माझे शेल्फ
गटुळं
विदारक अनुभवांचं ‘गटुळं’... मुंबईसारख्या महानगरात कित्येक मुलं आणि मुली गल्ल्यांमधून रेल्वे गाड्यांमध्ये, स्टेशनजवळच्या बकान जगांमध्ये नजरेला पडतात. काही आपल्याला झेपेल त्या पद्धतीनं लहान-मोठी कामं करत जगतात आणि आपल्या भावंडांना जगवतात. हजारो मध्यमव्गीय प्रवासी रोज त्यांना बघतात. त्यांची कीव करतात, तिरस्कार करतात. पण नंतर त्यांना विसरून कामालाही लागतात. काय भवितव्य असतं या मुलांचं, घर हरवलेली-दुरावलेली ही मुलं उद्या कोणत्या वाटेवर जाणार, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. हेही एक भयाण वास्तव आहे, असं म्हणून सगळेच जण त्याकडे पुन्हा नजर न वळवता आपला रस्ता धरतात. कधी काळी काहीसं असंच भरकटलेलं आयुष्य जगलेल्या रवींद्र बागडे नामक लेखकाचं ‘गटुळं’ हे पुस्तक भरकटलेल्या अनुभवाचं चित्रण करतं. चर्मकार समाजात जन्मलेला लेखक मुंबईतल्या आपल्या जगण्यातून जे शिकत गेला, जे अनुभव घेत गेला त्याचं दर्शन या लेखनात घडतं. कादंबरीचा नायक नारायण-नाऱ्या हे लेखकाचंचं दुसरं रूप आहे. दारूड्या बाप, त्याची मारहाण सतत सहन करत, कष्ट उपसत मुलांना वाढवणारी आई आणि रस्त्यावरचा त्यांचा उघडा संसार... दारिद्र्य हा या घराचा स्थायीभावच होऊन गेलेला. पारंपरिक काम न करता नाऱ्याचा बाप भाजी विकायचा धंदा करणारा. पण दारूच्या व्यसनानं त्याला पुरतं गिळून टाकलेलं, अशा परिस्थितीत पाच पोरांना खाऊ घालणं हे त्यांच्या आईवरच येऊन पडलेलं. तरीही नाऱ्या शाळेत जायचा. पण पुस्तक नाही म्हणून त्याला शाळेत हाकलून लावलं. असे अनेक अनुभव घेत नाऱ्या मॅट्रिक झाला. रस्त्यावरच्या जगण्यातली कुचंबणा, तिथला गलिच्छपण यातून आपण वर यायचं आहे ही भावना मनात जपत धडपडणारा नाऱ्या ज्या चाकोरीतून गेला, ती मध्यमवर्गीय माणसाला मानसिक धक्का देणारी आहे. कोवळ्या वयातलं नाऱ्याचं भावविश्व आणि त्याच्या अवतीभवती भयंकर वास्तव याचं या कादंबरीतलं चित्रण जण्याचा कुरूप चेहरा समोर ठेवतं. नाऱ्याच्या डोक्यावरचं अनुभवाचं हे ‘गटुळं’ विदारक सामाजिक परिस्थिती, गरीब माणसाची परवड, चुकीच्या रस्त्याला लागलेली मुलं, व्यसनामुळे उद्धध्वस्त होणारे संसार, जनावराच्या पातळीवरचं जगणं अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे. नाऱ्या भाजी विकून आईला मदत करतो, पण शाळेतली वर्गमैत्रीण भाजी घ्यायला आली की त्याला शरम वाटते. शाळेतली त्याची टिंगल होते. नाऱ्याचं संवेदनशील वयातलं मानस कादंबरीत उलगडून समोर येतं. १९५५ ते १९६८ या काळातल्या मुंबईचं चित्रणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाऱ्यानं या वाटचालीत अनेकविध अनुभव घेतले. डोक्यावर भाजीची पाटी घेऊन वणवण फिरला. दारूड्या बापाशी भांडला-तंटला... त्याला झटापटीत मारहाणही केली. शाळेतल्या चंचल या मुलीशी त्याची मैत्री झाली, पण नाऱ्याची पार्श्वभूमी कळताच ही मैत्री झटकन तुटलीही. नाऱ्याचं जगणं, शिकणं भरकटणं, त्याला बरंच काही शिकवून गेलं. नाऱ्याच्या या अनुभवांमध्ये त्याचं वेश्यावस्तीतला शब्दांमध्ये गुंतणंही आहे. अंगावर काटा आणणारे बाललैंगिक शोषणाचे अनुभव आहेत. कॉलेजातलं अर्धवट शिक्षण, त्यानंतरच्या सरकारी नोकऱ्या यातून जाताना मदत करणारे, वाट दाखवणारेही भेटले. नाऱ्याच्या लग्नापर्यंतची ही कहाणी आहे. यापुढचा लेखकानं लिहिलेला भाग प्रसिद्ध व्हायचा आहे. आपल्या आयुष्यात नाऱ्याला प्रेरणा आहे आईची. आईच्या कष्टांचा, तिच्या डोळ्यातील पाण्याचा तो साक्षीदार आहे. बापाबद्दल चीड बाळगणारा लेखक बापानं आपल्याला माझ्यासारखं वागू नकोस म्हणून कसं सांगितलं होतं तेही लिहितो. नाऱ्याच्या जीवनातले हे खळबळजनक, वेदनापूर्ण दिवस समाजापुढे काही प्रश्न ठेवतात. त्याला जाबही विचारतात. बोली भाषेचा वापर, विस्कळित जगणं तशाच पद्धतीने मांडणारी शैली आणि नाऱ्याचं ‘मी’पण उलगडून सांगणारं प्रांजळ निवदेन यामुळे ‘गटुळं’ मनाला भिडतं. त्यातला सूर नुसताच तक्रारीचा नाही. तक्रारीपेक्षा वास्तवाचं दर्शन थेटपणे घडवण्याला लेखकानं महत्त्व दिलं आहे. आपल्याबरोबर इतरांच्याही वेदना कळत-नकळत चित्रित केल्या आहेत. लेखकाची ही सहवेदना या लेखनाला एक निराळी उंची प्राप्त करून देते.