माझे शेल्फ
एचएमएस युलिसिस
२०१९ मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक मराठीत प्रकाशित केलं. प्रसिद्ध अनुवादक अनिल काळे यांनी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. पुस्तकाची थोडक्यात कथा अशी: दुसऱ्या महायुद्धात रशियाला युद्धसामुग्री पोहोचविण्यासाठी मालवाहू आणि तेलवाहू जहाजांचा एक काफिला दोस्त राष्ट्रांकडून पाठवला जातो. संरक्षणासाठी काही लढाऊ जहाजे काफिल्याबरोबर दिली जातात. क्रुझर जातीचे लढाऊ जहाज एचएमएस युलिसिस हे या सर्वांचे नियंत्रण करत असते. एकूण ३२ जहाजे असलेल्या काफिल्याला भयानक अडचणींना सामोरे जावे लागते. वादळे, खवळलेला समुद्र, बर्फवृष्टी, हाडं गोठवणारी थंडी, शत्रूचे हल्ले, उपासमार आणि थकवा. या सर्वांना तोंड देताना जहाजांवरील लोकांची बिघडत चाललेली मानसिकता, रोगराई आणि अपघात यामुळे प्रचंड नुकसान होते. अनेकदा जर्मन बोटी आणि विमाने हल्ला करतात. मात्र अशी भीषण परिस्थिती असूनही युलिसिस वरचे सर्व नौसैनिक पराक्रमाची पराकाष्ठा करतात. प्रत्यक्षात ३२ पैकी किती जहाजे सुस्थितीत रशियाला पोहोचतात हे प्रत्येकाने पुस्तकातच वाचावे. या कथेत म्हणजे आशा-निराशेचे चढ-उतार आहेत. सर्व ठीक चालले आहे असे वाटत असतानाच अचानक एखादी घटना घडते आणि होत्याचं नव्हतं करते. एखाद-दुसरं वगळता कथेतील सर्व पात्र कर्तव्यासाठी आपल्या भावना बाजूला ठेवतात. कडक स्वभावाचा ऍडमिरल टिंडॉल, कर्तव्यदक्ष पण भावुक स्वभावाचा आणि सर्वांना जवळ करणारा कॅप्टन व्हॅलेरी, सडेतोड सर्जन-कमांडर ब्रुक्स, कर्तव्यासाठी आप्तांची बोट बुडवणारा राल्सटन, तीक्ष्ण नजरेने शत्रूला शोधणारा १८ वर्षांचा क्रायस्लर, अक्षांश-रेखांशांची अचूक मोजणी करणारा कॅपोक किड, भीषण परिस्थितीतही बर्फासारखा थंड राहणारा युलिसिसचा चालक कॅरिंग्टन आणि अर्थातच शेवटपर्यंत या सर्वांचा साक्षीदार राहणारा सर्जन-लेफ्टनंट निकोल्स. पुस्तक वाचून झाले तरीही ही पात्र वाचकांच्या मनात घोळत राहतात. ही केवळ मुख्य पात्र. यांच्याशिवाय अनेकजण छोट्या-मोठ्या प्रकारे लक्षात राहतात. हे पुस्तक वाचणारा वाचक ऍलिस्टर मॅक्लिनचा फॅन होणार यात वाद नाही. एचएमएस युलिसिस कादंबरीला जगभरात मान्यता मिळालेली आहे. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वोत्तम कादंबऱ्यांपैकी ही एक गणली जाते. मॅक्लीनच्या इतर पुस्तकांप्रमाणेच यातही प्रेमकथा नाही. इतकेच काय तर या पुस्तकात एकही स्त्री पात्र नाही. पण क्षणाक्षणाला वाचकांना धक्के देणारे प्रसंग मात्र आहेत.