माझे शेल्फ
एक लढा असाही
जेव्हा आयुष्य तुमच्याशी क्रूर खेळ खेळतं, तेव्हाही निराश न होता पुढे जात राहायचं..’ प्रत्येक वळणावर ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं छोटेखानी पुस्तक म्हणजे ‘एक लढा असाही..’ फॅशन पत्रकारिता करणाऱ्या एका अमेरिकन तरुणीच्या जीवनातली ही सत्यघटना. तिचं ाव लॉरेन ऊर्फ लोलो स्क्रग्ज. ‘लोलो मॅगझिन’ याच नावानं तिनं स्वत:चं ऑनलाइन मासिक सुरू केलं होतं. तिचं करीअर आकार घेत होतं. ख्रिसमसचे सूर वातावरणात तरंगत होते. तेव्हाची ही घटना.. शहरातली दिव्यांची रोषणाई वरून बघायला गंमत येईल म्हणून एका छोटय़ा दोन-आसनी विमानातून चक्कर मारायला लोलो गेली आणि.. तिच्यासाठी ती काळरात्र ठरली. विमानाचा पंखा लागून तिला जबरदस्त अपघात झाला. इतका जीवघेणा, की वेदना आणि काळीकुट्ट निराशा यापलीकडे दुसरं काहीही शक्य वाटत नव्हतं. डावा हात आणि डावा डोळा तिनं गमावला. मेंदूला जबर इजा झाली. मुळात ती जगेल की नाही याचीच खात्री नव्हती. जगलीच तर तिला कदाचित सलगपणे पूर्ण वाक्यही बोलता यायचं नाही, कदाचित तिचा स्वभाव पूर्ण बदलेल.. अशा अनेक शंका डॉक्टरांना होत्या. इथून पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यापर्यंतचा तिचा खडतर प्रवास, त्यातली धडपड, मधले अनेक खाचखळगे, अत्यंत अवघड वाटा आणि त्यावर केलेली मात या साऱ्याचं चित्रण म्हणजे हे पुस्तक. ‘लोलो मॅगझिन’ आता तिनं नव्या उभारीनं आणि नव्या रूपात सुरू केलं आहे. लोलोचं कुटुंब, तिचं
बालपण, कौटुंबिक नात्याची वीण, अपघातापूर्वीचं आणि नंतरचं आयुष्य, तिचे मित्र, करीअरचा शोध या गोष्टीही या कहाणीत आहेत. या सगळय़ा आव्हानात्मक प्रवासात लोलोचं कुटुंब सतत सावलीसारखं तिच्याबरोबर आहे. त्यामुळे या पुस्तकाची रचनाही अशी आहे, की प्रत्येक प्रकरण लोलो, तिची आई, तिचे वडील, तिची बहीण अशा वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून उलगडत जातं. या पुस्तकात वारंवार ज्या दोन गोष्टींवर भर दिला आहे त्या म्हणजे जिद्द आणि श्रद्धा. लोलोचे आई-वडील हे सश्रद्ध आणि चर्चशी संबंधित. तिचे कुटुंबीय म्हणतात, ‘‘या सगळ्यातून आम्ही मार्ग काढू शकलो ते केवळ आमच्या श्रद्धेमुळे, हे निश्चित. येशूचा भक्कम पाठिंबा नसता तर हे शक्य झालं नसतं.’’ ‘दैवी हेतू’, ‘कृपादृष्टी’, ‘प्रार्थनाच बदल घडवेल’ असे शब्दप्रयोग पुस्तकाच्या निवेदनात वारंवार येतात. लोलोही एके ठिकाणी म्हणते की, ‘‘श्रद्धा माझ्यासाठी चार दिवसांचं ‘फॅड’ नव्हतं. उलट, माझ्या जीवनाचा पाया होता तो.’’ लोलोकडे जिद्द होतीच. ती नसती तर अशा अवस्थेतून ती बाहेर पडलीच नसती. अपघातानंतर काही दिवसांनी लोलो जेव्हा चालू लागली तेव्हा ती फार तर वीस पावलं चालू शकेल असा तिच्या फिजिकल थेरपिस्टचा अंदाज होता. लोलो मात्र तीस पावलं चालली. ही जास्तीची पावलं म्हणजे तिच्यातली धगधगती जिद्द होती. तिच्या जिद्दीची अनेक उदाहरणं या पुस्तकात विखुरली आहेत. या कहाणीचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अपघात, संघर्ष, जिद्द
आणि त्यातून मिळालेलं यश असा सरळसोट प्रवास इथे नाही. जिद्द बांधली तरी वारंवार दाटून येणारी निराशा, वास्तवाचे अस चटके, भविष्यात काय वाढून ठेवलं असेल या भावनेतून खचणारी उमेद, कृत्रिम हात घेऊन समाजात कसं वावरणार, या विचाराने निर्माण झालेली भीती या गोष्टी तपशिलानं पुस्तकात येतात. लोलोच्या भावनांचा उद्रेक येतो. उद्ध्वस्त करणारे क्षण येतात. हा प्रवास सोपा नाही याची प्रचीती येते. पण तरीही त्यावर मात करता येते, ही भावना उमेद जागवणारी ठरते. पुस्तकाला बेथनी हॅमिल्टनची प्रस्तावना आहे. बेथनी ही समुद्राच्या लाटांवर स्वार होणारी प्रोफेशनल ‘सर्फर’ आहे. यातला विलक्षण भाग असा, की वयाच्या १३ व्या वर्षी सर्फिग करताना शार्क माशाच्या हल्ल्यात ती जखमी झाली आणि त्यात तिला एक हात गमवावा लागला. दुसरी कुणी असती तर पुन्हा पाण्यातही उतरली नसती. बेथनीच्या धाडसी जीवनावर ‘सोल सर्फर’ हा चित्रपट तयार झाला आणि लोलोनं तो बघितला. त्यानंतर फोन, ई-मेलवर त्यांचा संपर्क सुरू झाला. बेथनीनं ज्या भीतीवर मात करून सर्फिग या तिच्या आवडत्या खेळात पुन्हा प्रावीण्य मिळवलं ते लोलोसाठी प्रेरणादायी ठरलं. आपलं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी बेथनीनं ते बघावं अशी लोलोची इच्छा होती. त्यामुळे बेथनीनं अत्यंत प्रेमाने लोलोच्या आशावादाची तारीफ करत ही प्रस्तावना लिहिली. ‘स्टिल लोलो’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद प्रणव सखदेव यांनी केला आहे. प्रेरणादायी गोष्टी आपल्याला नेहमीच आवडतात. कधी कधी सत्य हे कल्पनेपेक्षाही अद्भुत असतं, असं म्हटलं जातं. त्याचा पडताळा अशा सत्यकथा वाचताना येतो.