माझे शेल्फ
द गन्स ऑफ नॅव्हारन
खिळवून ठेवणारी युद्धकथा... युद्धकथा, साहसकथा यांकडे वाचकांचा कामयच मोठा ओढा राहिलेला आहे, मग तो पाश्चात्त्य वाचक असो वा भारतीय. इंग्रजी वाचकांनी डोक्यावर घेतलेल्या अॅलिस्टर मॅक्लीन या युद्धकथा लेखकाची ‘द गन्स ऑफ नॅव्हारन’ ही कादंबरी.’ दुसऱ्या महायु्धातील एका काल्पनिक लढाईवर आधारलेली ही इंग्रजी कादंबरी वेगवान कथानक, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी वर्णनात्मक शैली आणि लष्करी डावपेचांचे रंजक तपशील, यांमुळे लोकप्रिय ठरली होती. १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंरीवर साठीच्या दशकात प्रदर्शित झालेला त्याच नावाचा चित्रपटही अफाट यशस्वी ठरला होता. अशा या वेगवेगळ्या माध्यमात पसंती मिळवलेल्या कथानकाचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच खिळवून ठेवणारा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धामधुमीत भूमध्य समुद्रातील एका बेटावर अडकून पडलेल्या बाराशे ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्याच्या मार्गातील मोठा अडथळा असलेल्या नॅव्हारन नामक बेटावरच्या अजस्त्र तोफा नष्ट करण्याची, विमाने आणि आरमाराच्या ताफ्यांना प्रयत्नांनी न जमलेली जबाबदारी कॅप्टन कीथ मॅलरी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडते. खिळखिळ्या बोटीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास समुद्रातील वादळ, नॅव्हारन बेटावर पोहोचल्यावर सरळसोट उभा कडा, हाडे गोठवणारी थंडी, जायबंदी झालेला सहकारी अशा सगळ्या संकटांच्या मालिका घेऊन येतो. अधूनमधून भेटणाऱ्या शत्रू सैनिकांना कधी आपल्या वेशांतराने चकवत तर कधी लष्करी सराईतपणे दोन हात करत आपल्या लक्ष्याच्या, तोफांच्या दिशेने ही तुकडी मार्गक्रमण करते, हा सगळा प्रवास अत्यंत रोमांचक, वेगवान आहे. लेखक मॅक्लीन यांनी स्वत: काही वर्षे नौदलातील कामाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे कथेत उतरलेल्या बारीकसारीक तपशिलांमुळे हा थरार वाढत जातो. कथा पुढे सरकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भौगोलिक प्रदेशाचे वर्णन एवढे बारकाईने आले आहे की, नकाशासह तेथील समुद्र, बेटे, किल्ला, गुहा आदी तपशील चित्रासारखे डोळ्यापुढे उतरत जातात. या गुप्त मोहिमेचा नेता न्यूझीलंडचा गिर्यारोहक कॅप्टन मॅलरी, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा ग्रीक अँड्रिया, अमेरिकन धूर्त-हिकमती मिलर, अनुनभवी-कोवळा स्टीव्हन्स, तंत्रज्ञ ब्राऊन आणि त्यांना नॅव्हारनमध्ये भेटणारे लुकी, पनायीस या सर्वांच्या व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आहेत शिवाय, युद्धकथा असली, तरी रक्तपाताची भडक वर्णने नसल्याने कादंबरी रक्तरंजित होत नाही. मॅक्लीन यांच्या युद्धकथेचा सर्व भर सहज वर्णन, खिळवून ठेवणारी शैली यावर आहे. हा सर्व थरार मराठी अनुवादातही तितक्याच सहजपणे उतरला आहे. अॅलिस्टर मॅक्लीन यांच्या अनेक कादंबऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित केल्या आहेत. या मालिकेतील ही नवीन कादंबरी युद्धकथाप्रेमींच्या निश्चितच पसंतीस उतरेल, अशी आहे.