माझे शेल्फ

ए टू झेड विज्ञान

इंग्रजी शीर्षक
A To Z Vidnyan
सारांश

आजचे युग हे विज्ञान युग आहे. या युगात विज्ञानाची नवनवी क्षितीजं सामोरी येत आहेत; पण याने अचंबित होण्यापेक्षा आपल्या इतिहासात डोकवायला हवे. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान हवे. आपल्याकडे वेदकाळात विज्ञान प्रगत अवस्थेत होतं. अणू-परमाणू यांचा विचार, खगोल, भविषय यांचा अभ्यास, वैद्यकशास्त्र तंत्रज्ञान या अनेक क्षेत्रांत भारतीय शिखरावर होते, परंतु सततची आक्रमणं आणि जेत्यांची भूमिका, आपला न्यूनगंड यामुळे आपली संस्कृती दुय्यम मानून आपण दुर्लक्ष केले अन् पाश्चात्यांपुढे मान डोलवून ते सांगणारे विज्ञान आजचे सत्य मानू लागले. चीनमध्ये उत्खननात अल्युमिनियमची भांडी सापडली. हडप्पा मोहंजोदडोचा इतिहास अजून काय सांगतो? रामायण-महाभारत काळातील विमानं, शस्त्र-अस्त्र यांची वर्णने नीट वाचून वेध घेतला तर किती वेगळं सत्य सामोरं येतं. गुरुशिष्य, परंपरा, ज्ञान दडवण्याची वृत्ती, शहरीकरण, मनातला स्वत:चा देश व संस्कृतीबाबतचा न्यूनगंड, ग्रंथालये, विश्वविद्यालयांचा नाश, जाळपोळ इ. मुळे आपलं ज्ञानभांडार नाहिसे झाले. या पुस्तकाच्या दोन भागात पृथ्वीवरील विविध भागांत, विविध क्षेत्रांत प्राचीन काळी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी प्रगती झाली होती आणि ज्या प्रगतीचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत अशाच प्रगतीचा विचार केला आहे. आद्य रुग्णालये,शस्त्रक्रिया, आरसे, साबण, सौंदर्य प्रसाधने, दागिने, शिवणकाम, फॅशन, उद्यानशास्त्र, लटकत्या बागा, खेळ, खगोलशास्त्र, भविष्यदर्शी हाडे आणि चिनी संस्कृती अशा या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेचा वेध घेतला तरी पुस्तकाचे मूल्य लक्षात येते. या साऱ्या मांडणीत इतिहास अपरिहार्यपणे येतोच. साम्राज्यांची पडझड, वेगळ्या धर्माचा परिचय यामुळे लोकजीवनावर होणारा परिणाम, त्यांचे जीवनमान, राहणी याच्या वाचनातून आजच्या काळाशी संदर्भ लावत वाचत गेल्यास आपल्यासमोर अनेकविध जीवनाचे पैलू स्पष्ट होत जातात. इ.स.पू. १९०० च्या सुमारास शेतकरी फळे काढण्यासाठी माकडे कामाला लावत होते. नांगराचा पहिला पुरावा इ.स.पू. ३००० च्या जवळपास मिळतो. इ.स. १०० ते ८८० च्या दरम्यान एस्किमो हस्तीदंतात कोरलेले गॉगल्स वापरत. खय्याम म्हटल्यावर शायरी आठवते; पण मुळात तो एक प्राचीन खगोल शास्त्रज्ञ होता असे अनेक संदर्भ, पुरावे या पुस्तकात वाचकाला अडकवून ठेवतात. या पुस्तकाच्या दुसर्या भागात पण साडेचार हजार वर्षापूर्वीचे माहिती तंत्रज्ञान हा पहिला लेख. यानंतर दळणवळण, रस्ते, जलमार्ग, नकाशे, नौदल, दीपगृह, होकायंत्र, रणगाडे, कुपनलिका विद्युत घट, तोफा, धरण, कालवे, शेती औजारे अन शेवटचा लेख आहे आपल्या पूर्वजांचं तंत्रज्ञान आणि आपण. अशाप्रकारे नामशेष झालेल्या प्राचीन तंत्रज्ञानाची अपूर्व ओळख या पुस्तकातून करून दिलेली आहे. आपल्या देशाचा हा अपूर्व ज्ञानठेवा या पुस्तकातून मांडलेला आहे. तो पुढच्या पिढीला माहिती व्हायला हवा म्हणून ही पुस्तके घ्यायला हवीतच.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी