माझे शेल्फ
ब्लूबर्ड - अ मेम्वार
निर्वासित मुलीचं आत्मकथन... ‘युद्धस्य कथा’ श्रोत्यांसाठी ‘रम्य’ असली तरी प्रत्यक्षात जे युद्धपीडित असतात त्यांच्यासाठी मात्र तो अनुभव एखाद्या अंतहीन नरकवासासमान असतो. मग ते दुसऱ्या महायुद्धातील छळछावणीतील यातनाकांड असो किंवा घरदार सोडून रातोरात परकया देशात पळून जाणं आणि निर्वासित म्हणून जगणं असो. दोन्हीकडे युद्धाची होरपळ सारखीच. म्हणूनच वेस्ना मरीच सारखी युरोपची नवोदित लेखिका ‘ब्लू बर्ड’ या तिच्या पहिल्यावहिल्या पुस्तकात युद्धग्रस्तांच्या कहाण्या शब्दबद्ध करते तेव्हा वाटतं, या विषयावरचं आणखी एक पुस्तक. या पुस्तकात व्यक्तिचित्रणं आहेत, कथा आहेत. आणि सगळ्यांना युद्धाची पार्श्वभुमी आहे. मानवी स्वभावातील विसंगती टिपून निर्माण होणारा विनोदही पुस्तकात ठायी ठायी दिसतो, हे लेखिकेचे सर्वांत मोठे यश. किंबहुना तिच्या लेखनशैलीची ती सर्वांत मोठी ताकद मानावी लागेल. हे पुस्तक वाचून कुणा अभागी विस्थापिताच्या ओठांवर हसू उमलेल. कुणी जगण्याची प्रेरणा घेईल तर कुणी नव्या उमेदीनं ‘द ग्लास इज हाफ फुल’ म्हणत आनंदाचं गाणं गात पुढं चालू लागेल. लेखिकेला मिळणारं तेच सर्वांत मोठं अॅवॉर्ड असेल."बोस्निया-हरझेगोविना या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाल्यावर लेखिका आणि तिची बहीण निर्वासित म्हणून इंग्लंडला आल्या. इंग्लंडला आल्यावर तिथली संस्कृती, राहणीमान हे आपल्यापेक्षा भिन्न आहे हे त्यांना समजले. या भिन्नतेमुळे लेखिका आणि तिची बहीण यांना अनेक मजेदार प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. त्याच स्मृतिचित्रांचे वर्णन लेखिकेने केले आहे. इंग्लंडसारख्या देशात बोलली जाणारी भाषा हेच सर्वांत मोठे आव्हान लेखिकेपुढे होते. वेळोवेळी सॉरी, प्लीज, थँक्यू सारखे शब्द वापरणे, हा त्यांच्यासाठी विनोदच होता. परंतु केवळ एकच वर्षात लेखिका ही भाषा सराईतपणे बोलू लागली. पुढे ती अनुवादाचे कामही करू लागली. अपरिचित, अनोळखी अशा ठिकाणी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी नाइलाजाने स्थलांतरित झालेली लेखिका इंग्लंडच्या संस्कृतीशी- वातावरणाशी एकरूप झाली. शिक्षणाद्वारा तिने आपली प्रगती साधली. बोस्नियाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नवे अनुभव घेत तिने इंग्लंडमधील संस्कृती आपलीशी केली. या तिच्या जीवनप्रवासाचे वर्णन तिने तिच्या शब्दांत मांडले आहे.