माझे शेल्फ
अवनी एक नवी
स्व-शोधाचा मार्ग... मन एकाग्र करण्यात षड् रिपूंमुळे अडचणी येतात. या षड् रिपूंमधील एखादा विकारसुद्धा माणसाला शांतता, स्वस्थता आणि आरोग्य लाभू देत नाही. हे सर्वच विकार मानवाच्या ठायी मोठ्या प्रमाणात असतील, तर त्याचे जीवन नरकयातनांनी भरून जाते, यात शंकच नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांना दूर सारणे सोपे नसले, तरी ते अशक्य नक्कीच नाही. ‘अवनी एक नवी’ या पुस्तकात लेखक एकहार्ट टोले हेच सांगू पाहतात. चेतना जागरणाचा प्रारंभ करण्यास आणि स्वत:चा शोध घेण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते. पुस्तकात एकूण १० प्रकरणे आहेत. ज्याला इथे संवाद म्हटले आहे. या वेगवेगळ्या संवादांत मनुष्याच्या दु:खाचे मूळ म्हणजेच षड् रिपू आणि त्यांच्याशी निगडित प्रसंग मांडले आहेत. त्यातून संदेश दिले आहेत. अस्मिता म्हणजे ‘मी पणा’ची जाणीव. परंतु, मीपणा हे आध्यात्मिक दृष्टीने अज्ञान आहे. आपण जेव्हा मी या शब्दाचा उपयोग करतो, तेव्हा बहुतेक वेळा आपला अहंकारच बोलत असतो. प्रत्येक व्यक्तीचा अहंकार स्वतंत्र असतो, असे लेखक सांगतात. आपल्या दु:खाचे, अस्वस्थतेचे मूळ अहंकारात आहे. ‘अहंकार असतो तरी कसा?’ याचा सविस्तर ऊहापोह करत लेखकाने अहंकाराची विविध रूपं आपल्यासमोर उलगडली आहेत. ‘अहंकाराची व्याधी रूप’, ‘अहंकार आणि कीर्ती’, ‘व्याधिग्रस्त अहंकार’, ‘अहंकारासहित कर्म आणि अहंकाररहित कर्म’ अशा कित्येक पाठांतून आपल्यातील अहंकाराची जाणीव, ओळख लेखकाने करून दिली आहे. अहंकार दूर करण्यासाठी महत्त्वाची आहे ती जाणीव, स्वत:ची, स्व-अस्तित्वाची. मानवाला एकदा आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली, त्याचं अवधान जागृत झालं, की स्वत:तील दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत, याचे आकलन त्याला होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागते. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचे त्यांना भान नसते. आपण सदाचारी होण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र जोवर चेतनेचे परिवर्तन होत नाही. तोपर्यंत प्रयत्न यशस्वी होत नाहीत. ज्यांना हे भान असते त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. ही जाणीव जागृत करण्याचे काम अनेक संत महात्म्यांनी केले आहे. त्याचीही शिकवण पुस्तकात ओघाने येते. उपनिषदे, बौद्ध वाङ्मय, चिनी अध्यात्म, जे. कृष्णमूर्ती आणि खिस्त साधना या सर्वांचे संदर्भ लेखकाने दिले आहेत. त्यातून त्यांचा इतर धर्मांचा सखोल अभ्यास दिसून येतो. जुन्या काळापासून जपलेल्या आणि जागृत असलेल्या प्रत्येकाच्या सूक्ष्म शरीरातल्या नकारात्मक भावनांना लेखकाने व्यथाशरीर हे नाव दिले आहे. हे सांगतानाच लेखक आपल्या अशांत मनातील वेदना संपवण्याचा मंत्र देतात. सृष्टी विकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणे आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. पुस्तकाचा अनुवाद नीलिमा जोशी यांनी केला आहे. लेखकाचे मुद्दे अथवा प्रेरणा तितक्याच प्रभावीपणे आणि परिपूर्ण शब्दांत त्यांनी मांडल्या आहेत.
आतापर्यंत १४ निवडक,चांगली, प्रसिद्ध लेखकांची पुस्तके या चॅनलवर पाठवली आहेत.तुम्हाला पुस्तके आवडली असतील अशी आम्हाला आशा आहे आणि अजुन चांगली पुस्तके पाठवण्याचा प्रयत्न करु.🙏