माझे शेल्फ
चाकाची खुर्ची
संघर्ष म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर हे आत्मचरित्र जरूर वाचावे,धीरोदात्त अपंग स्त्रीची कहाणी... कोल्हापूरच्या अपंग लेखिका नसीमा हुरजूक यांचे हे आत्मकथन. अपंगांनी लिहिलेली आत्मकथनं तसंच कार्य करणाऱ्यांना खूप उपयोगी पडतात. १९९९ मध्ये नसीमाने ‘चाकाची खुर्ची’ हे सदर कोल्हापूर ‘सकाळ’साठी लिहिलं. त्याचंच हे पुस्तकरूप नसीमा जन्मापासून अपंग नाही. वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत चांगली उंडारत होती. नृत्यात भाग घेत होती. खेळांमध्ये भाग घेत होती. अभ्यासात उत्तम, घरात भाऊ-बहिणी, आईवडील अशा कुटुंबात रंगलेली. पण अचानक पाठीत दुखू लागलं. दुखण्याचं मूळ स्पाईनल कॉर्ड्समध्ये होतं. ती कुणालाच दोष देत नाही, पण म्हणते, योग्य वेळी, योग्य निदान व योग्य उपचार झाले असते तर आज मी खेळाच्या वा नृत्याच्या क्षेत्रात असते; पण ते नाही झालं. कमरेखाली सर्व अंग लुळं पडलं आणि संवेदनाच नाहीशा झाल्या. तरीही न हरता देशात-परदेशात प्रवास केला. अपंगाच्या स्पर्धेत भाग घेतला. बक्षिसं मिळवली. अपंगांसाठी संस्था स्थापन केली, पण कुंपणानंच शेत खाल्लं. अपंग संस्थेचे पैसे येथे काम करणाऱ्यांनी खाल्ले. त्यांची साधनेसुद्धा विकली नि पैसे खाल्ले. पण न डगमगता ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड कोल्हापूर’ ही संस्था स्थापन केली. आज ही संस्था जोरात काम करत आहे. राजीव गांधी, मनोहर जोशी, मोरारजी देसाई या थोरामोठ्यांनी ही संस्था बघितली आणि मदत केली. हे पुस्तक लिहिताना पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर राहू द्याच, पण दु:खच कारंजासारखं उडत होतं. नसीमाच्या दुखण्याचं नाव पॅराप्लेजिक असं आहे. सतत मदतनीस जवळ असावा लागतो. तिच्या संस्थेसाठी तिचे बहीण-भाऊ, बहिणींचे यजमान व भावांच्या बायका आजही कार्यरत आहेत. सारे घरच काम समजून करतात. एकदा लंडनमध्ये ती तिच्या मदतनीस बाईबरोबर गेली होती. तर ती मदतनीस नसीमाला एकटं टाकून मौजमजा करायला निघून गेली. नसीमाचे तिच्याशिवाय खूप हाल झाले. मदतनीसाशिवाय या माणसांना जगणं अशक्य असतं. पण हीच माणसं माणूसपण अधिक जपतात. जागोजागी याची उदाहरणे आहेत. तिच्या वडिलांनाच त्याच्या हाताखालच्या माणसाने मारलं, पोस्टमार्टम करू दिलं नाही, पण तिची आई म्हणाली, ‘केलं सर्व, कोर्टात गेलो, जिंकलो, तरी तुमचे बाबा येणार का परत? त्या माणसाचं मन आयुष्यभर त्याला स्वस्थ आयुष्य जगू देणार नाही, हीच मोठी शिक्षा नाही का?’ चाकाच्या खुर्चीत बसलेल्या मुलीला पंख फुटले आहेत, आणि ती आनंदाने उडू पाहते आहे, असं मुखपृष्ठावरचं चित्रच नसीमाची विजय कहाणी सांगून जातं. चित्राखाली सुंदर वाक्य आहे, ‘For us too the sky is the limit.’ संस्थेतले अपंग, त्यांच्या व्यथा नि कथा, पैसे मिळवण्यासाठी केलेली धडपड, कधी आलेले अपेक्षाभंगाचे दु:ख, तर कधी अचानक कुणी केलेली मदत यांनी पुस्तकाचा उत्तरार्ध व्यापला आहे. ही कहाणी आहे एका धीरोदत्त अपंग स्त्रीची. शब्दांचे फापटपसारे नाहीत. साधी, सोपी, सरळ भाषा म्हणूनच अंत:करणाला भिडते. आपण अशी पुस्तके वाचली तर आपल्यावरही नि:संशय काही उत्तम संस्कार आपोआप होतात.
भारतपूझा नदीच्या पलीकडे १९३० साली मल्याळी भाषेतील कवी वल्लाथोल नारायण मेनन यांनी स्थापन केलेल्या केरळ कलामंडलम या प्रायोगिक कला केंद्राला विश्वनाथ घोष भेट देतात. मुघलसराई पासून शोरणुरपर्यंतचा प्रवास विश्वनाथ घोष यांनी रेल्वे जंक्शन बाहेरचे गाव बघणे या उद्देशाने केलेला, पण शोरणुर ते नीलांबुर हा रेल्वे प्रवास मात्र प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी केला. हिरव्या कांच झाडांमधून वाट काढणारा रेल्वे मार्ग, आजूबाजूला उंचच उंच सागवानी झाडे. एखाद्याच प्रवाशाची चढउतार असेल अशी छोटी छोटी स्टेशने. असा दोन तासाचा प्रवास करत गाडी पोहोचते.नीलांबुर या शेवटच्या स्टेशनला. स्टेशनवर उतरल्यावर जवळपास कुठलेही गाव असेल अशी शक्यताही वाटणार नाही एवढ्या दाट जंगलातले हे स्टेशन. याच गाडीने विश्वनाथ घोष शोरणुरपर्यंतचा परतीचा प्रवास करतात. चाय चाय या पुस्तकाचा प्रवास खरे तर इथेच संपतो. पण वाचकाच्या मानत या जंक्शन बद्दल उत्सुकता निर्माण करून एका नवीन प्रवासाची सुरुवात होते एवढे मात्र नक्की.