मुखपृष्ठ
द नेमसेक

माझे शेल्फ

द नेमसेक

इंग्रजी शीर्षक
The Namesake
सारांश

खिळवून ठेवणारं सहज कथन… झुंपा लाहिरी कादंबरीतली एकेक व्यक्तिरेखा त्यांच्या खास शैलीत नेमकी उभी करतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा खास लक्षात राहते. साध्या प्रसंगांमधून नाट्य खुलवण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. हे करताना आपण काहीतरी महत्त्वाचं ांगतोय, असा त्यांचा आव नाहीय. साध्यासोप्या शैलीत सहज कथनातून पुढे जाणारी गोष्ट वाचकाला खिळवून ठेवते. जगावेगळी स्वप्नं घेऊन सातासमुद्रापलीकडे गेलेल्यांना तिथलं आभाळ कितीही खुणावत असलं तरी मातीची ओढ अस्वस्थ करतेच. लौकिकार्थाने परक्या देशात आपली ओळख निर्मार झाली तरी खऱ्या अर्थाने आपल्याला ओळखणारी आपली माणसं दूर राहिलेली असतात. परतीच्या वाटेचा विचार कधीच मागच्या वळणावर राहून गेलेला असतो. मग सुरू होतो, ओळख टिकवून ठेवण्याचा अट्टाहास. मुलांमध्ये आपली रूट्स रुजवण्याचे प्रयत्न आणि आपल्यासारख्या समदु;खी लोकांचा कंपू करून आठवणी काढत उसासे टाकणं... अमेरिकेत गेलेल्या पहिल्या पिढीचं हे प्रातिनिधिक चित्र. पण तिथे जन्माला आलेल्या पिढीचे प्रश्न आणखी वेगळे होतात. जन्माने अमेरिकन, अस्तित्वाची सगळी परिमाणं अमेरिकन पण घरात मात्र भारतीय संस्कार टिकवण्याचा आग्रह. सणवारांचे सोपस्कार आणि वर्ष दोन वर्षात भारत नावाच्या देशात जाऊन तिथल्या नातेवाईकांच्या भेटीगाठी. या सगळ्यांमध्ये ही मलं गुदमरून जातात. दोन्ही पिढ्यांचा अमेरिकेच्या भूमीवरचा स्वत:ची ओळख शोधण्याचा प्रयास दोन वेगळ्या पातळ्यांवरचा. स्थलांतरित भारतीयांच्या या दोन पिढ्यांचा मनोव्यापार वाचकांसमोर आणणाऱ्या झुंपा लाहिरींच्या ‘द नेमसेक’ या कादंबरीचं जागतिक साहित्य विश्वात जोरदार स्वागत झालं. पुलित्झर मिळवणाऱ्या ‘इंटरप्रिटर ऑफ मॅलडीज’च्या लेखिकेचं दुसरं पुस्तक् म्हणून या कादंबरीची हवा आधीच झाली होती. न्यूयॉर्क टाइम्स, डेली टेलिग्राफ, ऑब्झव्र्हर यांसारख्या प्रसिद्ध नियतकालिकांनी कादंबरीचं कौतुक करणारी परीक्षणं प्रसिद्ध केल्यावर बेस्टसेलरच्या यादीत ते जाणार हे स्वाभाविक होतं. याच कादंबरीचा उल्का राऊत यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केला आहे. गोगोल गांगुली हा या कादंबरीचा नायक. अशोक आशि अशिमा गांगुली या बंगाली जोडप्याचा मुलगा. गोगोलच्या जन्मापासून कथा सुरू होते. ‘गोगोल’ नावाभोवतीच्या आयडेण्टिटी क्रायसिसच्या नाटकामध्ये संपूर्ण कादंबरी गुंफली असली, तरी ही गोष्ट केवळ गोगोलची राहत नाही. सगळ्या गांगुली कुटुंबाची आणि स्थलांतरितांच्या दोन पिढ्यांची ती कधी होऊन जाते ते कळतही नाही. गोगोलच्या जन्मापूर्वीच त्याच्या पणजीने निवडलेलं त्याचं नाव असलेलं पत्र कलकत्ता ते केंब्रिज प्रवासात गहाळ होतं. त्याचे बाबा निकोलाय गोगोल या आवडत्या लेखकाच्या नावावरून त्याचं नाव गोगोल ठेवतात. ‘डाकनाम’ म्हणून दिलं गेलेलं हे नाव त्याला कायमचं चिकटतं. हेच नाव हवं म्हणून गोगोल बालवर्गात हट्ट करतो. पण शाळकरी वयात लॉसन नावाचे शिक्षक त्याला गोगोल हा आयुष्यभर असमाधानी, दु:खी राहिलेला लेखक होता हे सांगतात. नंतर मात्र तो त्या नावाचा तिरस्कार करू लागतो आणि निखिल हे नाव स्वीकारतो. अठरा वर्षं सोबत राहिलेलं हे नाव कधीच पुसलं जात नाही. आपलं जुनं नाव उघड होऊन आपली नाचक्की होईल ही भावना त्याचा आयुष्यभर पाठलाग करत राहते. गोगोलचं एकटेपण, त्याचं स्वत:च्या कोषात राहणं कादंबरीत सामोरं येत राहतं. त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांशीही तो मनाने गुंतत नाही. मॅक्झिनबरोबर तो तिच्या घरी राहायला गेल्यावरही त्यांचं नातं शारीर पातळीवरच समोर येंत. ब्रिजेटसोबतचं नातंही काही दिवसच टिकतं. आईच्या आग्रहाने आयुष्यात आलेल्या मौशुमी मुजुमदारबरोबरचं लग्न टिकवतानाही दोघांचे बंगाली रूट्स फारसे उपयोगी पडत नाहीत आणि वयाच्या चौतिसाव्या वर्षी गोगोल पुन्हा नव्याने ‘स्वत:ची ओळख शोधत’ एकटा उरतो. गांगुली कुटुंबाच्या अमेरिकन होत जाण्याच्या प्रक्रियेत नातेसंबंधांचे आणि मायदेशाशी असलेल्या जवळीकीचे एक एक बंध हळूहळू मिटत जातात. अशोकला अमेरिकेत येण्यापूर्वी झालेला अपघात आयुष्यभर त्याच्या सोबत राहतो. आठवणीतून वेळीअवेळी डोकं वर काढून त्याला छळत राहतो. अशिमा कधीच पूर्णपणे अमेरिकेशी एकरूप झालेली दिसत नाही. तिच्या बंगालमधल्या नातेवाईकांमध्ये ती मनाने गुंतली आहे. तिचं अशोकशी, मुलांशी एकरूप होणं हेच तिचं व्यक्तिमत्त्व आहे. बंगाली कुटुंबांचं गेटटुगेदर एवढंच तिचं सामाजिक आयुष्य आहे. सोनियाचं व्यक्तिमत्त्व इतर पात्रांच्या तुलनेत थोडं धूसर आहे. गोगोलची धाकटी बहीण आरि टिपिकल अमेरिकन मुलगी तिच्यात दिसते. पण गोगोलसारखी ती अंतर्मुख नाही. तिच्या आयुष्यात फारशी वळणंही नाहीत. बॉयफ्रेंडबरोबर असलेल्या तिच्या नात्यामध्ये कुठेही संघर्ष नाही. अमेरिकन जीवनशैलीशी नीट जुळवून घेतलेलं हे कादंबरीतलं एकमेव पात्र आहे. झुंपा लाहिरी कादंबरीतली एकेक व्यक्तिरेखा त्यांच्या खास शैलीत नेमकी उभी करतात.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद