माझे शेल्फ
बोनोबो : एक शांतिदूत
आफ्रिकेतल्या जंगलात चिंपाझी आणि बानोबो या वेगळ्या जातीचे चिंपाझी यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्हेनेसा वूड्स या तरुणीनं लिहिलेलं हे पुस्तक. एक वेगळ्याच प्रकारचं विश्व व्हेनेसाच्या लेखनातून आपल्यासमोर येतं. एकीकडं जंगलातले, आफ्रिकी संस्कृतीतले एकेक विलक्ण अनुभव मांडत असताना, बोनोबोंबरोबरचं आपलं नातं उलगडून दाखवत असताना व्हेनेसा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा लिहिते. जंगलांमध्ये तिला सापडत गेलेलं कौटुंबिक आयुष्य, माणूसपण ती या पुस्तकात मांडते. ‘बोनोबो हँडशेक’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद शर्मिला फडके यांनी केला आहे.हे पुस्तक म्हणजे व्हेनेसा वुड्सची आत्मकथा आहे. जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर अकल्पित नोकरी मिळाल्यावर त्याच कामात रममाण होऊन परंतु सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन चरितार्थ चालविण्यासाठी नव्हे, तर एका दुर्लक्षित मुक्या प्राण्याच्या जीवनासाठी संबंधित ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा व प्रवासाचा हा आलेख आहे. अनेक लहानसहान नोकऱ्या केल्यानंतर लेखिकेला युगांडाच्या बुन्दागो जंगलातील चिम्पांझीची गणना करण्याची नोकरी मिळते आणि येथूनच तिच्या वेगळ्या विश्वातील जीवनाला सुरुवात होते आणि याचवेळी जैववैद्यकीय क्षेत्रातील अनुभव संशोधक ब्रायन याच्याशी तिची गाठ पडते. ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि कालांतराने विवाहबद्धही होतात. त्यांचे व्यक्तिगत जीवन आणि संशोधन असा त्यांचा समांतर प्रवास सुरू होतो. या प्रवासात त्यांना अनेक प्रकारचे अनुभव येतात. त्यांच्यावर अनेक संकटेही ओढावतात. परंतु त्यांनी त्यावर मात करून आपले कार्य सुरू ठेवले आहे. हे सर्व शब्दबद्ध करताना लेखिकेने कधी तटस्थपणे, तर कधी परिस्थितीशी समरस होऊन प्रसंगचित्रण केले आहे. ब्रायन आणि व्हेनेसा यांनी मर्कट जातीमधील अनेक प्रजातींचा अभ्यास केला आहे. यातूनच वेगवेगळ्या देशांतील माकडांची वेगवेगळी रूपे, आफ्रिकेत आढळणाऱ्या चिम्पांझीच्या प्रजाती, कान्गोमधील चिम्प्स, चिम्पांझी व बोनोबो यांची सविस्तर माहिती लेखिकेने करून दिली आहे. आपला पती ब्रायन यांच्यासह केलेल्या संशोधनातून व्हेनेसा वुड्सने माकडांच्या वेगवेगळ्या प्रजातींचे जीवन, त्यांच्या भावना, त्यांच्या वासना, त्यांचा दिनक्रम, विशिष्ट क्रियेनंतर त्यांनी त्यांच्याकडून आलेली प्रतिक्रिया अशा सर्वच बाबींचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याला शब्दरूप दिले आहे. याशिवाय आफ्रिकेतील जंगलातील प्राणी व त्यांचे जीवन, त्यांच्या जीवनावर होणारे चांगले-वाईट परिणाम, तसेच त्या प्राण्यांच्या जीवनाशी निगडित अनुषंगिक बाबींचाही येथे परामर्श घेतला आहे. ‘देशविदेशात प्राणीमित्र संघटना कार्यरत असूनही काही विशिष्ट प्राण्यांची दखल घेतली जात नाही’ अशी खंतही येथे व्यक्त केली आहे. माकडांमधील ‘बोनोबो’ ही जात नष्ट होत असताना त्याची ओळख जगाला व्हावी यासाठी प्रयत्न करीत असलेल्या ध्येयवेड्या ब्रायनशी विवाह केल्याने, त्याच्यासह केलेल्या सहप्रवासात सोसाव्या लागलेल्या यातनांना लेखिकेने येथे शब्दरूप दिले आहे. संशोधन आणि व्यक्तिगत जीवन असा समांतर प्रवास करताना लेखिकेला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसे भेटली आहेत. त्यामुळे अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून, उच्चपदस्थ, सत्ताधीश, राजकारणी यांच्यापर्यंत सर्वच स्तरावरील व्यक्तींच्या व्यक्तिवैशिष्ट्यांची माहिती येथे करून दिली आहे. यामध्ये तिचा पती ब्रायन, त्याचा सहकारी रिचर्ड आणि बोनोबोच्या पिल्लांचा सांभाळ करणाऱ्या ‘येवोनो’, ‘हेन्रिएट’ व ‘एस्पोरान्स’ या ‘मामा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या स्त्रियांची व्यक्तिचित्रे ठळकपणे साकार झाली आहेत. शिवाय मालूचे प्राणिचित्रही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या आत्मकथनातून काही प्रदेशात घडत असलेली अमानवी कृत्ये, लढाया, मानवतावादापासून दूर गेलेली संस्कृती प्राण्यांच्या निवारागृहांचा माणूसच करीत असलेला वापर अशा बाबींवर प्रकाश टाकला आहे आणि तरीही या परिस्थितीत नेल्सन मंडेला व महात्मा गांधी यांच्या विचारांची कास धरून मानवतावादी धोरणाचा अवलंब करत आपण नि:स्वार्थीपणे इतरांना मदत करण्याची वृत्ती जोपासत असल्याचे म्हटले आहे आणि याचा प्रत्यय या आत्मकथनातून येत राहतो. म्हणूनच लेखिकेचा हा प्रवास समजून घेताना, ‘बोनोबो’ या माकडांच्या एका प्रजातीचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करून त्याला एका शांतीदूताचे स्थान मिळवून देणाऱ्या व्हेनेसा वुड्सचे हे आत्मकथन एकदा अवश्य वाचावे असे आहे.
नारायणच्या दु:खाच्या काळात त्याला मदत करणाऱ्यांची त्याला सदैव जाणीव आहे. जगात थोरांची संख्या कमी असली तरी त्या परोपकारी सदाचारी लोकांच्यामुळं सहाशे कोटीचं हे जग चाललं आहे, असं लेखक जाणीवपूर्वक म्हणतो. बोचकंही बागडे यांची आत्ममथात्मक कादंबरी उपेक्षित आणि निराधार कुटुंबांच्या होरपळीचे, ससेहोलपटीचे यथार्थ दर्शन घडवते. कादंबरीची भाषा कुठेही आर्वाच्य झालेली नाही. सत्य कथन करताना आपल्याला सहानुभूती मिळावी, असाही हेतू लेखकाने ठेवलेला नाही. आपले दु:ख उगाळून त्याला मोठेपणाही मिळवायचा नाही, तळागाळातल्या समाजाचे दु:ख त्यांनी या कादंबरीद्वारे वाचकांसमोर मांडले आहे.