मुखपृष्ठ
एक पायरी वर

माझे शेल्फ

एक पायरी वर

इंग्रजी शीर्षक
Ek Payari Var
सारांश

आपल्या प्रत्येकाचा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. लहानपणापासून आपल्याला आलेले अनुभव, आपलं राहणं, जगणं, भवताल यातून तो तयार झालेला असतो. एखादी गोष्ट एकाला चुकीची वाटत असेल, तर तीच गोष्ट दुसऱ्याला अगदी बरोबर वाटत असते, कारण तयामागे असणारे आपापले अनुभव. जीवनाविषयी, अनुभवाविषयी आणि त्यातून घडत जाणाऱ्या व्यक्तींविषयी स्वाती चांदोरकर यांनी आपल्या ‘एक पायरी वर’ या कादंबरीमध्ये लिहिले आहे. ‘एक पायरी वर’ या कादंबरीत वैष्णवीची गोष्ट सांगितली आहे. वैष्णवी ही आजच्या कनिष्ठ वर्गात वाढलेल्या मुलींचे प्रतिनिधित्व करते. मुंबईहून दूरच्या उपनगरात जन्मलेली, एका खोलीत आई-वडील, भावंडांसह मोठी झालेली देखणी वैष्णवी, मात्र महत्त्वाकांक्षी. कॉलेजमध्ये गेल्यावर मुंबईतल्या चकचकीत वातावरणाला भुललेली. त्यातून ती शिक्षण पूर्ण होण्याआधीच लग्नाच निर्णय घेते. पुढे तिला मुलं होणं, तिच्या नवऱ्याचं वागणं, सासू-सासऱ्यांच्या अपेक्षा, वैष्णवीच्या अपेक्षा आणि त्यातून तिचं घराबाहेर पडणं अशी कथा पुढे सरकत राहते. कथेच्या अनुषंगाने वैष्णवी, तिची मैत्रीण शमी, शमीचा नवरा विहंग, वैष्णवीचा मित्र मिहिर, नवरा प्रतोष, मुलं सागर आणि सुषमा, तिच्या सासूबाई, नणंद गौरी, तिचा नवरा अशी पात्रं या इथे वाचायला मिळतात. प्रत्येकाचा स्वत:च्या आयुष्याबद्दल तसाच वैष्णवीबद्दल एक दृष्टिकोन आहे, तो त्यांच्या त्यांच्या अनुभवातून आलेला. वैष्णवीने तरुणपणापासून ते कादंबरीच्या अखेरपर्यंत घेतलेले निर्णय आणि त्यामागची भूमिका तिच्या विचारांतून उलगडत जाते, मात्र लेखिकेने कुठेही तिच्या विचारांचे समर्थन केले नाही की तिला पूर्ण चुकीची ठरवलेली नाही. फक्त ती कशी हे तिच्या आणि इतरांच्या नजरेतून, विचारांतून समजत जाते. वैष्णवीला तिच्या वयोपरत्वे आलेले अनुभव, त्यातून तिला आलेली समज, तिच्या प्रत्येक कृतीमागचं वास्तव यातून ती एक एक पायरी वरवर चढत असते. ही पायरी तिला अनुभवांतून मिळालेली असते तशीच तिने केलेल्या चुकांमधूनही. स्वाती चांदोरकर या व.पु. काळे यांच्या कन्या. त्यांच्या लेखनावर वपुंच्या लेखनशैलीचा प्रभाव जाणवत राहतो. कादंबरीतल्या प्रत्येक पात्राचं स्वत:चं असं तत्त्वज्ञान आहे. कथेत स्वामीजीही आहेत, त्यांचं तत्त्वज्ञानही आहे. वपुंच्या लेखनात त्यांचे प्रत्येक पात्र काही ना काही तत्त्वज्ञान सांगून जातं, तसाच वाचनानुभव ‘एक पायरी वर’ वाचताना येतो.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद