माझे शेल्फ
इराणमधून सुटका
इराण मधून सुटका - सुझान आझादी , अँजेला फेरान्ते अनुवाद - विदुला टोकेकर (पुस्तक परिचय - प्रणव पाटील) इराण मधून सुटका हे पुस्तक म्हणजे गाजलेल्या आउट आॕफ इराण या प्रसिध्द पुस्तकाचा अनुवाद आहे. या पुस्तकाचं मुखपृष्ठच इतकं सुंदर आे की हे पुस्तक हातात घेऊन सहज चाळता चाळता वाचायला लागलो . खरं तरं काही पुस्तकं अशी असतात की त्यात आपण येवढं गुंतून जातो की एखादा thriller चित्रपट पहावा इतक्या वेगाने कथा त्यात पळत असते. इराण मधून सुटका हे असंच पुस्तकं आहे. सुझान आझादी च्या आयुष्यावर बेतलेलं हे पुस्तक तीच्या लहानपणीच्या आठवणीने सुरु होतं. इराण मधे एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेली सुझान तत्कालीन इराणमधल्या जमिनदारी प्रथे बद्दल आणि तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरुवातीला सांगते. पुढे ती शाळेत असताना तीची आई आजारी पडून दगावते आणि तीचं आयुष्य वेगळ्याच वळणावर जातं. शिक्षणासाठी तीला अमेरिकेत तीच्या मामाकडे पाठवण्यात येतं पुढे कॉलेज मधे खास काही कामगिरी न केल्यामुळे तीची रवानगी पुन्हा इराण ला होते. तत्कालीन शहा पहलवी या राजाच्या राजेशाहीतल्या इराणचं वर्णन तीच्या आठवणींमधे येतं. नुकतंच इराणला तेल सापडलेलं असतं आणि त्या पैशाच्या ओघामधे अनेक बांधकाम व्यवसायीक कुटुंब प्रचंड श्रीमंत झालेली असतात त्यातलंचं सुझानचे कुटुंबीय. यातच एका अतिश्रीमंत बांधकाम व्यवसायीकाशी सुझानचं लग्न होतं. लग्ना नंतर सुझानने या अतिश्रीमंतीत तीने केलेली पैशाची उधळपट्टी ,तत्कालीन इराणी कुटुंब व्यवस्था,समाज याचं सविस्तर वर्णन येतं. काही दिवसातच सुझान ला एक लहान मुलगा होतो पण तीचा पती कॕन्सर मुळे दगावतो आणि पुन्हा एकदा सुझानच्या आयुष्यात वेगळं वळण येतं. परंतु नव-याची मागे असणारी गडगंज संपत्ती या सगळ्याला आधार ठरते आणि सुझान परत एकदा सुखासीन आयुष्याकडे वळते. याच काळात इराण मधे सतत होणारी शहाच्या राजवटीच्या विरोधातली अंदोलने इराणचं राजकीय क्षेत्र ढवळून काढत असतात. पॕरिस मधला खोमेनी आणि त्याचा वाढत चाललेला प्रभाव यातून इराण मधे अखेर क्रांती होते आणि राजेशाही संपुष्टात येऊन इस्लामी शासन व्यवस्था लागू होते. यात सगळ्यात शहाच्या राजवटीतले नवश्रीमंत क्रांती नंतर बळी पडू लागतात. सुझानला मात्र हे तात्पुरतं आहे असं वाटतं पण सगळीकडे हळूहळू परिस्थिती इतकी बिघडते की सुझानलाही या काळात काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागते आणि तीचे डोळे उघडतात. देशभर धर्मवेड्या क्रांती नंतर स्त्रीयांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. कधीकाळी कमी कपड्यांमधे फिरणा-या स्त्रीयांची जागा बुरखा आणि चादोर घेतलेल्या महिला घेतात. या सगळ्यातून पळून देशाबाहेर जायचं सुझान ठरवते परंतु तीच्यासाठी आपल्या लहान मुलाला घेऊन निसटणं ही सोपी गोष्ट नव्हती. या सगळ्या निसटण्याच्या थरार नाट्याचे तीने लिहून ठेवलेले अनुभव वाचताना आपणही तीच आहोत इतका जिवंतपणा आहे. या सगळ्यातून निसटून जाऊन पुढे सुझान आणि तीच्या नातेवाईकांचं काय होतं हे वाचण्यासारखंच आहे.