माझे शेल्फ
हाच माझा मार्ग
बालकलाकार ‘मास्टर सचिन’... सहजसुंदर अभिनय करणारा ‘हिरो’... जबरदस्त परफॉर्मन्स देणारा... नवोदितांना आपुलकीने मार्गदर्शन करणारा ‘महागुरू’... हिंदी चित्रपटसृष्टीत अभिमानाने ‘मराठी मुद्रा’ उमटवणारा कलावंत... आजवर आपण सचिनला अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार अशा भूमिकांमध्ये मोठ्या, तसेच छोट्या पडद्यावर पाहिलं आहे. अशा विविध क्षेत्रांत काम करताना त्याला कोणकोणते अनुभव आले, त्याची सुवर्णमहोत्सवी कारकिर्द कशी बहरली, मुलगा-भाऊ-पती-वडील-मित्र या भूमिका त्याने कशा पार पाडल्या, त्याचं पडद्यामागचं आयुष्य कसं आहे, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल! म्हणूनच सचिन शरद पिळगांवकर याच्या आयुष्याच्या प्रवासाची ही पटकथा...सचिन यांनी त्यांच्या १९६३ मधील ‘हा माझा मार्ग एकला’ या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील ‘एकुलती एक’ यादरम्यानचा चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्षांचा प्रवास एकंर ६९ प्रकरणांत उलगडला आहे. बालकलाकार सचिन, अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीत दिग्दर्शक, नर्तक, कॅमेरामन, हिंदी चित्रपट लेखक, टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शो निर्माता, परीक्षक, निवेदक, उर्दू शायर असा अनेक मार्गांनी संपन्न झालेला त्यांचा प्रवास यात दिसतो. याहीपुढे जाऊन एक यशस्वी कुटुंबप्रमुख, गाजावाजा न करता नवोदितांच्या मदतीला धावून जाणारे, माणसे जोडणारे आणि नाती मानणारे तसेच निभावणारे सचिन पिळगावकर माणूस म्हणून यात भावतात. उत्तम निरीक्षणशक्ती, दांडगी स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा, संयमी, दिलदार अशी उद्यमी व्यक्ती या आत्मचरित्रातून आपल्यासमोर साकार होते. पन्नाशीनंतरही विद्यार्थीभावना अंगी बाळगून आजही नवनवे प्रयोग करण्यास सरसावणारा हा कलाकार समजण्यास त्यातून मदत होते, हा या पुस्तकाचा विशेष. पुस्तकाची भाषा विलक्षण संवादी आहे. ही पन्नास वर्षे जशी सचिन यांची होती, तशीच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचीही होती. मात्र, त्यावरील अपेक्षित भाष्य यात आलेले नाही. सचिन यांच्याकडे सांगण्यासारखे खूप काही आहे. त्यातील केवळ हिमनगाचे टोक म्हणावे इतकीच माहिती या चरित्रात आली आहे असे जाणवते. हे चरित्र जसे किश्श्यांमधून तसेच पानोपानी दिलेल्या तब्बल १०८ पूरक छायाचित्रांतूनही उलगडत जाते.
‘मुक्तछंदामध्ये मुक्ताने कथानायकाला दिलेला धक्का हा वाचकांपर्यंत सरळसरळ पोचतो. ‘सर’ ही कथा पावसाळी हवेतल्या दिवसातली हूरहूर मनाला जाणवून देते. ‘अढळपट’मधील पद्मिनी-जी आपल्या नवऱ्याच्या दिवंगत पत्नीच्या प्रतिमेशी पोचायचा आटोकाट प्रयत्न करते– आपल्या मनांत तिच्याविषयी कणव निर्माण करते. ‘अढळपद’ ‘शिळा अहिल्या’ ‘सर’, ‘मुक्तछंदा’ इ. या कथासंग्रहातील खूपच उजव्या कथा आहेत. काळ्यांच्या कथा आकर्षक होतात त्याची आणखीही कारणे आहेत. काळ्यांची शब्दांवर हुकमत आहे. आपल्या शब्दसामर्थ्यांवर वाचकांना पाहवत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. शिवाय त्यांच्या कथांमधली माणसे जिवंत आहेत. चैतन्यमय आहेत. तुमच्याआमच्याभोवती वावरणारी अशी ती माणसे आहेत. त्यामुळे या संग्रहातील कथा वाचकाला बांधून ठेवतात. हे यश थोडके नाही.