माझे शेल्फ

एंजल्स अँड डीमन्स

इंग्रजी शीर्षक
Angels & Demons
सारांश

स्वित्झर्लंडमधील सुप्रसिद्ध सर्न या संशोधन संस्थेत पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ लिओनार्दो वेत्रा यांची गूढ रीतीने हत्या होते. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहताना हल्लेखोराला जे हवंय ते कधीच मिळणार नाही असं वेत्राला वाटत असतं. पण तो त्याचा गैरसमज असतो. हललेखोराला वेत्राच्या लॅब मध्ये प्रवेश करायचा असतो. त्यासाठी पासवर्ड त्याला हवा असतो. पासवर्डच नाही म्हटल्यावर वेत्राला वाटतं आता तो काही करु शकणार नाही. पण जेव्हा धारदार सुऱ्याने अगदी काळजीपूर्वक हल्लेखोर वेत्राचा डोळा काढून घेतो तेव्हा मात्र वेत्राला पुढे घडणाऱ्या भयानक गोष्टीची जाणीव होते पण सगळ्याला फार उशीर झालेला असतो. आपल्या छातीवर हल्लेखोराने भाजवून उमटवलेला एक ठसा घेऊन वेत्रा मरण पावतो. या हत्येबद्दल संस्थेचा डायरेक्टर कोहलर पोलिसांना काही न कळवता हार्वर्डमधून रॉबर्ट लँग्डन या प्रसिध्द चिन्हशास्त्र तज्ञाला बोलावून घेतो. अपरात्री आलेल्या फोनवरच्या संभाषणामुळे गोंधळून गेलेल्या लँग्डनला फॅक्स मधल्या मृतदेहाच्या छातीवर उमटवलेला ठसा पाहून जबरदस्त धक्का बसतो. इथूनच कथेला सुरुवात होते. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या कथेला सुरुवात होते, असं म्हणणं योग्य होईल. सर्न मध्ये ही गडबड सुरु असते तेव्हाच व्हॅटिकन सिटीमध्ये एका महत्त्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते. पोपचा मृत्यू झाल्यामुळे नवीन पोपची निवड करण्याचा हा पवित्र कार्यक्रम.यासाठी व्हॅटिकन मध्ये सुरक्षा व्यवस्था फार काटेकोर केलेली असते. तरीसुद्धा व्हॅटिकन सिटी मध्ये अशा काही घटना घडतात की ज्याने स्विस गार्डस हबकून जातात. भावी पोप म्हणून ज्यांची वर्णी लागू शकेल अशा चार कार्डिनल्सचे व्हॅटिकन सिटी मधून अपहरण झालेले असते. तसेच सुरक्षा व्यवस्थेतला एक लक्ष ठेवणारा कॅमेरा त्याच्या जागेवरुन हलवून दुसऱ्या अनोळखी ठिकाणी लावलेला दिसतो, ज्यात एक भलतीच वस्तू स्विस गार्डस् ना दिसत असते. त्यामुळे ते चक्रावून गेलेले असतात. त्यातच अपहरणकर्त्याचा फोन येतो, ज्यात चारी कार्डिनल्स ची दर तासाने एक अशी सार्वजनिक ठिकाणी हत्या करणार आणि मग व्हॅटिकन सिटीला एका शक्तिशाली पदार्थाने उडवून देण्याची धमकी तो देतो. मग व्हॅटिकन सिटीला वाचवण्यासाठी कामेरलेंगो, जो मृत पोपचा सहाय्यक असतो आणि नवीन पोपची नियुक्ती होईपर्यंत सूत्रे ज्याच्या हाती असतात तो स्वतः लक्ष घालतो. वेत्राच्या छातीवरचा ठसा, त्याच्या लॅबमधून चोरीला गेलेला पदार्थ याच्या तपासाची जबाबदारी नकळत लँग्डनवर येते. त्यात त्याला वेत्राची शास्त्रज्ञ मुलगी व्हिट्टोरिया वेत्रा मदत करते. तिला लॅब मधून चोरीला गेलेल्या पदार्थाची आणि त्याच्या गैर वापराने होणाऱ्या विनाशाची भयंकर काळजी असते. तर लँग्डनला वेत्राच्या छातीवरच्या निशाणी बद्दल उत्कंठा असते. कारण ती निशाणी इल्युमिनाटी या प्राचीन पंथाची असते. अशी निशाणी जी दोन्हीकडून वाचता येईल, ज्याला अँबिग्राम म्हणतात. तो पंथ आता अस्तित्वात नाही या समजुतीत असलेल्या लँग्डनला ती खूण बघून म्हणूनच धक्का बसतो. इल्युमिनाटी हा खूपच प्राचीन पंथ होता ज्यात तेव्हाच्या विज्ञानवादी, कलाकार, शिल्पकार अशा प्रसिद्ध व्यक्ती होत्या. त्यांनी केलेले संशोधन बायबलमधल्या संकल्पनांच्या विरुद्ध असल्यामुळे चर्च आणि या पंथात वैर होते. चर्चने ४०० वर्षांपूर्वी या पंथातल्या चार शास्त्रज्ञांच्या केलेल्या हत्येचा बदला आता कोणीतरी घेऊ पहात असतो. म्हणून चार कार्डिनल्स चे अपहरण केलेले असते. चार कार्डिनल्स ची हत्या कुठे होऊ शकते हे शोधण्याबरोबरच इल्युमिनाटीचे गुप्त ठिकाण शोधण्यातही लँग्डनला स्वारस्य असते. या विश्वाची निर्मिती पंचतत्त्वामधून झालेय यावर इल्युमिनाटी पंथाचा विश्वास असतो. त्यामुळे अपहरण, हत्येच्या ठिकाणांचा पंचतत्वाशी संबंध असणार असा निष्कर्ष लँग्डन काढतो आणि त्यादृष्टीने तपासाला लागतो. त्याच्या तपासाला यश येते का? कामेरलेंगो व्हॅटिकनला वाचवू शकतो का? वेत्राच्या लॅब मधून चोरलेला पदार्थ नक्की काय असतो आणि त्याचा शोध लागतो का? चारी कार्डिनल्सच्या हत्या अपहरणकर्ता कशाप्रकारे करतो? इल्युमिनाटी पंथाचे अस्तित्व, त्यांचे इतर अँबिग्राम, त्यांची गुप्त जागा याबद्दल काय काय माहिती पुढे येते हे सगळं पुस्तकातून हळूहळू आपली उत्कंठा वाढवत उलगडत जातं.धर्म आणि विज्ञान यांच्यातील हा संघर्ष. कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल करताना क्रूरता आणि शौर्य, धर्म आणि विज्ञान, धोकेबाजपणा आणि निष्ठा या सगळ्यांच सुंदर मिश्रण या पुस्तकात दिसून येतं. प्रत्यक्षातली ठिकाण, घडून गेलेल्या घटना, इतिहास, खरे लावले गेलेले शोध यांच्या जोडीने काल्पनिक कथा येत असल्यामुळे ती वाचता वाचता काल्पनिक नसून सत्य घटना वाचतोय असं वाटायला लागतं. डॅन ब्राऊन सुप्रसिद्ध होण्यात हे फार महत्त्वाचे कारण असेल असं वाटतंय. पण एकूणच त्याचे लिखाण, त्याची शैली खूपच परिणामकारक आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी