुलत भावंडे, नोकर, मालक, विश्वस्त, पाल्य या साऱ्या नात्यांची होते. त्यांच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या, एकमेकांसाठी त्याग करण्याच्या नाना परी लेखक पडताळून पाहतो.कधी कधी मात्र कादंबरी वाचकाच्या संयमाची परीक्षा बघते. या ३७० पृष्ठांच्या कादंबरीचा अनुवाद वैजयंती पेंडसे यांनी केला आहे. अनुवाद प्रवाही आहे. परीकथेपासून सुरू होणारी ही कथा वास्तव आयुष्यदेखील परीकथेपेक्षा कमी चमत्कारिक नसतं हे सांगते. लेखक खालिद हुसनी यांनी ११ वर्षांचे असताना अफगाणिस्तान सोडला. काही र्वष त्यांनी फ्रान्समध्ये काढली. नंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथेच डॉक्टर होऊन स्थायिक झाले. २००१ नंतर स्वतच्याच देशात ते एखाद्या पर्यटकासारखे फिरले. तिथे त्यांना त्यांच्या कादंबऱ्या सापडल्या.