माझे शेल्फ
आषाढ
रणजित देसाई हे मराठीतील एक मातबर लेखक. स्वामी आणि श्रीमान योगी या त्यांच्या कादंबऱ्यांनी ते जवळपास प्रत्येक मराठी वाचकापर्यंत पोचले. या दोन कादंबऱ्यांना व्यावहारिक यशही खूप लाभलं. या कादंबऱ्याखेरीजही त्यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली आणि थासुद्धा लिहिल्या. परंतु एवढं चौफेर लेखन करूनही आज ते जास्त परिचित आहेत ते स्वामीकार म्हणूनच! खरं तर स्वामीकारांच्या कथा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अगदी या माती संस्कृतीमधली त्यांची अस्सल माणसं, त्यांची सुखं-दु:खं, त्यांचं जीवन याचे अत्यंत सुरेख चित्रण देसाई करतात. त्यांची कथाकथनाची शैली सरळ पण फार आकर्षक आहे. तिला उपमा-अलंकाराचा फाजील सोस नाही. जे त्यांना दिसलं भावलं त्याचं चित्रमय शैलीमध्ये अत्यंत वाचनीय असं चित्रण देसाई करतात. काही वेळा त्यांच्या कथा या त्या-त्या प्रदेशापुरत्या न राहता त्या सर्वव्यापी बनतात. अलीकडेच देसाई यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. हे कथासंग्रह देसाई यांच्या कथा लेखनाची सारी वैशिष्ट्य ठळकपणे दर्शविणारे आहेत. या तीन कथासंग्रहांमध्ये एकंदर चोपन्न कथा (प्रत्येकी अठरा) आहेत. यापूर्वी जाण आणि कणव हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. याच संग्रहातील कथांची विषयदार (देसाई यांच्या म्हणण्यानुसार) निवड करून त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या चोपन्न कथांमधील काही कथा खरोखरच लघुकथा म्हणता येतील अशा आहेत. आणि तरीही परिणामकारकतेत त्या कमी पडत नाही. भोग, दुष्काळ यासारख्या कथा परिस्थितीचा किती जबरदस्त काच माणसाला असतो याचं दर्शन घडवणाऱ्या आहेत. तर मी आमदारकी का सोडली? भांडवलदार का राहिले? या अगदी वेगळ्या धाटणीच्या कथा आहेत. पूर नावाच्याच दोन कथा वैशाख आणि मेघ या कथासंग्रहात आहेत. दोन्हींची शीर्षके एक असली तरी मांडणी आणि परिणाम वेगवेगळा आहे. वैशाख संग्रहातील रक्त, मरण, शाळा या कथा अधिक स्मरणात रहाणाऱ्या आहेत. हे तीनही संग्रह रणजित देसाई यांच्या कथांचे सार विशेष उत्तमपणे मांडणारे आहेत. हे नक्की.
ह्या लेखनप्रपंचात त्यांना स्वत:ला भरपूर आनंद मिळाला असणार, कारण तो आनंद या लेखनात पुरेपूर उतरला आहे आणि तो आपल्यापर्यंत नेमका पोचतो. हा विषय नावीन्यपूर्ण आहेच, शिवाय घाटेंच्या भाषेत लालित्य आहे. विज्ञानासारखा विषय,तोही जुन्या काळच्या विज्ञानाविषयक, असा कोणताही आवेश न ठेवता सहजसुंदर भाषेत वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. या अनोख्या अनुभवासाठी ‘आपल्या पूर्वजांचं विज्ञान’ वाचायलाच हवं!