माझे शेल्फ
आठवणींचे मोती
महायुद्धाच्या अशाही आठवणी... होलोकास्ट अर्थात ज्यूंचा नरसंहार, दुसऱ्या महायुद्धातील एक काळा इतिहास. हिटलरच्या सत्तापिपासू वृत्तीतून जन्माला आलेला हा प्रकार इतका भयंकर होता की, नाझी फौजांनी जिंकलेल्या प्रत्येक प्रदेशातील जनता भयभीत होत असे. १९३९ सालीझेकोस्लोव्हाकियावर जर्मन फौजांनी कब्जा मिळवला तेव्हा तेथील लोकांमध्येदेखील हीच भावना होती. डायमंड कुटुंबीय त्यांपैकीच एक. नाझींच्या हाती लागून छळछावणीत अडकून पडण्याची, तेथेच प्राण गमावण्याची भीती त्यांनाही होतीच. हजारो बालकेदेखील याच भीतीच्या छायेत होती. पण एका सद्गृहस्थाने प्रचंड मेहनत करून त्यांपैकी ६६९ बालकांना थेट ब्रिटनला नेले. त्यापैकीच एक म्हणजे व्हेरा गिसिंग. म्हणजेच या पुस्तकाची लेखिका. झेकोस्लोव्हाकियात असताना नाझींचा हल्ला, तेथून निघून ब्रिटनला आल्यानंतर नव्या कुटुंबातील वास्तव्य, तेथील पुढील आयुष्य असा सारा प्रवास लेखिकेने या पुस्तकात मांडला आहे. हा केवळ लेखिकेचा प्रवास नाही. तिच्या वाट्याला आलेले दु:ख हे त्याकाळच्या संपूर्ण समाजाचे चित्रण आहे. लेखिकेने जरी स्वत:चा प्रवास मांडला असला तरी त्यात केवळ स्वत:च्या दुखण्याखुपण्याला प्राधान्य दिलेले नाही. व्हेराने तिच्या ब्रिटनमधील सुरुवातीच्या वास्तव्याच्या साऱ्या नोंदी रोजनिशी स्वरूपात मांडून ठेवल्या आहेत. ब्रिटनमध्ये ती तिच्या दत्तक आई-वडिलांबरोबर राहत असली तरी तिची मूळची ओढ तशीच आहे. झेक भाषा, तिचे मूळ गाव याची ओढ तिला सतत छळत असते. देश सोडून आई-वडिलांपासून ताटातूट झालेली मुलगी काय विचार करते याचे प्रत्यंतर तिच्या डायरीत दिसून येते. नंतरच्या काळात तिचा आई-वडिलांबरोबरचा पत्रव्यवहारदेखील या पुस्तकातून उलगडत जातो. व्हेराने तिचे हे सारे अनुभव, रोजनिशी, पत्रे सारे पुस्तकरूपाने १९८८मध्ये ‘पल्र्स ऑफ चाइल्डहूड’ या नावाने प्रकाशित केले आणि यामुळेच ज्या व्यक्तीने त्या ६६९ बालकांना वाचवले तो माणूसदेखील प्रकाशात आला. त्याचे नाव होते निकोलस विन्टन. तो ब्रिटनमधील एक शेअर व्यावसायिक होता. व्हेरा ही त्याने सुटका केलेल्या बालकांतील पहिली ‘मुलगी’. पुढे ती सर्व ६६९ बालके ही विन्टनची मुले म्हणून ओळखली जाऊ लागली. विन्टनला नंतर अनेक मानसन्मान मिळाले. व्हेराची ही कथा अशा साऱ्या आठवणींचा एक मस्त कोलाज आहे. दु:खातून सुखद स्मृतींना जन्म देणारी ही सत्यकथा आहे.