माझे शेल्फ
डिसेप्शन पॉइंट
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे .अध्यक्षांच्या विरुद्ध उभा असलेला उमेदवार सिनेटर सेक्टन प्रचाराच्या आणि लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा चार पावले पुढे आहे . पण त्याची मुलगी रॅकेल अध्यक्षांच्या गुप्तखात्यात माहिती संकलनाच्या वरिष्ठ दावर कार्यरत आहे. सिनेटरने आता नासा या अंतराळ संशोधन केंद्रावर लक्ष केंद्रित केले . नासा दरवर्षी करोडो रुपये आपल्या संशोधनावर खर्च करून करदात्यांच्या पैश्याची उधळपट्टी करते असा त्याचा आरोप आहे आणि अमेरिकन जनता यासाठी त्याच्या मागे उभी राहिली. त्याचवेळी अध्यक्षांनी रॅकेलशी भेट घेऊन तिला नासाच्या नवीन शोधकार्याविषयी माहिती घेण्याचे सुचविले आणि आर्टिक खंडात पाठविले. नासा आर्टिक खंडावर एक नवीन संशोधन करतेय आणि ते संशोधन यशस्वी झाले तर विजयाचे पारडे पुन्हा अध्यक्षांच्या बाजूने झुकेल . रॅकेल हजारो मैलाचा प्रवास करून आर्टिक खंडावर पोचते आणि सुरू होतो एक रहस्यमय थरार . तिला नासाने लावलेल्या शोधाची माहिती मिळते .एक डेल्टा फोर्सची टीम त्या संपूर्ण टीमवर दुरून लक्ष ठेवून आहे . नासाला मदत करण्यासाठी चार खाजगी शास्त्रज्ञही हजर आहेत . तो शोध पूर्ण होतो आणि त्याचे चित्रीकरण अध्यक्षांकडे पोचते . पण नंतर काहीतरी घडते आणि डेल्टाफोर्स त्या शास्त्रज्ञाच्या जीवावर उठते . त्यात रॅकेलही ओढली जाते . असे कोणते रहस्य आहे ज्याने डेल्टा फोर्सचे कमांडो आपल्या अत्याधुनिक हत्यारांसह त्यांच्या मागे लागले आहेत. त्या सर्वांना काहीही करून संपला असे आदेश डेल्टा फोर्सला दिले आहेत. कोण आहे ह्या सर्वांच्या मागे ....?? रॅकेल या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खऱ्या सुत्रधाराला जगासमोर आणेल का ...?? पण त्यासाठी तिला स्वतःचा जीव वाचवावा लागेल . या कादंबरीत वापरलेले तंत्रज्ञान आणि संस्था खऱ्याखुऱ्या आहेत .ही कादंबरी आपल्याला हिमनदी ,समुद्र आणि अवकाश याचा प्रवास घडवून आणते . डॅन ब्राऊनची चोवीस तासात घडणारी एक थरारक ,उत्कंठावर्धक कथा .