माझे शेल्फ
अराइज, अवेक
रश्मी बन्सल यांनी दहा तरुण उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या लिहिल्या आहेत. महाविद्यालयाची पदवी मिळताक्षणी स्वत:चे उद्योग स्थापन करणारे हे उद्योजक. ‘बेवकूफ ब्रँड्स’ अशा अजब ब्रँडचे निर्माते प्रभाकिरणसिंग आणि सिद्धार्थ मुनोत, ‘भुक्कड’ या नावानं तरुणां्या पोटभरीचा उद्योग करणारा अरुज गर्ग, वैद्यकीय अहवाल संगणकावर ऑनलाईन उपलब्ध करून देणारे शशांक एन. डी. आणि अभिनव लाल असे अनेक उद्योजक या पुस्तकात भेटतात. त्यांचा हा सगळा प्रवास आणि त्यांची मतं वाचनीय आहेत. सुनीती काणे यांनी अनुवाद केला आहे.
अराइज, अवेक हे तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त करणारं आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. विविध युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू केले. त्या व्यवसायाची संकल्पना त्यांना कशी सुचली, कल्पना सुचल्यावर त्यांनी काय केलं, भांडवल कसं उभं केलं, आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी केली, त्या व्यवसायाला लोकांचा (गिह्राईकांचा) कसा प्रतिसाद मिळाला, आपलं उत्पादन तयार करताना, त्याची जाहिरात करताना, तसेच आर्थिक बाबतीत किंवा अन्य स्वरूपाच्या त्यांना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली याचं सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. कोणी डॉक्टरांसाठीचं सॉफ्टवेअर तयार केलं, तर कोणी सिमेंट काँक्रीटच्या विटा, कोणी पूजा किट्स तयार केली, तर कोणी टी शर्ट्स, कोणी कॅपचावर लक्ष केंद्रित केलं, तर कोणी कॉम्प्यूटर सायन्स शिकवण्यावर, अशा अनेक युवा उद्योजकांच्या या प्रेरणादायी कथा युवा वर्गाने आणि सगळ्यांनीच अवश्य वाचाव्या अशा आहेत.