माझे शेल्फ
बेधुंद
तरुणाईच्या वादळी लाटा : बेधुंद तरुणाई म्हणजे एकीकडे उत्साह , आनंद , दुसरीकडं अत्यंत आक्रमक अन हिंसक . त्यामुळे तिला योग्य दिशा मिळाली नाही तर ती किती भयावह रूप धारण करू शकते , स्वतः चेच नुकसान कसे करते , हे अविनाश लोंढे यांची बेधुंद कादंबरी सागते . तेही तरुणाईच्या विशिष्ट , सळसळत्या , वादळी भाषेत . त्यामुळे नाविन्यपूर्ण , वाचनीय तर झालीच आहे , शिवाय सध्या वीस -पंचीविशीत असलेला मराठी तरुण स्वतःला कोणत्या दिशेने घेऊन जात असावा , चारित्र्य ह्या विषयी मुले तर सोडाच मुलींच्या संकल्पना काय आहेत , याचाही अंदाज येतो . तारुण्य प्रत्येकाला हवंहवंसं असतं . कारण त्या काळात शरीरात , मनात अभूतपूर्व ऊर्जा असते . विचारांचा प्रवाह नुसता खळखळत असतो , ओसंडून वाहत असतो . त्या विचारांच्या बळावरच तो प्रत्येक्ष कृती करतो . त्यातून त्याचे व्यक्तिमत्व ठरत असते . तो जीवनात पुढे नेमके काय करणार याची पायाभरणी तारुण्यातच होत असते . शहरी संस्कृतीमध्ये अशा पायाभरणीचे मुख्य स्थळ म्हणजे कॉलेजातील लाईफ . तेथे दिवसाकाठी अक्षरशः शेकडो घडामोडी होत असतात . अभ्यासाच्या निम्मिताने नजरेला नजरा मिळतात . काहींच्या स्वतंत्र नजरा तयार होतात . काहींच्या कायमस्वरूपी भरकटून जातात . आणि कॉलेज लाईफ मध्ये हॉस्टेल हे एक स्वतंत्र जग आहे . तेथेही घडामोडी होतात . पण , त्यात भानगडीच जास्त असतात . गेल्या काही वर्षात कॉलेजात आणि होस्टेलात भानगडी धोकादायक वळणावर पोहचल्या आहेत . तरुणाई म्हणजे मौजमस्ती , धिंगाणा , सेक्स , भरपूर दारू पिणे अशी संस्कृती तयार होऊ लागली आहे . आपल्यावर देश , समाज घडवण्याची जबाबदारी आहे , असं तरुणांनी मानलेच पाहिजे असं नाही मी पण किमान आपल्यामुळं कोणाचं नुकसान होणार नाही , समाज बिघडणार नाही , याची काळजी घेतली पाहिजे . दुर्दयवाने ते होताना दिसत नाही . केवळ भौतिक सुखाच्या मागे धावाधाव सुरु आहे . प्रेम म्हणजे शारीरिक संबंध असा समाज सोशल मीडियामुळे होत चालला आहे . मोठ्या शहरांमधील कॉलेजेस , होस्टेल्स हाऊसफुल्ल आहेत . शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे . शिक्षक म्हणजे गुरु ही भावना पालकांमध्ये राहिलेली नाही , शिक्षकांमध्येही नाही . त्याचे एक -एक परिणाम दिसणार आहेत , ते कसे असू शकतील , याचा अंदाज मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केलेली बेधुंद वाचताना येतो . एकेक प्रसंग अस्वस्थ , चिंताग्रस्त करून टाकतो . दुसरीकडं काही भरकटणारी मुलं विशिष्ट क्षणी भानावर येतात . उत्तम शिक्षण घेऊन स्वतः च जीवन घडवण्यासाठी चालू लागतात , हे पाहून मनात आशावादही जागृत होतो . लेखक लोंढे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील वेणेगाव येथील , सध्या इथिओपिया मध्ये कोकाकोला कंपनीत प्रोजेकट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत . खरगपूर आय आय टी मधून एम . टेक . ची पदवी त्यांनी मिळवली आहे . पण त्यांचा मूळ पिंड लेखनाचा , शब्दातून व्यक्त होत राहण्याचा आहे . तो त्यांनी जाणीवपूर्वक जपला आहे , असं बेधुंद ची एकशे ब्यायांशी पाने वाचताना जाणवत राहते . तरुणाईचे अध:पतन , कोसळत जाणं किती भयावह आहे , हे लोंढे यांच्या लेखनाचे मुख्य सूत्र आहे . त्यासाठी त्यांनी जयंत , अक्षय , सुरेश , समीर आणि अण्णा या पाच मित्रांच्या व्यक्तिमत्त्वांना एकत्र गुंफले आहे . पाच मित्र वेगवेगळ्या स्वभावाचे . प्रत्येकाच्या घरची आर्थिक स्थिती वेगळी . ध्येय , भावविश्वही वेगळे , त्यात प्रवेश करणाऱ्या मुली तऱ्हेवाईक . छांदिष्ट आणि टिपिकल भारतीयही . पाच मित्रांचे कॉलेज , हॉस्टेल मधील जीवन जसजसे पुढे जाऊ लागते , तसतशी त्यातील गुंतागुंत वाढत जाते , राडे होत जातात . जातीवाद कश्या पद्धतीने पोसला , पेरला जात आहे हे कळते . लैंगिक सुखासाठी काय काय केले जाते , हे समोर येत राहते , आणि एकाचवेळी अनेक अंगांना कोसळत जाणारे हिमप्रपात दाखवण्याकरीता लोंढे यांनी काही नाट्यमय , वेगवान प्रसंग रचले आहेत . पुढील पानावर काय असावं , अशी उत्सुकता लागून राहते .शिवाय शहरी मुलं - मुली जी खूप टपोरी , खूप हिंदीमिश्रित भाषा वापरतात , तीच ठेवली आहे . तिला उगाच प्रमाण मराठीमध्ये सांगण्याचा आटापिटा केलेला नाही . जे म्हणायचे आहे , ते साध्या , सोप्यासरळ भाषेत मांडले आहे . त्यामुळं अनेक पानावरील वर्णने अंगावर येतात , पण हे करताना मूळ कथानक भरकटणार नाही , हाणामारी , सेक्स विषयीची वर्णने बटबटीत , लांबलचक अश्शील होणार नाहीत , याची काळजी त्यांनी घेतलेली आहे . तारुण्य हे निसर्गाने दिलेले वरदान आहे . त्याचा योग्य वेळी , योग्य वापर केला नाही तर आयुष्य उध्वस्थ होते , हा संदेश वाचकांच्या मनात कोरण्यात ते यशस्वी ठरतात . मागच्या पिढीत सुहास शिरवाळकरांनी दुनियादारी कादंबरीत तरुणाईचे एक विश्व उभे केले होते . तसेच काहीसे लोंढे यांनी बेधुंद मध्ये केले आहे , असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही . एखाद्या चित्रपटाच्या पटकथेचा पाया यात आहे .