माझे शेल्फ
बेस्ट केप्ट सीक्रेट
रहस्य आणि थरार... काल्पनिक इंग्रजी साहित्याच्या दुनियेत जेफ्री आर्चर या नावाला लोकप्रियतेचं वलय आहे. वाचकांना गुंगवून टाकणारं कथानक, केवळ शब्दचित्रांतून डोळ्यांसमोर सहज उभी राहणारी पात्रे, सत्यघटना वाटावी अशा पद्धतीने ऐतिहासिक घडामोडीचा केलेला कल्पनविस्तार आणि कथाकथनाची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे आर्चर यांची प्रत्येक कादंबरी वाचकपसंतीच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी राहिली. प्रेम, द्वेष, ईर्षा, असूया, धैर्य आणि नैतिकता या मानवी भावभावनांची सांगड असलेल्या आणि नातेसंबंध, अर्थकारण, राजकारण यांची अचूक गुंफण घेऊन जन्माला आलेल्या आर्चर यांच्या कादंबऱ्या ‘बेस्टसेलर’ ठरतात. ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ ही याच धाटणीची कादंबरी. ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ या मालिकेतील हा तिसरा भाग. इंग्रजीत पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा मराठी अनुवाद काही महिन्यांपूर्वीच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला. लीना सोहोनी यांनी मराठीतून मांडलेली ही कादंबरी म्हणजे थरारप्रेमी मराठी वाचकांनी वाचावे असे पुस्तक आहे. एकूण सात भागांत प्रकाशित झालेल्या ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ मधून क्लिफ्टन आणि बॅरिग्टन या दोन कुटुंबाचा १९२० ते १९९२ या कालखंडातील प्रवास आर्चर यांनी वाचकांसमोर मांडला आहे. एका गोदी कामगाराचा मुलगा असलेला हॅरी क्लिफ्टन आणि ब्रिटिश उमराव कुटुंबात जन्मलेला गाइल्स बॅरिग्टन यांच्या आयुष्याभोवती ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ फिरत राहते. त्यांना केंद्रस्थानी ठेवून ‘ओन्ली टाइम विल टेल’ या पहिल्या भागातून सुरू झालेली ही कथा ‘द सिन्स ऑफ द फादर’ या दुसऱ्या भागात नवीन वळणे घेते आणि त्यातूनच ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ची पार्श्वभूमी तयार होते. त्यामुळे ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ वाचण्यापूर्वी आधीचे दोन भागांतील कथेशी वाचकांचा परिचय होणे गरजेचे आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या हॅरीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याची आई त्याला प्रतिष्ठित आणि महागड्या शाळेत घालते. येथेच हॅरीची भेट गाइल्स बॅरिग्टनशी होते. आडनावातील आद्याक्षरांच्या क्रमामुळे एकमेकांच वसतिगृह सहकारी बनलेले हे दोघे अल्पावधीतच जीवलग मित्र बनतात. गरीब-श्रीमंतीची मोठी दरीही त्यांच्या मैत्रीच्या आड येत नाही. इतकंच काय पुढे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गाइल्सची बहीण एम्मा हॅरीच्या प्रमात पडते आणि दोघे विवाहबंधनात अडकण्याचा निर्णयही घेतात. पण त्याच वेळी हे कथानक धक्कादायक वळण घेतं. ‘गाइल्सचा पिता ह्युगो याच्याशी आपला विवाहपूर्व शरीरसंबंध झाला होता. त्यामुळे तो कदाचित हॅरीचा पिता असू शकतो.’ असा गौप्यस्फोट हॅरीची आई मेसी करते आणि हॅरी-एम्माच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. हताश झालेला हॅरी पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याच्या तयारीसाठी एका अमेरिकन जहाजावर नोकरीस जातो. पण शत्रूच्या हल्ल्यामुळे त्या जहाजाला जलसमाधी मिळते. हॅरीचा मृत्यू झाल्याचे त्याच्या आईला कळविण्यात येते. मात्र प्रत्यक्षात हॅरी जहाजावरील दुसऱ्या एका सहकाऱ्याची ओळख धारण करून अमेरिकेत जातो. इकडे ब्रिटनमध्ये हॅरीशी झालेल्या शरीरसंबंधातून एम्मा मुलाला सेबेस्टीयनला जन्म देते. हॅरीचा मृत्यू झाला असावा, ही कल्पना सहन होत नसल्याने ती त्याचा शोध घेऊ लागते आणि तो शोध तिला अमेरिकेला हॅरीपर्यंत घेऊन जातो. दरम्यानच्या काळात सहकाऱ्याच्या गुन्ह्यासाठी हॅरीला झालेली अटक, तुरुंगात त्याने लिहिलेले पुस्तक, त्या पुस्तकाला भलत्याच व्यक्तीच्या नावाने मिळालेली प्रसिद्धी अशा घडामोडी घडत राहतात. हॅरी आणि एम्मा एकत्र आल्यानंतर ‘सारे काही सुमंगल झाले’ अशी परिस्थिती असतानाच गाइल्सचा पिता ह्युगो याचा मृत्यू होतो आणि ‘हॅरीचा पिता कोण’ हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो. वारसाहक्कानुसार ह्युगोची मालमत्ता आणि उमरावपद गाइल्सच्या आधी जन्माला आलेल्या हॅरीला मिळावे, असा सूर एका गटाकडून उमटू लागतो. दोन कुटुंबातील हा पेच ब्रिटिश संसदेपर्यंत पोहोचतो. ब्रिटिश संसदेने गाइल्सला ह्युगोचा वारसदार ठरवल्यानंतर आधीच्या दोन भागांतील हे कथानक ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ या भागात प्रवेश करते. गाइल्स हा ब्रिटिश संसदेत मजूर पक्षाचा खासदार बनला आहे. गाइल्स ह्युगोचा खरा वारस ठरल्यामुळे हॅरीवरील ‘अनौरस पुत्र’ असल्याचा कलंक मिटला आहे. आता तो एक प्रथितयश लेखक बनला आहे. त्याच्याशी लग्न झाल्यानंतर एम्मा बॅरिग्टन कुटुंबाच्या जहाज उद्योगाची प्रमुख बनली आहे. आधीच्या भागात केंद्रस्थानी असलेल्या या पात्रांचे आयुष्य सरळमार्गी जात असल्याने हॅरी-एम्माचा मुलगो सेबेस्टीयनचे आयुष्य ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’च्या केंद्रस्थानी येते. सेबेस्टीयनचे शालेय शिक्षण आणि किशोरवयात त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग तिसऱ्या भागातील ‘क्लिफ्टन क्रॉनिकल्स’ पुढे नेतात. पण या कथानकातही अनेक चढउतार, थरार, रहस्ये आहेत.