माझे शेल्फ
गोष्टींचे एटीएम
खुसखुशीत शैलीतील हलक्याफुलक्या कथा.... श्याम भुर्के हे साहित्यप्रेमी व्यक्तिमत्त्व. बँकेसारख्या नोकरीतही त्यांनी हे साहित्यप्रेम जपलं. वाचन, लेखन, सादरीकरणातून ते वृद्धिंगत केलं. जीवनाकडे हसतखेळत बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या ‘खुमासदार अत्र’, ‘आनंदाचं पासबुक’ इ. पुस्तकांतून अधोरेखित झाला आहे. अशाच दृष्टिकोनातून साकारलेल्या कथांचा संग्रह आहे, ‘गोष्टींचं एटीएम.’ दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा या कथा आहेत. ‘बँकेतले पगार बंद’ असं सर्क्युलर निघालं तर काय होईल, असं कल्पनाचित्र ‘बँकेतले पगार बंद!’ या कथेत रेखाटलं आहे. बँकेत पगार न मिळता कोणता कर्मचारी किती ठेवी गोळा करेल यावर त्याचं कमिशन ठरेल, असं सक्र्युलर निघतं आणि मग काय गमतीजमती होतात, ते या कथेत सांगितलं आहे. ‘गृहिणींना हक्काची सुट्टी’ या कथेत गृहिणींना कायद्याने हक्काची सुट्टी मिळते; पण लेखकाची बायको त्या सुट्टीचा कसा बोजवारा उडवते, याचं मनोरंजक चित्रण या कथेतून केलं आहे. बँकेत जर सगळे वयोवृद्धच कर्मचारी असतील तर काय होतं, याचं खुसखुसशीत चित्रण वाचायला मिळतं ‘वयोवृद्धांची बँक’ या कथेतून. असंच खुसखुशीत चित्रण असलेली आणखी एक कथा म्हणजे ‘बँकेत मूव्हर्स अॅन्ड शेकर्स’. टीव्हीवर गाजत असलेला ‘मूव्हर्स अॅन्ड शेकर्स’ हा रिएलिटी शो बँकेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सादर करायचा, असं बँक कर्मचारी ठरवतात. तो रिएलिटी शो पाहण्यासाठी शेखर सुमन यायचं कबूल करतात. त्या शोची पूर्वतयारी करताना आणि प्रत्यक्ष तो शो करताना, काय काय गमती घडतात, याचं रंजक शैलीत वर्णन केलं आहे. ‘अगत्यशील (?) ग्राहक’ ही आणखी एक रंजक कथा. घुकणी बुद्रुक नावाच्या खेडेगावात पंधरा दिवसांसाठी लेखकाची बदली होते. तिथे गेल्यावर लेखकाला जे मजेदार अनुभव येतात, ते लेखकाने हलक्यपुâलक्या शैलीत सांगितले आहेत. बँकेत आलेल्या ग्राहकाला बँक कर्मचारी कशी वागणूक देतात आणि एखादा खातेदार त्याचं उट्टं कसं काढतो, याचं मनोरंजक चित्रण केलं आहे ‘बँकेत चिमण’ या कथेत. तर ‘कॅश मंत्र’ या कथेत बँकेतीलच एक कर्मचारी बँकेच्या कॅशमधील तीन हजार रुपये लांबवतो. त्याच्याकडून त्याचा कबुलीजबाब घेण्यासाठी अन्य कर्मचारी काय क्ऌप्ती योजतात, याची ही हकिगत आहे. ‘लोका सांगे...’ ही कथा आहे लेखकाच्या पत्नीच्या हजरजबाबीपणाची. लोकांशी कसं वागावं यावर बायकोला व्याख्यान देत असताना बायको लेखकाची कशी विकेट घेते, याचं हलकफुलक चित्रण या कथेत आहे. खातेदार आणि बँक यांच्यातील नात्याचं हळुवार दर्शन घडवलंय ‘नातवासासारखी प्रेमळ बँक’ या कथेतून. काळे सर हे बँकेचे ग्राहक असतात. बँकेच्या एका चुकीमुळे त्यांना मनस्ताप होतो आणि वीस वर्षांपासून बँकेत असलेलं खातं ते बंद करून टाकतात; पण बँकेशी त्यांचे परत ऋणानुबंध जुळतात, असं या कथेचं कथानक आहे. एका साप्ताहिकात ‘मी असा आहे’ हे नामवंतांच्या मुलाखतीचं सदर संजय कदम चालवत असतो. वाचकांचा उदंड प्रतिसाद या सदराला मिळत असतानाच एका वाचकाचं त्यांना पत्र येतं. त्या पत्रात त्याने मुलाखतींमधील तोचतोपणावर टीका केलेली असते. म्हणून संजय कदम एका सामान्य, गरीब माणसाची मुलाखत घेतो आणि त्याच्याकडून मिळालेली प्रश्नांची उत्तरं संजयला बरंच काही सांगून जातात, असा आशय आहे, ‘गरिबाची श्रीमंत मुलाखत’ या कथेचा. ‘गोष्टींचं एटीएम’ या कथासंग्रहातील या काही कथा. याव्यतिरिक्त अन्यही कथा या कथासंग्रहात आहेत. अगदी साध्या साध्या प्रसंगातून साकारलेल्या या कथा वाचकाच्या चेहयावर हसू आणतात. बहुतेक कथांना बँकेची पार्श्वभूमी आहे. मध्यमवर्गीय माणसाचं नेमकं चित्र या कथा उभं करतात. साधी, सरळ भाषा आणि अधूनमधून पेरलेले किस्से यामुळे या पुस्तकाची वाचनीयता वाढते. एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते वाचूनच खाली ठेवलं जातं. कथा हलक्या फुलक्या शैलीतील असल्या तरी त्या अंतर्मुखही करतात.