माझे शेल्फ
एकाकी बंड
लैगिंक शोषणासाठी मानवी व्यापार करणा-या लष्करी कंत्राटदाराच्या विरोधात लेखिकेचा न्यायासाठी लढा म्हणजेच द व्हिस्टल बॉलर अर्थात एकाकी लढा हे पुस्तक. नेब्रास्कातील पोलिस अधिकारी आणि मुलांची घटस्फोटित माता कॅथरिन बोल्कोव्हॅक खासगी लष्करी कंत्राटदार डीनकर्प इंटरनॅशनल या कंपनीची नोकरीभरतीची जाहिरात बघते, अर्ज करते आणि भरती होते. चांगली कमाई, जगभर प्रवास आणि युद्धामुळे छिन्न-भिन्न झालेल्या देशाची पुनर्बांधणी करण्याची कामगिरी म्हणजे तिच्यासाठी उत्कृष्ट संधी असते. लवकरच ती बोस्नियात पोहोचते. युनोच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या कामगिरीत मदत करण्यासाठी डीनकॉर्पला कंत्राट दिले जाते. तिच्याकडे मानवी हक्क अन्वेषक आणि लिंगविषयक विभागाची प्रमुख म्हणून काम सोपवण्यात येते. योग्य असे प्रशिक्षण दिले गेले नसल्याने तिच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागते. पण साराजेव्होत आल्यानंतर तिला कल्पना नव्हती, इतक्या वाईट गोष्टींचा ती छडा लावते. जीव धोक्यात घालून कॅथी अत्यंत घृणास्पद गोष्टींचा शोध घेऊ लागते. खासगी भाडोत्री सैनिकांच्या कंत्राटाबरोबर, युनो व अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याबरोबर साटेलोटे असणा-या मानवी व्यापारात गुंतलेल्या महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणा-या अधिका-यांनी भिंगे ती फोडते. लवकरच तिची पदावनती करून तिला नोकरीवरून बडतर्फ केले जाते. जिवे मारले जाण्याच्या भीतीने ती बोस्निया सोडते. गोळा केलेले सर्व पुरावे सतत जवळ बाळगून ठेवल्यामुळे डीनकॉर्पविरूद्ध दाखल केलेला खटला ती जिंकते. डीनकॉर्पची काळी कृत्ये उजेडात आणण्यात यशस्वी होते. अशा सगळ्या घटनांची एक तरल कथा या ‘एकाकी बंड’ या पुस्तकातून देण्यात आली आहे. कॅथरिन बोल्कोव्हॅक आणि कॅरी लीन यांनी ‘द व्हिस्टलबॉलर’ या नावाने हे पुस्तक लिहिले असून सिंधू जोशी यांनी ‘एकाकी बंड’ या नावाने त्याचा अनुवाद केला आहे. विशेष म्हणजे या पुस्तकावर आधारित चित्रपट देखील प्रदर्शित झालेला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून मानवी व्यापारातील बळींच्या पाठीशी उभे राहण्याचे आणि निर्भीडपणे सत्य समोर आणण्याचे विलक्षण धाडस करणारी कॅथी एक असामान्य स्त्री आहे. हे तर या पुस्तकातून कळतेच, पण एक नवी प्रेरणाही मिळते.