माझे शेल्फ
चीपर बाय द डझन
चीपर बाय दी डझन हे फ्रॅंक गिलब्रेथ या गृहस्थावर त्याच्या फ्रॅंक ( ज्यू.) या मुलाने आणि अर्नेस्टाईन या मुलीने मिळून लिहिलेले चरित्रवजा पुस्तक.हे गृहस्थ व्यवसायाने इंजिनिअर.कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे कशी करावीत यावर ते संशोधन करत व त्याचे प्रयोगी आपल्या मुलांवर करून पहात.त्यांची फिल्म त्यावेळी अनेक अमेरिकन चित्रपट गृहात दाखवली जात असे.इतके तिथल्या लोकांना त्यांच्या शिक्षणपद्धतीचे कौतुक वाटत असे.सुरुवातीला हा अनुवाद स्त्री मासिकात क्रमशः प्रकाशित करण्यात आला.अनेक ठिकाणांहून मूळ पुस्तकाची चौकशी करणारी तसेच फ्रॅंक गिलब्रेथ यांच्या पद्धती वापरून आपण आपल्या मुलांना शिकवणे सुरू केल्याबाबतची वाचकांची पत्रे आली व मग किर्लोस्कर प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले. फ्रॅंक व त्यांची पत्नी लिली हे विलक्षण जोडपं होतं. आपण दोघं जे काम हाती घेऊ ते निश्चितच उत्तम आणि यशस्वी होणार याचा त्यांना पूर्ण विश्वास असे आणि तसं ते होतही असे.लग्न झाल्यावर फ्रँकनी आपल्याला एक डझन मुलं पाहिजेत असं सांगितलं होतं आणि लिलीनं त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता.त्यांना बारा मुलं झाली.त्या सर्वांना त्यांनी कसं वाढवलं याविषयी हे पुस्तक अत्यंत रंजक आणि उद्बोधक पद्धतीनं माहिती देतं. मुलांच्या स्नानगृहात ग्रामोफोन्स ठेवून त्यावर भाषांच्या तबकड्या लावायची त्यांनी सोय केली.मुलांनी स्नान करताना,दात घासताना,केस विंचरताना, त्या तबकड्या लावून फक्त ऐकायच्या असत.त्यामुळे अल्पावधीत मुलं जर्मन आणि फ्रेंच बोलण्यात तरबेज झाली.स्नानगृहात तक्ते लावलेले असत.त्यावर प्रत्येकानं स्नान,दात घासणे,केस विंचरणे, आदि कामांना किती वेळ लागला ती सर्व माहिती दररोज भरून सही करायची असे.यांतून सर्व कामे नीट आणि झटपट करण्याची मुलांना प्रामाणिक सवय लागली.सर्व प्रकारची गणितं झटपट करण्याच्या पद्धतीही त्यांनी मुलांना शिकवल्या होत्या. त्यांनी घरातील सर्व कामे करणे,निर्णय घेणे,यांसाठी व्यवस्थापन समिती निर्माण केली होती.साफसफाई,गवत काढणे,कुंपण रंगवणे,अशा सर्व कामांची निविदा पद्धत होती.कमीत कमी रक्कम आकारणाऱ्या मुलाला काम मिळे,मात्र ते त्याला पूर्ण करावे लागे. यातून मुलांना काटकसर,जबाबदारी,पैशाचं मूल्य,आदि महत्वाच्या मूल्यांचा संस्कार मिळाला. बायको आणि सर्व मुलांना घेऊन फ्रॅंक कुठेही जात त्यावेळी या साऱ्यांना पहायला गर्दी होत असे.ही सारी मुलं पिवळट तांबूस केसांची होती.दर्शकातील कुणीतरी विचारे, ही एवढी गाजरं कशी काय वाढवता भाऊ ?या एवढ्या मुलांना खाऊपिऊ तरी कसं घालता,मिस्टर ? त्यांना फ्रँक उत्तर देत, डझनावारीनं साऱ्या गोष्टी स्वस्त पडतात,नाही का ? म्हणून या पुस्तकाचं चीपर बाय दी डझन हे चपखल नाव आहे.एवढी मुलं असूनही फ्रँकनी त्यांना उत्कृष्ट शिक्षण आणि संस्कार दिले.प्रत्येक गोष्टीचं मूल्य,महत्व मुलांच्या लक्षात आणून देण्याची त्यांची हातोटी अनोखी होती.एकदा घर बदलायची वेळ आल्यावर त्यांनी सर्वांना गाडीत घातलं आणि एका अत्यंत दुरावस्थेतल्या घराजवळ नेलं.सगळी अगदीच नाराज झाली आणि आपण कोणत्याही परिस्थितीत या घरात राहणार नाही,असं मुलांनी घोषित केलं. मग ते त्यांना ठरलेल्या घरी घेऊन गेले.मुलं खुष झाली आणि हेच घर ठरलेलं होतं तर आधीच इथे का आणलं नाही,असं मुलांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, आधीच तुम्हाला इथं आणलं असतं तर तुम्ही या घरातही दोष काढले असतेत, पण दुरावस्थेतलं घर पाहून आल्यामुळे आता या घरात तुम्हाला दोष दिसणार नाहीत. डझनभर मुलांवर सतत लक्ष ठेवणं सोपं नसतं. त्यातूनही कधी कधी गमती व्हायच्या. एकदोन वेळा मुलं चुकण्याचे प्रसंग आले आणि मग कुठूनही परतताना मुलांना एका ओळीत उभं करून हजेरी घेण्याचा परिपाठ सुरू झाला. एवढं मोठं कुटुंब असूनही लिली रांधा वाढा उष्टी काढा यातच सतत गुंतलेली नसे.तिचीही व्याख्यानं, प्रवास असं सारं सुरू असे.तिच्या व्यक्तीत्व विकासाच्या आड घराची जबाबदारी कधीच आली नाही.मुलांच्या संगोपनात लिलीच्या बरोबरीनं फ्रँकचा सहभाग असे.एकदा लिली अशीच कामासाठी बाहेर जाणार असते आणि फ्रँक मुलांवर लक्ष ठेवणार असतो. लिली साऱ्या सूचना देऊन जाते.काम संपल्यावर ती परतते आणि कुणी त्रास दिला नाहीना याची चौकशी करते. पलीकडे हिरमुसून बसलेल्या एक मुलाकडे निर्देश करत फ्रॅंक तिला सांगतो, काही विशेष नाही,फक्त तो मुलगा जरा गडबड करत होता, पण एक चपराक दिल्यावर बघ कसा शांत बसलाय. त्यावर लिलीनं त्याच्या लक्षात आणून दिलं की,तो त्यांचा मुलगा नव्हता,शेजाऱ्यांचा होता.केवळ त्याचे केसही तांबूस असल्यानं फ्रँकला तो आपला मुलगा वाटला होता.अशा बऱ्याच गमतीजमती या पुस्तकात आहेत.एकदा एक संतती नियमनाची प्रचारिका त्यांच्याकडे येते आणि तुम्ही या कार्याचा प्रचार करा असं लिलीला सांगते आणि लिलीची बारा मुलं पाहून तिला फेपरं यायची वेळ येते.