मुखपृष्ठ
आयुष्याचा अंतिम संस्कार

माझे शेल्फ

आयुष्याचा अंतिम संस्कार

इंग्रजी शीर्षक
Aayushyacha Antim Sanskar
सारांश

फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’. फिलिप गूल्डना कॅन्सरचं निदान झालं आणि सुरू झालं उपचारांचं सत्र आणि वेदनांचा प्रवास; पण या वेदनामय प्रवासातही सकारात्मक राहून त्यांनी त्यांच्या उपचारांविषयी, त्यांच्या त्यावेळच्या मन:स्थितीविषयी वर्तमानपत्रात लेखमाला लिहिली आणि त्याच लेखमालेचं नंतर पुस्तक झालं ‘व्हेन आय डाय’. त्यात त्यांच्या मुलीने आणि पत्नीनेही गूल्ड यांचं आजारपण ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिलं आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलं आहे डॉ. अजेय हर्डीकर यांनी ‘आयुष्याचा अंतिम संस्कार’ या शीर्षकासह. इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रमुख स्ट्रेटेजिस्ट असलेल्या फिलिप गूल्डला २९ जानेवारी २००८ रोजी कॅन्सर झाला असल्याचं समजतं. या आजाराला धीरोदात्तपणे सामोरं जाण्याचा निर्धार त्यानं केला. यामध्ये त्याला पत्नी गेल रेबक आणि जॉर्जिया व ग्रेस या त्याच्या दोन मुलींचा तसेच मित्र परिवार आणि नातेवाइकांचा आधार मिळाला. दोन वर्षांच्या काळात शस्त्रक्रिया आणि क्लेशकारक केमोथेरपीनंतर, सर्व चाचण्यांमधून कॅन्सर लुप्त झाल्याचं आढळलं; पण जेमतेम सहा महिन्यांनंतर कॅन्सरचं पुनरागमन झाल्याचं निष्पन्न झालं. मृत्यूच्या दिशेनं एका प्रदीर्घ आणि यातनापूर्ण प्रवासाची सुरुवात झाली; परंतु हा प्रवास आशेवर आधारित होता. या काळात त्यानं स्वत:च्या आयुष्याचा कार्याचा आणि नातेसंबंधांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या शेवटच्या काही महिन्यांत लिहिल्या गेलेल्या या पुस्तकामध्ये फिलिप त्याच्या आजाराचं वर्णन करतानाच मृत्यूकडून शिकलेले धडे उलगडून दाखवतो. फिलिपच्या विचारांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचं मनोगतही समोर येतं. अत्यंत सुंदर शब्दांत लिहिलेलं आणि मनाला उभारी देणारं असं हे पुस्तक हेलावून सोडणारं आणि प्रेरणादायीसुद्धा आहे. मृत्यूच्या समीप असताना आपल्या भावना, अनुभव शब्दबद्ध करणं अवघड आहे; पण फिलिप यांनी ते अवघड काम करून कर्करोगाच्या रुग्णांना सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. कर्करोगग्रस्त रुग्णाच्या नातेवाइकांनाही किती यातनामय स्थितीतून जावं लागतं, याचंही वास्तव चित्रण या पुस्तकात आलं आहे. गुल्ड यांच्या सकारात्मकतेचा प्रत्यय देणाऱ्या या काही ओळी - मृत्यूमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. यात तुम्ही जर नजीकच्या काळात मरणार असाल तर उरलेल्या आयुष्याला जास्तच उत्कटता प्राप्त होते. जीवन कल्पनातीत मौल्यवान बनतं. केवळ तुमचे थोडेच दिवस शिल्लक असतात म्हणून नव्हे, तर या काळातले अनुभव तुम्हाला परिपूर्ण असल्याचं जाणवतं म्हणून. हे अनुभव तुमचं आयुष्य व्यापणारे आणि उजळून टाकणारे ठरतात. फिलिप यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना डॉ. अजेय हर्डीकरांच्या कुशल अनुवादामुळे वाचकांपर्यंत परिणामकारकतेने पोचतात. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
144
भाषा
मराठी
किंमत
180.00
ISBN
9789353171902
समुदायाने जोडले
बंद