माझे शेल्फ
गोल गोल राणी
कधी काय घडणार, हे आधीच ठरलेलं असते, असे सर्वसाधारण सर्वचजण म्हणतात... जी ती गोष्ट त्या त्या वेळीच घडते. पण माणसाला प्रत्येक गोष्टींची घाई असते. त्या अदृश्य शक्तीचं नियोजन माणूस स्वीकारू शकत नाही ते ह्याच कारणाने. मग चुटपुट लागून राहते. अगदी सहजतेने वधान केले जातं, ‘‘अरेरे, हे आधी घडलं असतं तर...?’’ घडून गेलेल्या गोष्टींवर पश्चाताप करण्याची वेळ माणूस स्वत:च्या आयुष्यात वारंवार आणतो. आजकाल आपल्या सभोवती घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब ‘गोल गोल राणी’ मधील कथांमध्ये दिसते. भावनांचा होणारा कोंडमारा आणि त्याचे दारूण परिणाम येणाऱ्या बाळांवर किती भयानकपणे होतात आणि एकाबरोबरच कुटुंबातील सगळ्यांनाच त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागतात, याचे विदारक चित्र उलगडणारी ‘गोल गोल राणी’ ही कथा चुटपुट लावून जाते. ब्लँक कॉल्समुळे उद्ध्वस्त झालेली मालविका, पिरॅमिड मार्केटिंगच्या मोहजाळात अडकून संपलेला रोहन, श्रीमंतीच्या हव्यासापायी भरकटलेला पती, पप्पाला वाचविण्यासाठी विलक्षण तडजोड करणारी मम्मी आणि तिची मुलगी... आपण सर्वांनीच पाहिलेले किंवा ऐकलेले असतात. जिद्दीने परिस्थितीशी दोन हात करून पुढे जाणाऱ्या यशवंतला मदत करणाऱयांत आपलाही खारीचा वाटा असतो आणि यशस्वी विजाकाकाचा अस्तही आपण पाहिलेला असतो.विक्षिप्त
आप्पा, आपल्या नवऱ्याला सांभाळून घेणारी त्यांची समजूतदार सून निमा, कौटुंबिक अडचणींमुळे तऱ्हेवाईक झालेली आप्पांची मुलगी निलू अशा लोकांनी भरलेली कुटुंबे थोड्याफार फरकाने शहरात आणि गावात आपल्याला पहायला मिळतात आणि यामुळेच या कथा मनाला भावणाऱ्या ठरतात.