माझे शेल्फ
चिताक
साहित्यातून जे बहुपेडी जीवनानुभव व्यक्त होतात, त्यातून अनेक अनुभवांचे ज्ञान मिळून आपले जीवन संपन्न बनते. शहरातल्या लोकांना ग्रामीण जीवनाचे तर खेड्यातल्या लोकांना शहरी जीवनाचे आकर्षण कायम असते. चिताक या ग्रामीण कथा आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रया गळ्यात एक विशिष्ट प्रकारचा सोन्याचा दागिना वापरतात त्याला चिताक म्हणतात. कोल्हापूर, राधानगरी भागात हे चिताक आजही वापरतात. पांढरपेशा जीवनाशी जवळीक साधू पाहणारे त्यात आपली जागा पक्की करून त्यात अस्तित्व टिकवू पाहणारी शेतकरी, कामकरी, मजूर, ड्रायव्हर, क्लीनर, मेकॅनिक, जोगते आदी पददलित लोकांचं विशाल असं जग, तेच मोरे यांच्या लेखनाची प्रेरणा व शक्ती. माणूस आपल्या जीवनात आनंद शोधत असतो. ओढगस्तीच्या जगण्यातील रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळका या कथातून वेगळाच अनुभव देतात. माणसाच्या सुखाच्या शोधाची ही धडपड कथांना एक वेगळेच परिमाण देते. भजी हांदलली, गाडी लहडून गेली, बोंबडी मारला, दवडणे, परतडमदी अशा प्रकारच्या वेगळ्या रचना मराठीचा वेगळा बाज व्यक्त तर करतातच पण त्यातून त्यांचा जीवनानुभव जास्त भिडतो. विविध कष्टांची कामं करत आयुष्य जगणाऱ्या मोरेंना आपल्या अवतीभवती जी कथाबीजं मिळाली तीच त्यांनी फार सुंदर फुलवली असं या कथातून जाणवतं. माणसांची हतबलता त्याला कसं जीवन जगायला भाग पाडते, हे मांडताना काही वेळा त्यातूनही जीवन जगतांना क्षणाक्षणाला आनंदाचा शोध मनोहारी वाटतो.