माझे शेल्फ
जेआरडी : एक चतुरस्र माणूस
उच्च विचार, उच्च भाषा आणि उच्च वर्तन " हे स्वधर्मीय ब्रीद अक्षरशः जगलेले कुटुंब म्हणजे " टाटा कुटुंब ". टाटा ..नावातच सर्व काही टाटा म्हणजे दूरदृष्टी टाटा म्हणजे समर्पण टाटा म्हणजे दातृत्व टाटा म्हणजे निस्सीम देशभक्ती.. आणि या सरव गुणांचा महामेरू म्हणजे " जहांगीर रतन दादाभाई उर्फ जेआरडी. कोणतीही औपचारिक पदवी हाताशी नसताना दूरदृष्टी , माणसांची पारख , त्यांना हाताळण्याचे कसब , कामाप्रती असलेले समर्पण आणि वेळप्रसंगी घेतलेले कठोर निर्णय यामुळे त्यांनी टाटा उद्योगसमुह एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. आकाशाप्रती असलेल्या प्रेमातून सुरू केलेली विमानसेवा नंतर तेवढ्याच प्रेमाने देशाला अर्पण केली. १ रुपया या नाममात्र वेतनावर सुमारे ५ दशके तिचे अध्यक्षस्थान भूषविले हा तर एक विक्रमच आहे. परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या जेआरडी यांनी स्टॅटिकल , व्यवस्थापनशास्त्र , प्रशिक्षण केंद्र यांसारखे त्याकाळी एकदम अपरिचित असलेले विभाग सुरू करून दूरदृष्टी दाखवली. "दातृत्व म्हणजे टाटा " या समिकरणास जेआरडी ही जागले. नारळीकर पितापुत्र , शास्त्रज्ञ डॉ. रामन्ना , माजी राष्ट्रपती के आर नारायण आणि या सारख्या सुमारे २००० पेक्षा जास्त बुद्धिवंत लोकांना टाटा स्कॉलरशिप चा लाभ मिळाला.टाटा कॅन्सर हॉस्पिटल , टीआयफर यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कैक संस्थांना टाटांची भरीव देणगी व जेआरडी यांच्या सारखे भक्कम पाठबळ लागले. देशाचा विचार करताना आणलेला " बॉम्बे प्लॅन " असो अथवा लोकसंख्या वाढीचा विचार करता आणलेले " फॅमिली प्लॅंनिंग फौंडेशन " असो. आपल्या समूहाची गरज बाजूला ठेवून त्यांनी नेहरू वा इंदिरा गांधी सरकारला मदतीसाठी अनेक वेळा आपली तज्ञ मंडळी पाठवून दिली.वेळप्रसंगी एक जागरूक नागरिक बनून काही सरकारी विरोधही दर्शवला. खरंतर जेआरडी यांचे इतके पैलू आहेत की ते पुस्तक वाचल्या शिवाय कळणारच नाहीत.त्यांच्या या पैलूंमुळेच त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार " भारतरत्न " प्राप्त झाला. त्यावेळेस असे म्हटले गेले , " भारतरत्न या पुरस्काराचा सन्मान झाला ".