माझे शेल्फ
चंदेरी स्वप्ने
‘चंदेरी स्वप्ने’ या वि. स. खांडेकर यांच्या कथा संग्रहातील कथा सुधारणावाद आणि आदर्शवादांच्या प्रभावातून लिहिल्या आहेत. या कथांचे लेखन खांडेकर यांनी १९३० ते ३५ या काळात केलेले आहे.या कथासंग्रहातील ‘विकास’ या कथेतील नायक तारानाथ, संस्थानिकांच्या ऐश्वर्यावर लाथ मारून निशा या विधवेबरोबर लग्न करतो आणि घराबाहेर पडतो. निशाच्या मनोवस्थेचे चित्रण लेखकाने समर्थपणे केलेले आहे. ‘जीवनकला’ या कथेतील नायक दिलीप जीवनावर प्रेम करणारा. दु:खी, कष्टी, अगतिक माणसांना सन्मानाने जगता आले पाहिजे म्हणून शोषितांच्या बाजूने उभा राहणारा. शोषित कामगारांच्या हक्कांसाठी आपली नोकरी घालविणारा आणि झोपडपट्टीतील गरीब, दुबळ्या लोकांची सेवा करणारा असतो, तर सुरेखा ही कलेवर प्रेम करणारी. सुंदर वस्तूंची चित्रे काढणारी चित्रकार असते. अशी परस्परविरोधी आणि भिन्न विचारसरणी व कार्यप्रणाली असलेल्या दोघांची प्रेम कहाणी या कथेत येते. ‘जीवनवाद श्रेष्ठ की कलावाद श्रेष्ठ’ याबाबतचे या पात्रांच्या तोंडी लेखकाने घातलेले संवाद तर्कशुद्ध आणि या भिन्न विचारसरणींवर प्रकाश टाकणारे आहेत. ताजमहालाच्या अद्वितीय सौंदर्याने भारावून जाणारी आणि ही कलाकृती जीवन सुंदर बनविते म्हणणारी सुरेखा तर हा ताजमहाल उभा करण्यासाठी शेकडो कामगारांना रक्ताचे पाणी करावे लागले असेल. असंख्य यातना सोसाव्या, त्यातूनच हा ताजमहाल उभा आहे. त्यामुळे तो उभा करणारे अधिक श्रेष्ठ, असे म्हणाणारा दिलीप. या दोघांमधील वैचारिक संघर्ष परिणामकारकपणे लेखकाने मांडलेला आहे. शेवटी जीवनदानच श्रेष्ठ असल्याचे लेखकाने दिलीपच्या कृती आणि उक्तीवरून दाखवून दिले आहे. ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या झपाटल्यासारखी वाचणारी निर्मला ‘विस्तवाशी खेळ’ या कथेत भेटते. पण या कल्पनारम्य कादंबऱ्यांमधून येणारे जीवन आणि प्रत्यक्षातील पावला-पावलाला ठेचा खाणारे अगतिक जीवन यांचे विरोधाभासात्मक चित्रण या कथेत प्रभावीपणे येते. ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्यांतून रेखाटलेल्या प्रणयधुंद आणि कल्पनारम्य चित्रणाचाही खरपूस समाचार लेखकाने या कथेत घेतलेला आहे. ‘पतंग’ या कथेतील नायक घाब्रू हा ख्रिश्चन असतो. प्रेयसीवरील प्रेमापोटी तो दारू सोडतो तिच्याशी लग्न करतो. तिच्या निधानानंतर तीन-चार वर्षांच्या मुलाची आई बनून संगोपन करतो. तो मुलगाही मरण पावल्यानंतर मात्र तो व्यसनाच्या आहारी जातो. एका हिंदू विधवेकडून मिळालेल्या जिव्हाळ्यामुळे तो तिच्या प्रेमात पडतो. तिच्या प्रेमासाठी परत दारूचे व्यसन सोडतो. तो आनंदाने तिच्याबरोबर संसार करू लागतो. या कथेतून खऱ्या प्रेमामध्ये कोणत्याही दुर्व्यसनी माणसाला सुधारण्याची, सावरण्याची क्षमता असते, हा आदर्शवादी विचार लेखकाने मांडलेला आहे. त्याचबरोबर राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’मधील सिंधूवर सुधाकरचे खरे प्रेम नव्हते. ते तकलादू, खोटे होते, हेही उदाहरणासह वाचकांना पटवून देण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. ‘पाषाणाचे अश्रू’ या कथेत क्रूर, निर्दय असलेल्या पाषाणवर्मा या राजाला गौतम बुद्धाची भक्त असलेली एक नर्तिका उपदेश करते. त्यामुळे मृतदेहांची रास बघून आनंदीत होणाऱ्या पाषाणवर्माला उपरधी होते. त्याच्या पाषाण हृदयाला पाझर फुटतो, असे आदर्शवादी चित्रण येते. ‘श्रीगणेशा’ या कथेत स्त्रीलादेखील मन आहे, भावना आहेत. तिला पण आपला विकास करण्याची संधी दिली पाहिजे, असा सुधारणावादी दृष्टिकोन लेखकाने पद्माकरपंत आणि मंदा या दाम्पत्याच्या कथानकाद्वारे व्यक्त केलेला आहे. निखळ प्रेम हे जात, धर्म, पंथ यांचा विचार करीत नाही याचे प्रत्ययकारी चित्रण लैला आणि मनोहर या प्रमिकांच्या कथानकांतून ‘मेघदूत व ताजमहाल’ या कथेत लेखकाने केलेले आहे. मुंबईतील हिंदुमुस्लिम दंगलीची पार्श्वभूमीही या कथेला आहे. ‘कल्चर्ड मोती’ या कथेतील नायक विभाकर देशपांडे एका वेश्येच्या मुलीशी, उषाशी लग्न करतो. त्यामुळे त्याला अवहेलना, अपमान सहन करावा लागतो. परस्परांवरहज प्रेमामुळे बिकट परिस्थितीतही ते दोघे आनंदात राहण्याचा प्रयत्न करतात. याच कथेत लेखकाने माणसामध्ये असलेल्या शंकाखोर रानटी प्रवृत्तीवर परखडपणे प्रकाश टाकलेला आहे. या संग्रहातील अतिशय प्रभावी अशी कथा वाचकाला विचार प्रवृत्त करते. या कथासंग्रहातील सर्वच कथांमधून जीवनावर भाष्य करणारी सुभाषितवजा वाक्ये सतत येतात. ही वाक्ये वाचकाला अंतर्मुख करतात. ही वाक्ये वर्ण्य विषयाला समृद्ध करतात. ती उपरी, ओढून ताणून आणलेली वाटत नाहीत. या कथासंग्रहातील कथांचे मूल्यमापन आजच्या संदर्भात करणे किंवा त्यांचा आस्वाद घेणे योग्य ठरणार नाही. तत्कालीन संदर्भाच्या पार्श्वभूमीवरच त्यांचा आस्वाद घ्यावा लागेल.