माझे शेल्फ
अर्धदशक
‘अर्धदशक’ ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात आलेला कादंबरीचा नायक मोहन, करमरकर मॅडमशी केलेली मैत्री त्याला गोत्यात आणते. एकूणच, मोहन आणि त्याचे मित्र पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे तीन अडथळे कसे पार करतात याचं वास्तव आणि उत्कंठावर्धक चित्रण करणारी ही कादंबरी आहे, जी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता अधोरेखित करते."अर्ध दशक - एमपीएससी दिलेल्या प्रत्येकासाठी" खरंच नाव सार्थ करणारे हे पुस्तक. सदाशिव, शुक्रवार, नारायण, नवी या पेठांमधील प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्याचा एक भाग म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकातील पात्रे म्हणजे या मुलांना त्यांच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना च्या परिस्थितीचे प्रतिबिंबच. या पुस्तकातील काही पात्रे, काही प्रसंग मला माझ्या स्वतःच्या आयुष्यात सापडले आहेत. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या सर्व छटा यात वास्तववादी पद्धतीने रंगविलेल्या आहेत. कोणत्याही वळणावर त्या अतिरंजित वाटत नाहीत. यातील सर्व पात्रे एकदम Realistic आहेत मग ते अभ्यास करून पोस्ट न मिळाल्याने गांजून गेले सीनियर चौगुले असो वा तेवढाच अभ्यास अपयशातही कूल असणारे सीनियर भोसले असोत, चांगल्या घरातला एमपीएससीचे बॅकग्राऊंड असलेला अजय असो किंवा अथांग गरिबी आणि अपुरी साधनसामग्री तरी जिद्दीने लढणारा बबन असो ( बबन सारखी मुलं कमीच असतात पण असतात ) वा पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा अवघड असल्याने नाद सोडून पीएसआय करणारा रघु असो वा कमी बुद्धी पण मेहनत अन आत्मविश्वासाने अभ्यास करणारा गौतम असो किंवा वडिलांच्या आग्रहाखातर आणि फक्त टाईमपास करायला अभ्यासिकेत येणारी आसावरी असो वा एमपीएससी जास्त सिरिअसली न करता बँकिंगचा अभ्यास करणारा मोडक असो. सर्व पात्र ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी जुळणारी आहेत आणि त्यानंतर येतो या कथेचा नायक मोहन , मोहन प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणार्या मुलाला त्याची स्वतःची आठवण करून देतो. त्याच्या आयुष्यातील प्रसंग हे प्रत्येक स्पर्धा परीक्षा दिलेल्या मुलाने त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी अनुभवलेले मग त्याचा एमपीएससी करण्याचा निर्णय असो वा त्याचा पुण्याला येताना प्रसंग, पुण्यात राहण्याचा त्याचा पहिला दिवस, अभ्यासाचे प्रसंग, निकालाचे सुख दुःखाचे प्रसंग क्लासमधील गमतीजमती, त्याच्या मित्राच्या निकालाचे आणि सेलिब्रेशनचे प्रसंग आणि एकेक वर्ष सरत गेल्यानंतर त्याच्या मनात निर्माण होणारे विचारचक्र. या विचारचक्राला स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी कधीच मुकला नाही. मग ते अपयशाने स्वतः बद्दल येणारी कीव अन नैराश्य असो व आई-वडिलांबद्दल वाटणारी काळजी असो व समाजातल्या चार चौघांची वाटणारी अनाठायी भीती असो. हे सगळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या आयुष्याचा आरसा या पुस्तकातून आपल्यापुढे उभा राहतो. पण खरंच हे पुस्तक वाचताना जाणवते की अजून आपण पेठेतच रहायला आहोत आणि सर्व आपल्या आजूबाजूला घडते आहे. पण यासाठी एक अट आहे की तुम्ही पुण्यात राहून एमपीएससीचा अभ्यास केलेला असावा. सर्व पात्रे आपल्या आयुष्यातीलच आहेत - फक्त नावे बदलली आहेत. आपण अजूनही अभ्यास करतोय आणि या पात्रांसोबत जगतोय अन असेच पुढे चालू राहावे..... निरंतर ......कधीच संपू नये असं.......कदाचित यालाच Nostalgia का काय म्हणत असावेत. या Nostalgia चा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने जरूर वाचावे.