मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बीजिंगचे गुपित

इंग्रजी शीर्षक
Beijingche Gupit
सारांश

चीनमधल्या जुन्या आणि समकालीन व्यवस्थेचं चित्रण करणारी ही वेगळ्या प्रकारची कादंबरी. मैत्रिणीसाठी चीनचा शोध... जेन वाँग यांच्या पत्रकारिता अभ्यासकालीन घटना, त्या वेळचे त्यांचे जीवनमान, चिनी पद्धती आणि दिनक्रम यांवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक. महाविद्यालयीन जीवनात मैत्रिणीची चुगली करण्याची अनवधानाने झालेली चूक काही वर्षांनी लक्षात आल्यवर पश्चात्ताप झाल्याने आणि पापक्षालन करण्याच्या निमित्ताने त्या मैत्रिणीला एवढ्या मोठ्या चीनमध्ये शोधून काढणे, हा लेखिकेचा हेतू आहे. त्या दरम्यान इतर ही अनेक जुनी माणसे भेटणे, प्रत्येकाची भेट घेताना, ती ठरवताना होणारे अनेक अपेक्षाभंग, मनस्ताप, मानसिक त्रास, लेखिकेच्या या शोधकार्यात तिच्या कुटुंबाची कधी अनिच्छेने, कधी उत्साहाने मिळणारी साथ तसेच मुख्य शोधकार्यात अनपेक्षितरीत्या उलगडणारी अनेक रहस्ये, काही विलक्षण गंभीर काही उपयुक्त तर काही विनोदी आहेत. या सर्व गदारोळात जे घडलं ते कथानक म्हणजे या पुस्तकाचा मुख्य विषय. लिहिता लिहिता चीनची काही गुपितेही उघड करण्याची संधी लेखिकेने अनायसेच साधली आहे. किंबहुना चीनची काही गुपिते उघड करण्यासाठी हा विषय निवडला असावा. पुस्तकाचे शीर्षक आणि मुख्य कथानक यांचा संबंध एकमेकांशी मुद्दाम जुळवण्यात आला असावा असे जाणवते. माओवाद्यांचा अंमल सातत्याने जाणवत राहतो.आंतरराष्ट्रीय वार्ताहराला स्वत:चे काम करताना वैयक्तिक त्रासही बऱ्याच प्रमाणात होतो. उदा. एखादी विशिष्ट लक्षवेधी घटना लिहिल्यावर जे पडसाद जनमानसांत उठतात ते थेट घरापर्यंत जाऊन त्यांचे वैयक्तिक आयुष्य ढवळून काढतात. जेन वांग या उत्तम निरीक्षक आहेत हे काही वाक्यांवरून जाणवतं. त्यांनी चंद्रकोरीला नखाच्या तुकड्याची उपमा दिली आहे. शहरामधील घरांच्या सोनेरी रंगांच्या कौलावरून प्रकाश परावर्तित झाल्याने ‘ठिणग्या’ उडाल्याचा भास होतो. रात्रीच्या वेळी तर बीजिंग शहर एखाद्या प्रचंड व्हिडिओ गेमप्रमाणे दिसतं. तरुणाने नाईकेची सेलमधील जॉगिंग पॅन्ट घातली होती, हे अप्रतिम निरीक्षण आहे. लेखिकेच्या कॉलेजातील मँडरिन भाषेची शिक्षिका ‘फु मिन’ ही साम्यवादाची अतिआग्रही होती किंवा साम्यवाद हा तिच्या नसानसांमध्ये ठासून भरला होता. लेखिका त्या शिक्षिकेला हुकूमशहा म्हणत असे. चीनमध्ये लावल्या जाणाऱ्या पाट्यांची वर्णने वाचताना पुणेरी पाट्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. काही घटना अनावश्यक असल्या तरी चीनबाहेरील लोकांसाठी त्या अतिशय मजेदार ठरू शकतील. भाषांतरकार मोहन गोखले यांनी कथानक ओघवते ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. जेनच्या शोधाची आणि यीनच्या आयुष्याची चित्तवेधक आणि हेलावून टाकणारी कहाणी म्हणजे हे पुस्तक- बीजिंगचे गुपित.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
332
भाषा
मराठी
किंमत
350.00
ISBN
9789386175496
समुदायाने जोडले
बंद