माझे शेल्फ
दाह
मुखपृष्ठ बघितले की लगेच त्याचा विषय मुंबईच्या चाळ संस्कृतीचा असणार हे लक्षात येते. ही महाकादंबरी नावाप्रमाणेच दाहक आहे. ज्यांनी "बटाट्याची चाळ वाचली" आहे त्यांना चाळीतले धगधगीत वास्तव, दाहकता पचनी पडायला जड जाईल. या कधीही कोसळेल अशा चाळीत अनेक मराठ कुटुंबे आयुष्याची लढाई निकराने लढत आहेत. चांगले, वाईट, खरे ,खोटे, सत्य , असत्य यात कशातही अडकून न पडता चाळकरी आयुष्याची लढाई लढत आहेत. मालकाची चाळ पाडायची कारस्थाने, चाळीत खानावळ चालवणाऱ्या खानावळी, त्यांचे नवरे, त्यांची मुले, त्यांच्या कडे जेवायला येणारे खानावळे, त्यांचे परस्पर कडू, वाईट, गोड संबंध, 10 x 10 मध्ये फुलणारे प्रेम प्रेम कधी रांगडे कधी वासनेने बरबटलेले, दारुडे , फुटलेली गटारे, तुंबलेले संडास, पाण्यासाठीची हातघाई, लफडी, कारस्थाने, कुत्री, मांजरी, उंदीर, घुशी, सणावाराच्या दिवशी असणारा थाट, भोंदू स्वामी व त्याच्या नादाला लागून उद्ध्वस्त होणारी कुटुंबे , पोलीस, गल्लीतले नेते.. असे अनेक चांगले वाईट, भले बुरे प्रसंग, लेखक आपल्या साक्षी भावनेने दाखवून आणतो. कादंबरीत नायक किंवा नायिका अशी कोणीच नाही. पण तरीही कमळ जायकर ही खानावळी शेवटी चाळ पाडत असलेल्या जे सी बी खाली येवून मरते हा शेवट अस्वस्थ करून सोडतो. मुंबईत आता चाळी फारशा उरल्या सुद्धा नसतील. कादंबरीत आलेला काळ साधारण 1990 च्या दशकातला असावा. चाळ संस्कृतीच्या अनेक वैशिष्ट्यांचे कंगोरे घ्यायचा पुरेपूर प्रयत्न लेखकाने या महा कादंबरीत केलेला आहे. एकदा वाचायला घेतली की खाली झपाटून पुरी करावी अशी आहे.