माझे शेल्फ
बोचका
फुटपाथवरच्या कुटुंबाची व्यथा आणि कथा... मुंबईतली लाखो कुटुंबे अत्यंत घाणेरड्या झोपडपट्ट्यात राहतात. त्यातल्या हजारो गरीब कुटुंबांना अशी झोपडीही मिळत नाही. पोटाची खळगी भरायसाठी या महानगरीचा आश्रय घेतलेली अशी कुटुंबे या शहरातल्या रस्त्यावर, फुटपायरीवर संसार मांडतात. त्यांना कोणत्याही नागरी सुविधा मिळत नाहीत. भर पावसात रात्र न् रात्र आपल्या कच्च्या बच्च्यांसह भिजत चिंबत काढावी लागते. रोजचे काम न मिळाल्यास उपासमारही सोसावी लागते. कुठेही स्थिरता नाही, डोक्यावर छप्पर नाही, आणि राहायचे ठिकाण नक्की नाही, अशा अक्षरश: निर्वासित असलेल्या एका चर्मकार कुटुंबात जन्मलेल्या रवींद्र बागडे यांनी फुटपायरीवर संसार करणाऱ्या मुंबईतल्या गरीब कुटुंबाची व्यथा आणि कथा अत्यंत भेदकपणे ‘बोचकं’ या आत्मकथापर कादंबरीत यथार्थपणे सांगितली आहे. ‘बोचकं’ या कादंबरीचा नायक नारायण म्हणजे स्वत:च बागडेच आहेत. त्यांनी कादंबरीसाठी हे नाव घेतले आहे. फुटपायरीवर राहणारी सावित्रीबाई आपल्या सात मुलांचा काबडकष्ट करून सांभाळ करते. त्यांचे संगोपन करते, नवरा दारुडा, तो तिला मारहाणही करतो. पण आपल्या मुलांकडे पाहत ती जिद्दीने दिवस ढकलते. ही अत्यंत गरीब माता अत्यंत स्वाभिमानी होती. ती आपल्या नातेवाईकांकडे कधीही आश्रयाला गेली नाही. गरिबीला ती कंटाळली नाही. भाजी विक्रीचा व्यवसाय करत तिने आपल्या सातही मुलांना वाढवले, शिकवले आणि त्यांचे संसार मार्गाला लावले. आपल्या मुलांच्या लग्नासाठी या जिद्दी माऊलीने स्वत:च खर्च केला. नंतरच्या काळात तिने एक झोपडी विकत घेतली. पण आपल्या मुलाला संसार थाटता यावा, यासाठी ती वीस हजार रुपयांना विकून ते पैसे मुलाला देण्याचे दातृत्वही तिच्याकडे होते. पुन्हा ती फुटपायरीवर आली. तिच्या मोठ्या मुलाने भाड्याची खोली घेतली. नंतर फ्लॅट घेतला, पण ही स्वाभिमानी आई आपल्या मुलाकडे शेवटपर्यंत राहायला गेली नाही. नवरा मरण पावल्यावर थकली तरीही भायखळ्याला भाजी विक्रीचा व्यवसाय करीत राहिली. आपला भार तिने मुलावर टाकला नाही. शेवटी ती मरण पावली आणि मुलांचे मायेचे छत्रही नाहीसे झाले. या सावित्रीबाईचा सारा संसार एका बोचक्यात होता. तिचे बोचके तिच्याबरोबर गेले. चांगले संस्कार तिने घडवल्यामुळे मुलेही शिकली. आईने आपल्यासाठी काढलेल्या खस्ता विसरली नाहीत. ती सुखी झाली, पण त्यांचा संसार बोचक्यात राहिला नाही. त्यांना हक्काचे छप्पर मिळाले. सावित्रीबाईचा बोचक्याचा संसार मुलांच्या वाट्याला आला नाही. लेखकाने बोचके हे शीर्षक आपल्या कादंबरीला दिले, ते अत्यंत यथार्थ आहे. आपण फुटपायरीवर वाढलो. फुटपायरीवरच शिकलो, पण आपल्या पेक्षाही जास्ती दु:खी कुटुंबे आहेत, याचे भान लेखकाला आहे. माझं दु:ख हे जगाचं आहे, पण जगाचं दु:ख त्यापेक्षाही मोठं आहे. असं तो म्हणतो. एका साध्या सरळ गरीब माणसाची ही जीवनकहाणी मानवी जीवनातल्या दु:खानी व्यापली आहे. आपल्या भावंडांचा संसार सुखाचा व्हावा, त्याला चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी तो प्रयत्न करतो. एक भाऊ दारुच्या व्यसनाधीन होतो आणि बेवारशासारखा रस्त्यावरच मरून पडतो. मुलगा आकाश शिकतो, प्रेम विवाह करतो, पण अकाली आत्महत्या करतो. मुलगी नीलकमल बी. डी. एस. होते. ती दातांचा दवाखाना मुंबईत सुरु करते. लेखकाला त्याच्या पहिली साहित्यकृतीसाठी अनेक पुरस्कार मिळतात. राष्ट्रपतींचे आमंत्रण येते. अनेक समारंभाला तो उपस्थित राहतो. लौकिक अर्थाने त्याला सुख मिळते, पण पुत्र निधनाची दु:खाची झालरही त्या सुखाला आहे. पत्नीच्या पहिल्या बाळंतपणाठी नारायणकडे पन्नास रुपयेही नसतात. तो ही ते सरकारी कार्यालयातल्या आपल्या महिला सहकाऱ्याकडून उसने घेतो. मुलगा गेल्यावर विम्याचे आलेले दीड लाख रुपये त्याला व्यक्तिगत सुखासाठी नकोसे वाटतात. हे दु:ख विसरण्यासाठी तो या पैशाचा वापर जेजुरी येथे आकाशच्या नावे स्मृतिकेंद्र सुरु करायसाठी करतो. धारावीच्या झोपडपट्टीत तेथील लोकांना संघटित करून सुधारणाही घडवून आणतो. नारायणचे मन हळवे आणि संवेदनशील आहे. त्यामुळेच दु:खाचा तो बाऊ करीत नाहीत्र. आपल्यापेक्षाही दु:खी लोक आहेत, याची जाणीव त्याला सदैव आहे. आपली आई गेल्यावर तो म्हणतो, ‘जिने आयुष्यात नुसतेच काबाडकष्ट केले. नवऱ्याचा जाच सहन केला, मुलांचा संसार थाटून दिला. त्यांना मुलंबाळं झाली, त्यांचा
संसार तोंड भरून पाहिला, दारिद्र्याची तमा तिने कधीच बाळगली नाही. अगदी मर्दासारखे तिने कष्ट केले. हाल सोसले, नातवंडं परतुंडाची तोंड तिने पाहिली. मुलांना चांगली वर्तणूक शिकवली. त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं. लोभ, मोह माया, मत्सर, द्वेष या पंच दोषांना स्वीकारून तिने या पंचमहाभूतात राहायला शिकवले. भाजीचं गठुळं विक्रीसाठी डोक्यावर घेवून वणवण फिरणारी आणि संसाराच्या ओझ्याच्या बोचक्यानं बदलेली भारतीय बहिष्कृत श्रमिकांची ही इंडियन मदर संसारातून मुक्त झाली होती.