माझे शेल्फ
बाबुलमोरा
बाबुलमोरा भरजरी, मखमली कथा संग्रह... सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रणजित देसाई यांचे वाङ्मय प्रसिद्ध करण्याची देखण्या आणि आकर्षक स्वरुपात पेश करण्याची बरीचशी कामगिरी पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने घेतली आहे. त्यांनी रणजित देसार्इंच्या कथांचे तीन संग्रह प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी ‘बाबुलमोरा’ ही रागदारीच्या गाण्याचा मुखडा असलेला एक कथा संग्रह आहे. ‘स्वामी’कार रणजित देसाई हे कादंबरीकार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके कथाकार म्हणून वाचकांना कमी परिचयांचे आहेत. परंतु त्यांच्या लेखनांचा बहर जरी कादंबऱ्यांमधून अधिक जाणवत असला तरी त्यांची प्रतिभेच्या क्षेत्रातली मुलुखगिरी कथा लेखनानेच झाली. यापूर्वी त्यांचे दोन तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. पण त्यांतील कथांचे सामाजिक, ग्रामीण, निसर्ग, संगीत कथा असे वर्गीकरण करून त्यांचे संग्रह प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते. आता मेहता पब्लिकेशनने हे वर्गीकरण करुन त्यांचे तीन कथा संग्रह प्रसिद्ध केले आहेत. या त्यांच्या कथा विश्वातील ‘बाबुलमोरा’ हा काहीसा भुतकाळातील ऐतिहासिक (खरे तर वाङ्मयीनदृष्ट्या ही वर्गवारी चूकच आहे) व संगीताच्या प्रांतातील कथांचा ‘‘बाबुलमोरा’’हा संग्रह या देसार्इंच्या वाङ्मयांच्या पैलूचे दर्शन घडवून जातो. या संग्रहातील सर्वच कथांना एकप्रकारचा खानदानी भरजरी व मखमली असा भावनात्मक स्पर्श आहे. मराठी कथांच्या क्षेत्रात अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ यांनी सुरुवातीला अनेक नवनवीन प्रयोग करुन एका अर्थाने नवे मन्वन्तर घडवून आणले. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वच नूतन लेखकांनी ‘कथा’ प्रधानतेशी नाते विलग करीत करीत नव्या वाटा यशस्वीपणे चोखाळल्या आहेत. परंतु रणजित देसार्इंच्या या संग्रहातील कथा या जुन्या घटना प्रधान वाटेनेच जातात. त्यांत काही कथा या इतिहासातील घटनांशी संबंधित आहेत. ‘वेडात दौडले सात’ या अशा सोळा कथांमधील पाच कथांपैकी प्रातिनिधीक कथा. मराठ्यांचे एक सेनापती प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमांची गाथा या कथेत शब्दबद्ध केली आहे. या पाचही कथांमध्ये रेखाटलेल्या व्यक्तिरेखा त्यांच्या नावाने आपणास ज्ञात असल्या तरी त्यांच्या जीवनातील स्वभाव वैशिष्ट्यांचा लेखकाने घेतलेला आढावा चमत्कृतीजन्य असला तरी त्यातली पूर्वग्रहीत गौरव पूजाही आपणाला काहीवेळा पारंपारिक वाटते. शब्दांच्या साह्याने रेखाटलेली व्यक्ती चित्रेही वाचनीय झाली असली तरी अंत:करणाला भिडत नाहीत. त्यातली कलाकुसर देखणी वाटते इतकेच. कथा संग्रहाच्या सुरुवातीची नादतरंगा ही कथाही कलावंत आणि राजकन्या यांच्या भावविश्वाचे चित्रण करणारी असली तरी खूप पौराणिक धाटणीची आहे, परंतु ‘अवशेष’मधील संस्थांनिकांच्या व्यथा वास्तव असल्या तरीसुद्धा खानदानी परंपरेचे होत असलेले दर्शन व्यक्तभूत आणि इतिहासाला अधिक जवळकीचे वाटते. या सात कथानंतर संगीताची मैफील सुरू होते. अज्ञात गवय्यांच्या जीवनासंबंधीच्या या कहाण्या आहेत. सैगलच्या आवाजातील ‘बाबुलमोरा’मधील मखमली, अलवार स्पर्श या बहुतेक सर्वच कथांचा आहे. याचा अर्थ असाही आहे की संगीताशी, संगीत साधनेशी नात सांगणाऱ्या कथा वास्तवाशी नाते सांगणाऱ्या आहेत. संगीताचीच नव्हे तर सर्वच कलांचे जे जे आविष्कार आहेत मग ती चित्रकला असो, शिल्पकला असो, वादन नैपुण्य असो वा अन्य चौसष्ट कलांचे क्षेत्र असो, तेथे तेथे भारतीय संस्कृतीतील राष्ट्रीय एकात्मतेचे मनमोकळे दर्शन घडते. महंमद रफी, तलत यांची जात कुणी विचारीत नाही. पंडीत पलुस्करांच्या आत्मपात कुणी जातीयतेचा सूर न धुंडाळता मनसोक्त दाद सारेच देतात. आज कलांचे हे एकच राज्य असे आहे की ते भारतीय आहे एकात्म आहे. रणजित देसार्इंच्या संगीताच्या प्रांतातील हळुवार भावनांचे दर्शन घडत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जाणिव किती ‘गहरी’ आहे याची सुप्त जाणीव होत राहते आणि वाटते ‘मिले सूर हमारा’ फक्त तो सूर अंत:करणाच्या गाभाऱ्यांतून बाहेर पडलेला हुंकार असला पाहिजे. रणजित देसार्इंच्या या कथा वाचताना या कलाक्षेत्रातील जीवनांचे हळुवार, मखमली समर्थ दर्शन तर घडतेच पण सैगलच्या सुरांचा ‘बाबुलमोरा’ ‘नैहर छुटोरे जाय’मधली व्याकुळताही मधुरपंखी स्पर्शाने मनमोहक वाटते.