माझे शेल्फ
डेमॉक्रसीज इलेव्हन
क्रिकेटचा रंजक इतिहास... ‘डेमोक्रसीज इलेव्हन – भारतीय क्रिकेटची महान गाथा’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटचा रंजक इतिहास आहे. या पुस्तकामधून भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ११ महान खेळाडूंचा प्रवास मांडलेला आहे. १९६०च्या दशकामध्ये खेळणारे दिलीप सरदेसाई आणि नाब पतौडी यांच्यापासून सुरुवात होते आणि आत्ताच्या महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंपर्यंत लेखक आपल्याला आणून सोडतो. भारतीय क्रिकेटच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगणारे हे पुस्तक भारतीय क्रिकेट आणि भारतीय समाज कसा बदलत गेला हे स्पष्ट करते.सर्वकालीन महान भारतीय संघाविषयी हे पुस्तक नाही. भारतीय क्रिकेटला आकार देणाºया, यशाचा बॅटन पुढील पिढीच्या हाती देणाऱ्या, जगण्याच्या लढाया लढण्याचं बळ देणाऱ्या, भारतीयांना स्वप्न पाहण्याची; ती पूर्ण करण्याची हिंमत देणाऱ्या ११ खेळाडूंविषयी हे पुस्तक असल्याचं लेखक नमूद करतात. अर्थात ‘डेमोक्रसीज इलेव्हन -Democracys XI - The great Indian Cricket Story`... भारतीय क्रिकेटची महान गाथा’ या पुस्तकामध्ये राजदीप यांनी वडील दिलीप सरदेसाई यांच्यासह मन्सूर अली खान पतौडी, बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिलदेव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या आजी-माजी दिग्गजांची जडणघडण, खेळाडू आणि व्यक्ती म्हणून वाटचाल, यश-अपयश, आव्हाने, विक्रम, निवृत्तीनंतरचं जीवन, त्यांचं भावविश्व, मजेशीर किस्से यांसह भोवतालची सामाजिक परिस्थिती अशा खुबीनं शब्दबद्ध केली आहे, की वाचणाºयाला जणू हे आपल्या नजरेसमोर घडत असल्याचा भास होतो. ‘१९९९ साली विश्वचषक स्पर्धा सुरू असताना तेंडुलकरचे वडील गेले. तो इंग्लंडहून परत आला, वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि पुन्हा लंडनला परतला. थेट मैदानात उतरला आणि त्या सामन्यात त्यानं एक जादुई शतक ठोकलं. हीच कथा विराट कोहलीची. दिल्लीसाठी तो रणजी सामना खेळत होता. जेमतेम अठरा वर्षांचा मुलगा. त्या संध्याकाळी नाबाद घरी परतला आणि त्या रात्रीच काळानं घात केला. त्याचे वडील गेले. सकाळी हा मुलगा मैदानात गेला, खेळला. ९० धावा करून बाद झाला आणि तिथून थेट स्मशानात पोहोचला आणि वडिलांच्या चितेला अग्नी दिला. या कहाण्या भारतीय क्रिकेटचा जुनून सांगतात. क्रिकेटवर जीव ओवाळून टाकणारं बेभान प्रेम सांगतात. याच क्रिकेटनं लाखो भारतीयांना प्रेरणा दिली, जगण्याच्या लढाया लढण्याचं बळ दिलं. मुख्य म्हणजे स्वप्न पाहण्याची हिंमत दिली. हे पुस्तक म्हणजे त्या जिगरबाज मस्तमौला स्वप्नांची, अस्सल गुणवत्तेची एक विलक्षण गाथा आहे. राजदीप स्वत: क्रिकेट खेळले आहेत. आनुवंशिक वारसा म्हणून क्रिकेट त्यांच्या रक्तातच आहे. म्हणूनच त्यांचे क्रिकेटविषयीचे विश्लेषण अनुभवाच्या मुशीतून आलेले आहे. एखाद्या खेळाडूविषयी लिहिताना क्रिकेटमधले धुरीण, बुजुर्ग आणि समकालीन क्रिकेटपटूच्या मतमतांतराची पुस्तकात असलेली पखरण हा तर खास ‘राजदीप टच’ म्हणावा लागेल. एखाद्या खेळाडूचे फक्त गुणवर्णन, त्याचे विक्रम आणि आकडेवारी, त्याची विश्वस्तरीय कामगिरी,त्याची शैली, त्याचे कौशल्य, देशातील आणि जगभरातील लोकप्रियता याचेच वर्णन पुस्तकात येते असे नाही. तर त्या खेळाडूचे दोष, त्याच्या चुका, त्याच्या वर्तनातील विसंगती, त्याचे फसलेले निर्णय, त्याच्याविषयीचे प्रवाद आणि समज, त्याच्या व्याqक्तमत्त्वाची ‘दुसरी’ बाजू असे समग्र चित्र उभे करताना राजदीप शब्दांची कंजुषी करत नाहीत. उलट त्यांच्या लिखाणाला परखडतेची धार येते. राजदीप यांची भाषा प्रवाही आहे. त्यात लालित्य आहे आणि सौंदर्यही... विषयाच्या ओघात आलेली त्यांची काही पल्लेदार वाक्ये पाहू : त्या सभ्य काळाचं दिलीप सरदेसाई हे ‘प्रॉडक्ट’ होतं... भविष्याच्या पोटात उमेदीचा गर्भ श्वास घेऊ लागला... त्याच्या बॅटमधून धावांचे झरे फुटत होते... आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग असतो...रिचर्ड्सच्या उंच उडालेल्या चेंडूवर कपिलची नजर रुतलेली होती... ज्या वयात गणित शाळकरी मुलांना घाम फोडतं, त्या वयात हा मुलगा नवीन समीकरणं जुळवत होता... ‘तो’ षटकार म्हणजे आपल्या आगमनाचा तेंडुलकरी ऐलानच होता... याच काळात क्रिकेटचं कॉमर्सशी लग्न झालं... विकासाच्या वाटेत इंडिया पुढे निघून गेला; भारत मात्र मागेच राहिला... पुस्तकात ठायी ठायी असलेली अशी वाक्यं राजदीपच्या प्रतिभेची, लेखनकौशल्याची आणि कल्पनाविलासाची प्रचिती देतात. चिवडा खाताना घासात काजूचा तुकडा यावा, अशीच ही खुमासदार वाक्यं आहेत. मेघना ढोके यांचं अनुवादकौशल्य लाजबाब आहे. अस्सल मराठीकरणाचा हा उत्तम नमुनाच आहे.