माझे शेल्फ
आंधळी
अपराजिता... वैगुण्यावर मात करून जीवन अर्थपूर्ण बनवणाऱ्या व्यक्ती या स्वत:बरोबर इतरांचंही जीवन सार्थ करून जातात. जगाच्या इतिहासात जिचं नाव अमर झालं आहे, अशी हेलन केलर याच दुर्दम्य आशेचं प्रतीक होती. हेलन केलर आंधळी, बहिरी आणि मुकी होती. पण आपल्या नाील जिद्दीच्या बळावर आणि कष्टांच्या मदतीने तिने आयुष्यातल्या सर्व उणिवांवर मात केली. जगातल्या सर्वच अपंगांना तिने जगण्याची खरी वाट खुली करून दिली. तिचं चरित्र कादंबरीच्या रूपाने कॅथरिन ओवेन्स पिअर्स हिने लिहिलं. याचा अनुवाद शांता शेळके यांनी ‘आंधळी’ या नावाने केला होता. हेलन केलरच्या जीवनाच प्रेरक आलेखच ही छोटेखानी कादंबरी मांडते. दोन वर्षांची असताना आलेल्या तापामुळे हेलनच्या दृष्टीवर आणि श्रवणशक्तीवर परिणाम झाला. तिला बोलताही आलं नाही. अशा मुलीचं पालनपोषण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. आसपासचे लोकही तिच्या आईला भविष्याबद्दल नाउमेद करीत. आई हाच हेलनच्या जगाशी असलेल्या संपर्काचा दुवा होता. हेलन सहा वर्षांची झाली तरी, तिला काहीच करता येत नसे. या मुलीला योग्य पद्धतीने शिकवलं तर ती चारचौघांसारखी जगू शकेल अशी आशा तिच्या आईला वाटत राहिली. कार्ल्स डिकन्सच्या एका पुस्तकात बोस्टनमधील ‘पार्किन्सन अंधशाळा’ हा संदर्भ वाचून, म्हणजे हेलनच्या आईला कुठेतरी आशेचा किरण दिसल्याप्रमाणे वाटलं.तिथल्या लॉरा खिस्तमन या अंध आणि मूक-बधिर मुलीबद्दल तिने वाचलं आणि आपल्या हेलनलाही स्पर्शाच्या भाषेची ओळख असल्याने तीही लॉराप्रमाणे शिकेल असा विचार तिच्या मनात चमकून गेला. हेलनला घेऊन केलर पतिपत्नी मग थेट वॉशिग्टनला डॉ. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलना भेटून आले. ब्रेल लिपीचा शोध लावणारे हेच डॉ. बेल. लॉराला ज्यांनी शिकवलं त्या डॉ. गिंडले यांच्या जागी आलेल्या मायकेल अॅनॅग्नॉस यांनी हेलनसाठी अॅन रुलिव्हन या चोवीस वर्षांच्या मुलीची निवड केली. ती स्वत: एक अंध बालिका म्हणून पार्किन्स शाळेत आली होती. पुढे शस्त्रक्रियेनंतर तिला थोडंफार दिसूही लागलं होतं. हेलनला शिकवण्यासाठी म्हणून अॅन तिच्या गावी येऊन दाखल झाली व आयुष्यभराचं नातंच या दोघींमध्ये जडून गेलं. मात्र हेलनला हाताळणं सोपं नव्हतं. तरीपण अॅननं हे आव्हान स्वीकारलं आणि एका तुसड्या, रागीट बालिकेला तिने स्पर्शाच्या भाषेची गोडी लावली. तिला जगाचा चेहरा माहीत करून दिला. या पुस्तकात हेलन आणि अॅन दोघींच्या नात्याचा सुंदर वेध घेण्यात आला आहे. शब्द म्हणजे काय हे समजल्यावर हेलनला नवेनवे शब्द शिकून घेण्याचा ध्यासच लागला. मग भाषा, गणित, वेगवेगळे विषय तिला खुणावू लागले. हेलनला शिकायची ओढ लागली. एका टप्प्यानंतर तिला बोलायचा ध्यास लागला. एका मर्यादेपर्यंत त्यात ती यशस्वीही झाली. हेलन हा एक चमत्कार होता. रंगभूमीवर कार्यक्रम करून ती जगासमोर गेली.देशोदेशी फिरून तिने अंधत्वाबद्दल आणि मुकेपणा, बहिरेपणा याबद्दल समाजात जागृती करण्याचा प्रयत्न केला. ही कादंबरी हेलन केलरच्या या कष्टांबरोबरच तिच्या शिक्षिकेचा, अॅनचा तिला शिकवण्याचा ध्यासही समोर ठेवते. या दोघींमधलं नातं आणि अॅनच्या मृत्यूपर्यंत हेलनने तिला दिलेलं प्रेम हा सगळा सुंदर प्रवास ही कादंबरी चित्रित करते. हेलनने अॅनचं चरित्रही पुढे लिहिलं आणि स्वत:च्या वैगुण्यावर तिने कशी मात केली होती हे जगापुढे आणलं. हेलन केलर आणि अॅन सलिव्हन यांची ही कहाणी प्रेरक आहे आणि मानवी जीवनातील एक रोमांचकारी पर्वच उलगडून दाखवणारी आहे.