माझे शेल्फ
हेल मेट्स
हा खुसखुशीत विनोदी ललितलेखसंग्रह वेगळ्याच जगाची सफर घडवून आणतो. मेंदूविकारतज्ज्ञ असलेल्या लेखकाने यात मित्रांसोबतच्या शालेय आणि महाविद्यालयामधील आठवणी सांगितल्या आहेत. लेख वाचताना वाचकांना आपला लंगोटीयार नक्की आठवेल. प्रत्येकजण आपल्या शालेय जीवनात खो्या, दंगामस्ती, चुका करीत त्यातून शिकतही असतो. या जगण्याला विनोदाची झालर लागली की ते अजून खमंग, सुवासिक होत जाते. ते कसे होते, हेच लेखकाने इथे मांडले आहे. ओघवती भाषाशैली, कथेत रमवून ठेवण्याची ताकद आणि गोष्ट सांगण्याची हातोटी लेखकांकडे आहेच. सोबत त्यात केलेली विनोदाची पेरणी ही रंगत वाढवते. प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे, या लेखसंग्रहाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन शब्दनिर्मिती. लेखकाने अर्धा शब्द मराठीतील व अर्धा इंग्रजीतील घेऊन काही नवीन शब्द समोर आणले आहेत. त्यामुळे उच्चार जरी सारखा असला तरी, त्यातून दोन वेगवेगळे अर्थ ध्वनित होतात. सोबतच प्रचलित शब्दांना नवा अर्थ लावण्याचा प्रयत्नही केलेला दिसतो. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक - पाठीवरचा मजकूर, शिरजोर - डोक्याचा जोर. जवळपास अठरा लेख या संग्रहात आहेत. सवंगडी, माझे हेलमेट्स, माझं पाठ्यपुस्तक, आमची स.भु., किस्सा एमडीचा, दोन लग्नांची एकच गोष्ट, दोन खटल्यांचा खटला, देव-दानव टी ट्वेंटी सामना. लेखांची ही शीर्षके वाचून या लेखनाची सहज कल्पना येऊ शकते. चित्रकार सतीश भावसार यांनी मुखपृष्ठ खुबीने रेखाटले आहे.