मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अंतरिक्षाचा वेध

इंग्रजी शीर्षक
Antarikashacha Vedh
सारांश

भारतीय संशोधकांच्या चष्मातून अंतरिक्षाचा वेध... अंतरिक्षाचा वेध ‘हे पुस्तक म्हणजे डॉ. कार्ल सॅगन यांच्या ‘कॉसमॉस’ या पुस्तकाचा सुधा रिसबुड यांनी करून दिलेला परिचय आहे. विज्ञानावर आधारित साहित्य सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचवण्यात डॉ. सॅगन हे एक यशस्व लेखक मानले जातात. त्यांच्या ‘द ड्रॅगन ऑफ एडन’ या पुस्तकाला ‘पुलित्झर’ हा अमेरिकन साहित्यातल सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळाला आहे. व्हायेजर यानामध्ये जी कालकुपी ठेवण्यात आली, त्या कुपीतील माहिती तयार करण्यात डॉ. कार्ल सॅगन यांचे योगदान मोलाचे होते. शुक्रावरील ‘ग्रीन हाऊस’ परिणाम, मंगळावरील वादळे, टायटन भोवतालचे ढग, जिवाची उत्पत्ती, असे अनेक विषय डॉ. सॅगन यांच्या संशोधनामुळे समजण्यास साहाय्य झाले आहे. अंतराळ संशोधनातील ते पहिल्या प्रतीचे शास्त्रज्ञ मानले जातात. अणुयुद्ध झाले तर मागाहून उद्भवणारा आण्विक हिवाळा यावर त्यांनी संशोधन केले आहे. त्यांचे ‘कॉसमॉस’ हे पुस्तक अतिशय माहितीपूर्ण तसेच रंजक आहे. अतिशास्त्रीय माहिती त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या गाजलेल्या पुस्तकाचा परिचय सौ. रिसबुडांनी केलेला आहे. पण हा केवळ ‘कॉसमॉस’चा परिचय नाही तर भारतीय शास्त्रज्ञाने या विषयाचे योगदानही नमूद केलेले आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांबद्दलचा आपला अभिमान दुणावतो. उदाहरणार्थ, आधुनिक ज्योतिषविद्येचा जनक टोलेमी समजला जात असला तरी लगाध यांनी भारतीय खगोलशास्त्राचा पाया घातला. ते वेदांत ज्योतिषांचे मूळ लेखक म्हटले पाहिजे, असे सौ. रिसबुडांनी नमूद केले आहे. (पृ.२७) त्याचप्रमाणे वैदिक काळातील प्रमुख खगोल निरीक्षक म्हणून विश्वामित्राचा उल्लेख करावा लागेल. गुरू या ग्रहाला ओळखण्याचे श्रेय. वामदेवांकडे जाते; तर शुक्र ग्रहाला शोधण्याचे श्रेय भृगूंचा मुलगा वेनभार्गव याला दिले जाते. पाश्चात्त्य संशोधकांनी निकोलस कोपर्निकस (‘ग्रहांची गती’ संबंधीचा सिद्धांत इ.स. १५४३) केप्लेर (हामर्नीज ऑफ द वल्र्ड - ग्रहांच्या परिभ्रमणातील सुसंगती संबंधीचे संशोधन) न्यूटन (गतीसंबंधीचे नियम) यांच्या संशोधनाचाही थोडक्यात उल्लेख केलेला आहे. सूर्याचे सामर्थ मानवी अनुभवापलीकडे आहे. ज्ञानेश्वरांनी ते जाणले होते. एका ओवीत ते म्हणतात – अगा सूर्योदये जालिया । सूर्ये सूर्येचि पाहावा धनंजया । तेवि माते तिया जाणावया मीचि हेतू ।। (अर्थ - हे धनंजया, सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजानेच सूर्य पहावा लागतो, त्याचप्रमाणे मला जाणण्याच मीच कारण आहे.) म्हणजे पाश्चात्त्यांचे संशोधन वाचकांपुढे मांडताना भारतीय संशोधक, संत, विचारवंत,परंपरा, बुद्धिमत्ता यांचे दाखले सौ. रिसबुडांनी दिल्याने पुस्तकाची खुमारी वाढली आहे. त्यांनी ‘कॉसमॉस’चे शब्दश: भाषांतर दिले असते तर ते सामान्य वाचकाला कळले नसते व विवेचन कंटाळवाणेही झाले असते. आणखी एक उदाहरण देतो. अनंताची कल्पना भारतीय तत्त्वज्ञांना फार प्राचीन काळापासून ज्ञात होती. ‘अनंत’ म्हणजे काय, याचे नेमके वर्णन भास्काराचार्य (दुसरे) यांनी अचूक मांडले आहे. (इ.स. ११५० च्या सुमारास) ‘खहर राशी म्हणजे अनंत’ असे ते म्हणतात. अस्मिन्विकार: खहरेण राशावपि प्रविष्टेष्वपि नि:सृतेषु । बहुष्वपि स्यल्लयसृष्टी काले ऽ नन्तेऽच्युते भूतगणेषु यद्वत् ।। (ज्याप्रमाणे सृष्टी व्युपत्ती आणि प्रलय काळाच्या समयी, अनंतजीव ब्रह्मातून येतात आणि जातात; परंतु तो (ब्रह्म) मात्र अनंतच राहतो. त्याचप्रमाणे अनंत ही संख्या आहे, त्यात काही वाढवले आणि कमी केले तरी फरक पडत नाही.) सौ. रिसबुडांची शैली कशी ओघवती आहे. याचा नमुना द्यावासा वाटतो. ‘ग्रह-ताऱ्यांचे जीवन’ (पृ. १३२-१४८), या प्रकरणात त्या म्हणतात, ‘नुकतेच जन्मलेले विश्व काही काळ प्रकाशाने व्यापले गेले होते; परंतु काळाच्या ओघात ते निवळले आणि दृश्य प्रकाशाच्या दृष्टीने ते अंधारमय झाले होते. स्थलरूपी धागे, कापड ताणले गेले.नूतन अवस्थेतील विश्वात हायड्रोजन व हेलियम हे दोन्ही वायू अस्तित्वात आले होते. बघण्याजोगे असे त्या विश्वात काहीच नव्हते. (बघायला तरी कुणी होते का?) कालांतराने विश्वाच्या पोकळीत वायूचे मेघ जमा झाले. ते वाढू लागले. त्यानंतर तारे, ग्रह, आकाशगंगा, दीर्घिका निर्माण झाल्या. या पुस्तकात (१) विश्वसागराचा किनारा (२) अंतरिक्षाचा वेध (३) पृथ्वीवरील उत्क्रांतीची वाटचाल (४) खगोलशास्त्राचे शिल्पकार (५) सूर्याची ग्रहमाला (६) मंगळाचे अंतरंग (७) गुरू व शनिकडे झेप (८) युरेनस व नेपच्यूनच्या दिशेने (९) झेप ताऱ्यांकडे (१०) स्थलकालातील प्रवास (११) ग्रह-ताऱ्यांचे जीवन (१२) सीमोल्लंघन (१३) उत्क्रांत मानव आणि देवमासा (१४) अनंत आमची ध्येयासक्ती (१५) विश्वाचे आर्त. अशी एकूण पंधरा प्रकरणे आहेत. त्यापैकी ‘सूर्याची ग्रहमाला’ व ‘मंगळाचे अंतरंग’ ही दोन प्रकरणे अनुक्रमे २४ व २३ पृष्ठांची आहेत. अन्य प्रकरणे साधारणपणे १०-१५ पृष्ठांची आहेत.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
150
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
9788177666274
समुदायाने जोडले
बंद