माझे शेल्फ
द डार्क क्रुसेडर
एकाकी गुप्तहेराची चिवट झुंज... साहस कथा, त्यातही संरक्षण दलांवरील कादंबऱ्या लिहिणाऱ्यांत अॅलिस्टर मॅक्लीन यांचे नाव फार वर होते. त्यांनी स्वत: दुसऱ्या महायुद्धात नौदलात सेवा बजावली आणि नंतर ते जपान्यांच्या कैदेत सुटका झाल्यावर ते कादंबरी लेखनाकडे वाले आणि नौदलाच्या पार्श्वभुमीवर एकापेक्षा एक अशा सरस सतरा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अत्यंत अचूक निरीक्षण व वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या शैलीमुळे अॅलिस्टर मॅक्लीन यांचा खास वाचकवर्ग निर्माण झाला. मॅक्लीन यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नायक अगदी साधेसुधे; पण चिवट असतात. परिस्थिती त्यांना नेहमीच प्रतिकूल असते आणि हे नायक त्यातूनही मार्ग काढून ईप्सित साध्य करतात. मॅक्लीन यांची ‘द डार्क क्रुसेडर’ ही कादंबरी अशीच आहे. ऑस्ट्रेलियात एका कंपनीत कामाला असलेले अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ एकाएकी गूढरीत्या नाहीसे होऊ लागतात. ब्रिटनने एक नवे क्षेपणास्त्र तयार करायला घेतलेले असते आणि अत्यंत गुप्त असलेल्या या प्रकल्पावर हे शास्त्रज्ञ काम करीत असतात. या प्रकल्पाची माहिती कोणाला तरी मिळालेली असते आणि त्यांना ते क्षेपणास्त्र हवे असते, शास्त्रज्ञ गायब व्हायला लागल्यावर साहजिकच गुप्तहेर खात्याचे लक्ष तिकडे जाते आणि लंडनमध्ये धावपळ सुरू होते. शास्त्रज्ञाच्या बुरख्याखाली बेटॉल या गुप्तहेराची या मोहिमेसाठी रवानगी होते. सोबत असते मारी होपमन ही दुसरी हेर. न कळत हे दोघे जवळ येऊ लागतात; पण प्रसंगच असे येतात, की बेंटॉलला प्रेम व्यक्त करायला वेळच मिळत नाही. मुख्य काम असते, ते शत्रू शोधण्याचे. सिडनेला जाताना वाटेत उतरवल्या गेलेल्या या जोडीवर अनेक संकटे येतात आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बेंटॉल त्यातून मार्ग काढत जातो. अखेर तो रहस्याच्या मुळाशी पोहोचता आणि हादरतो. सत्य भलतेच निघते. नेहमीच्या शैलीत मॅक्लीन यांनी कादंबरी लिहिली आहे. अशोक पाध्ये यांनी तिचा सरस अनुवाद केला आहे. गुप्तहेरांचे कष्टाचे जग या कादंबरीत दिसते. वेगळे काही वाचणाऱ्यांना ही कादंबरी नक्कीच आवडेल.