माझे शेल्फ
द ग्रेप्स ऑफ रॅथ
ईश्वर मला कळत नाही,त्यामुळं पाप मला कळत नाही,पापाच्या सीमा ,स्वरूप,आपणच ठरवतो त्यात मला मानवप्रेम ही पाप ठरवलेलं दिसतं. त्यामुळं माझ्या विवेकानुसार मी पापपुण्य ठरवतो".हे बोलके उद्गार "द ग्रेप्स ऑफ रॅथ"मधल्या कॅसीचे.कॅसी हा धर्मोपदेशक असतो.परंतु पाप पुण्याचा गुंता न कळल्याने धर्मोपदेशक हे पद सोडतो,सामान्य फकिराचं जीवन जगण्यास सुरुवात करतो. कॅसी जास्त शिक्षित नाही पण विचार व चिंतन अति-शिक्षितांना लाजवेल असं. कॅसी या कादंबरीच्या नायकाच्या जीवनेत युगांतकारी बदल घडवतो.
या कादंबरीचा नायक टॉम जोड.
टॉम जोड ठकास महाठक असणारा,स्वभावाने भडक,वेळेला तितकाच दयाळू.या भडक स्वभावा मुळंच एकाचा खून करून तुरुंगात गेलेला.कादंबरीची सुरुवात होते ती टॉमची शिक्षा संपल्या नंतर जेव्हा तो परत येत असतो.१९३० च्या आर्थिक मंदीनं अमेरिकेचा श्रीमंत वर्ग जेवढा होरपळला,त्याच्या कैकपटीने शेतकरी वर्ग मंदीच्या आसुडानं जखमी झाला.त्याच जखमी झालेल्या,तोंडचा घास हिरावून घेतलेल्यांची ही करुण कथा.
भांडवलदारांनी भाडेकरू शेतकऱ्यांना हाकलून लावलं.त्यामुळे उपजीविकेच्या एकमात्र साधनापासून शेतकरी दूर झाले परिणामी त्यांना स्थलांतर करावं लागलं. अमेरिकेतील हजारो स्थलांतरित परिवारांमधील एका परिवाराची ही कथा.
जॉन स्टाइनबेक हे स्वतः पत्रकार होते.शेतकरी व शेतीशी त्यांना लळा होता.या लळ्यातूनच त्यांच्या कादंबऱ्या उगम पावत.यातलीच एक अजरामर "द ग्रेप्स ऑफ रॅथ".या कादंबरीचा घाट अर्ध कथात्मक,तर अर्ध वृतांकनात्मक आहे.विशेष म्हणजे यात कादंबरीचा आत्मा हरवत नाही.कारण मांडणी व वर्णन हृदय स्पर्शी आहेत.एक प्रकरण कथेचे तर दुसरे वृतांकनाचे या स्वरूपात कादंबरी प्रस्तुत होते.
या कादंबरीची बलस्थाने कोणती असतील तर ती,यातील व्यक्तिरेखा व प्रसंग वर्णनातील मर्मभेदकता.उदा. टॉम जोड व कासवाची भेट,कासवाची रस्ता ओलांडण्याची धडपड.यासारखी प्रसंगे वाचनाची गोडी वाढवतात.
कादंबरी व नाटकाचं खरं बळ असतं त्यातील व्यक्तिरेखांमध्ये,हे जॉन स्टाइनबेकनी या कादंबरीतून आणखीन प्रकर्षाने जाणवून दिलंय.मला डोस्तोवस्की,टॉलस्टॉय, चेखोव,नंतर जॉन स्टाइनबेक हे व्यक्तिरेखा टिपण्यात वाकबगार वाटतात.व्यक्तिरेखांमध्ये "टॉम जोड" हा ठसकेबाज,स्वभावाने तप्त,सत्याची कास धरणारा,मेहनती,अन्याया विरूद्ध आवाज उठणारा."मा जोड" ही टॉम जोड ची आई. समंजस,परिवाराची धुरिणी,सर्वांचं सांत्वन करणारी अडाणी असून मानवप्रेम जपणारी,मानवतेचा प्रसार करणारी.
"पा जोड" टॉमचे वडील.समंजस,कष्टाळू,परिस्थितीस धीराने तोंड देणारे "अंकल जॉन" टॉम चे काका. या पात्राबद्दलही कॅसी,टॉम नंतर आपल्या मनात सहानुभूती निर्माण होतेच.अंकल जॉन सतत स्वमग्न असणारा,शोकाकुल स्वभावाचा,आपणच पत्नीच्या मृत्युस कारणीभूत आहोत या विचाराने धसका लागलेला.कॅसीचा सुरुवातीस उल्लेख केला आहे,परंतु त्याच्याबद्दल एक मांडायचं राहून गेलं.कॅसी धर्मोपदेशक हे पद सोडतो,कारण बोजड धार्मिकता त्याला पसंत नसते.धर्माचे रीतिरिवाज त्याला निरर्थक वाटतात.तो धर्माच्या खऱ्या अर्थाचा शोध घेतो.याच शोधात पिळवणूक झालेल्या कामगारांचं नेतृत्व करतो.त्यामुळे साम्यवादी अर्थात रेड्सचा शिक्का लावून भांडवलवादाचा पुळका असणारे कॅसीचा कुदळीने खून करतात.येथूनच या कथेस अत्यंत शोकांतिक वळण मिळते.आता या कादंबरीच्या विवादाबद्दल.या कादंबरीला साम्यवादी ठरवण्यात आले.तसेच चर्च व्यवस्थेकडूनही यावर ताशेरे ओढण्यात आले.अमेरिकेच्या भांडवलवाद्यांनी साम्यवादाचा इतका धसका घेतला होता की,ते कामगारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत. मॅक्झिम गॉर्की ची "आई" (मदर) ही कादंबरी रशियात जशी साम्यवादाच्या प्रसारास उपयुक्त ठरली तशीच "द ग्रेप्स ऑफ रॅथ" ही कारणीभूत ठरेल अशी भीती त्यांना वाटत होती.विशेष म्हणजे कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा महामंदीचा अमेरिकेस जबरदस्त तडाखा बसला होता.
काय नाही या कादंबरीमध्ये ? विज्ञानाने केलेला विध्वंस,अर्थशास्त्राची सदोष स्थिती, राजकीय संकल्पना - भांडवलवाद साम्यवाद,सामाजिक विडंबन,धार्मिक ढोंगीपणा, स्थलांतरितांच्या व्यथा, मानवतावाद,विशेष म्हणजे दारिद्र्य व त्यात पिचलेला मनुष्य कादंबरीचा रहस्यभेद मला करायचा नाही.म्हणून एवढ्यावरच थांबतो.
थोडं अनुवादाविषयी.मिलिंद चंपानेरकर यांनी हा आगळावेगळा अनुवाद केला आहे.आगळावेगळा यासाठी की यातील संवाद वऱ्हाडी भाषेत आहेत.
सुरुवातीस वाटेल संवाद का वऱ्हाडी भाषेत ठेवलेत,वाचायची मजाच गेली,परंतु हळूहळू त्या भाषेत आपण रुळतो.विचार ही त्याच भाषेत यायला लागतात.मग आपल्याला काही वाटत नाही.संवाद वऱ्हाडी ठेवण्या मागचं कारण लेखकास विदर्भातील प्रदेश शेतकरी,पीक,वसाहत कादंबरी ज्या परिसरात घडते याच्याशी साम्य असणारी वाटते.जास्त काही नाही सांगत,तुम्हीच वाचून बघा.