माझे शेल्फ
अरुणाची गोष्ट
सध्या संपूर्ण भारतभर 2-3 प्रकरणांची चर्चा होतेय,ते म्हणजे निर्भया हत्याकांड व दोषींची फाशी,हैद्राबाद बलात्कार व आरोपींचे एन्काऊंटर, उन्नव बलात्कार प्रकरण. ह्या सगळ्या बातम्या वाचतांना,बघतांना एक घटना आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात.तिचे नाव अरुणा शानभाग.KEM हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या अरुणावर तिथल्याच एका वॉर्ड बॉय ने बलात्कार केला,त्यावेळी तिचा गळा लोखंडी साखळीने आवळल्या मुळे अरुणा कोमात गेली ती तब्बल 42 वर्षे. ह्या काळात तिचा भावी पती होणार असलेल्या डॉक्टर ने देखील साथ सोडली.पण जिवाभावाच्या मैत्रिणींनी तब्बल 42 वर्ष निरपेक्ष सेवा केली.तिच्या गुन्हेगाराला फक्त 7 वर्षे सजा झाली आणि तो मोकाट सुटला ह्या संघर्षाची कहाणी पिंकी विराणी यांनी शब्दबद्ध केलीय,तर मीना कर्णिक यांनी मराठी अनुवाद केलाय अवश्य वाचावे असे.लेखिका पिंकी विराणी यांनी अरुणा विषयीचा सगळा तपशील मिळवून लिखाण केले असल्याने वाचनीयता अधिक आहे. अगदी पहिल्या वाक्यापासून वाचक कथेशी एकरूप होऊन जातो. भाषाशैली इतकी प्रभावी आहे की, घटना डोळ्यांसमोर घडत असल्याचे जाणवते आणि आपण देखील या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याचा भास होतो. अरुणाची निरागसता, तिचे दु:ख-यातना व्यक्त करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. याचवेळी लेखिकेने ‘दया मरणाच्या’ विषयावर देखील मंथन केले आहे. आपल्याला मरण हवंय हे सुद्धा सांगता न येणाऱ्या अरुणाच्या भावविश्वात लेखिका आपल्याला सहजपणे घेऊन जाते. तिची प्रत्येक भावना आपल्यापर्यंत पोहोचवते.