माझे शेल्फ
इट्स नॉट अबाउट द बाइक
लान्स आर्मस्ट्राँगला तर सगळं जग ओळखतं. जगातल्या सर्वात महत्त्वाच्या आणि सुप्रसिद्ध सायकल स्पर्धेचा तूर द फ्रान्सचा सलग सात वेळेचा विजेता म्हणून त्याचे नाव प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत ३५०० किमीपेक्षा जास्त अंतर २३ दिवसात कापायचे असते. याचे वेगवेगळे टप्पे केलेले असतात. प्रत्येक टप्पा पहिल्यापेक्षा कठीण होत जाणारा. मग डोंगराळ भाग, रस्तेच काय पण धड वाटही नसणारे भाग, वेगाने जात टेकड्याचे चढ-उतार असणारे भाग अशा खडतर टप्प्यातून पार पडत आणि फ्रान्स आणि युरोपच्या काही भागांमधल्या हवामानाला, तुफान पाऊस, बर्फवृष्टी, बेभान वारा यांना तोंड देत ही स्पर्धा जिंकणे खरंच सोपे काम नाही. त्यातून जर कॅन्सर सारख्या आता काही खरं नाही याचं अशा स्टेज ला पोहोचलेल्या माणसाने त्यातून पूर्ण बरे होऊन ही स्पर्धा जिंकणे म्हणजे तर कसं व्यक्त व्हावं प्रश्न पडेल असं काम. सायकल स्पर्धांमध्ये नाव होत असतानाच लान्स आर्मस्ट्राँगला त्याच्या वयाच्या २५-२६ व्या वर्षीच कॅन्सर झाल्याचे निदान झाले. जेव्हा कळलं तेव्हाच आजार प्रोस्टेट ग्लॅड्स, फुप्फुसे आणि मेंदूत पसरला होता आणि त्यातून लान्स आर्मस्ट्राँग वाचण्याची शक्यता खूपच कमी होती. पण इलाज सुरू झाले. मेंदूवरच्या अनेक गाठी काढायला झालेलं आव्हानात्मक ऑपरेशन आणि नंतर केमोथेरपीच्या ५-६ सायकल्स यातून त्याला जावं लागलं. अक्षरशः याला अग्निदिव्यच म्हणावे लागेल. मुळात लान्स आर्मस्ट्राँगची प्रकृती दणकट होती, स्वभावही कणखर होता. पण याचबरोबर त्याची प्रचंड इच्छाशक्ती, तेवढीच मेहनत आणि तेवढाच निश्चय या गोष्टींमुळे तो यातून सुखरूप बाहेर पडला हे कौतुकास्पद आहे. कॅन्सर झालाय हे कळल्यावर सामान्य माणूस नक्कीच मुळापासून हादरून जातो. पण आता झालाच आहे कॅन्सर तर लान्स आर्मस्ट्राँगने त्याच्याशी संवाद साधायला सुरूवात केली होती. आधीच त्याने कॅन्सरला सांगून टाकले की, तुला रहायला जागा शोधण्याच्या प्रयत्नात तू एखादं शरीर शोधत होतास, तेव्हा माझं शरीर निवडून तू मोठी चूक केली आहेस. किती आत्मविश्वासपूर्ण बोलणं हे! जरी कॅन्सर भारी पडेल हे माहीत होतं तरी असं बोलणं, असा विचार सुचावा यातच पुढची विजयाची बीजं रोवली जात असतील न! अशा जीवघेण्या आजारातून सहीसलामत बाहेर पडल्यावर माणसाचे आयुष्य पूर्णपणे बदलून जात असणार. आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीत बराच फरक पडत असणार. लान्स आर्मस्ट्राँगच्या बाबतीतही अर्थातच असेच घडले. कॅन्सर मधून बरे झाल्यावर त्याने कॅन्सर फाउंडेशनची स्थापना केली. त्या फाउंडेशन तर्फे सायकल स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यातून गोळा होणारे पैसे कॅन्सर रिसर्च आणि कॅन्सर झालेल्या लोकांच्या मदतीसाठी वापरले जातात. लान्स आर्मस्ट्राँग याचा हा सगळा प्रवास वाचण्यासारखा आहे. नुसता वाचण्यासारखाच नाही तर प्रेरणा घेण्यासारखा आहे म्हणणे जास्त योग्य होईल. फक्त कॅन्सर झालेल्या लोकांनीच नव्हे तर सरसकट सगळ्यांनीच. लान्स आर्मस्ट्राँग आणि त्याच्यासारख्याच दुर्धर आजारातून बाहेर पडून मोठे काम केलेल्या सगळ्यांनाच शतशः प्रणाम!